Homeनागपूर न्यूज‘अॅग्रोव्हिजन २०२६’ व जलपरिषदेचे २७ नोव्हेंबर रोजी भव्य उद्घाटन

‘अॅग्रोव्हिजन २०२६’ व जलपरिषदेचे २७ नोव्हेंबर रोजी भव्य उद्घाटन

Advertisements
Advertisements
Advertisements

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जलसंवर्धन मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री पंकज भोयर व आशिष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती
दुष्काळाचा सामना : पाणी व्यवस्थापन आणि पीक नियोजन’ मध्यवर्ती संकल्पना
तयारी अंतिम टप्प्यात


शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, संशोधन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती मिळावी, तसेच बदलत्या हवामानाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम बनविण्याच्या उद्देशाने आयोजित मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ‘अॅग्रोव्हिजन २०२६’ आणि जलपरिषदेचा भव्य उद्घाटन सोहळा शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.
अमरावती रोडवरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर सकाळी १०.३० वाजता होणा-या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री व अॅग्रोव्हिजनचे मुख्य प्रवर्तक मा. ना. श्री. नितीन गडकरी राहणार आहेत. जलपरिषदेचे उद्घाटन मृदा व जलसंवर्धन मंत्री मा. श्री. संजय राठोड यांच्या हस्ते होणार आहे. राज्यमंत्री मा. ना. श्री. पंकज भोयर व मा. ना. श्री. आशिष जयस्वाल यांच्या सह आयसीआरआयएसएटी, हैदराबादचे महासंचालक डॉ. हिमांशु पाठक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व माफसू नागपूरच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांची उपस्थिती राहणार आहे.
‘दुष्काळाचा सामना : पाणी व्यवस्थापन आणि पीक नियोजन’ ही यंदाच्या अॅग्रोव्हिजनची मध्यवर्ती संकल्पना आहे. या चार दिवसीय कृषी महोत्सवात AI आणि स्मार्ट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एकात्मिक कृषी नियोजनावर विशेष भर देण्यात येणार आहे. शिक्षण, प्रशिक्षण आणि सक्षमीकरण या त्रिसूत्रीवर गेली १६ वर्षे वाटचाल करणाऱ्या अॅग्रोव्हिजनने शेतकरी, कृषी तज्ज्ञ, संशोधक, उद्योजक, तंत्रज्ञान क्षेत्र आणि शासन यांच्यात ज्ञानाची देवाणघेवाण घडवून आणली आहे. कार्यशाळा, कृषी प्रदर्शन आणि परिसंवाद यांच्या माध्यमातून आधुनिक शेतीचे ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमाचा प्रयत्न आहे.
विदर्भातील शेतकऱ्यांसमोर असलेल्या दुष्काळाच्या आव्हानावर मात करण्यासाठी यंदाच्या अॅग्रोव्हिजनमध्ये पाणी व्यवस्थापन, जलसंधारण आणि पीक नियोजन या विषयांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. कमी पाण्यात अधिक उत्पादन घेणे, उपलब्ध जलस्रोत यांचा प्रभावी वापर, आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि शेतीतील नव्या प्रयोगांबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
विविध विषयांवर विशेष कार्यशाळा आयोजित केल्या आहेत, ज्या मध्ये २७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता ‘कृषी क्षेत्रातील स्टार्टअप्स आणि माहिती तंत्रज्ञान’ या विषयावर विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता ‘दुष्काळात पशुसंगोपन व चाऱ्याचे नियोजन’ या विषयावर, तर दुपारी २ वाजता ‘बायोचार व सेंद्रिय घटकांद्वारे जमिनीतील कार्बन सुधारणा’ या विषयावर कार्यशाळा होईल. यावेळी पशुसंवर्धन मंत्री मा. ना. श्रीमती. पंकजा मुंडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
२९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता ‘AI व आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कमी पाण्यात ऊस उत्पादन’ या विषयावरच्या कार्यशाळे करिता महाराष्ट्राचे कृषी मंत्री मा. ना. श्री दत्तात्रय भरणे उपस्थित राहणार आहेत. तर दुपारी ३ वाजता ‘गोड्या पाण्यातील मत्स्यपालन व विदर्भातील संधी’ विषयावरच्या कार्यशाळे करिता महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री मा. ना. श्री नितेश राणे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता ‘विदर्भातील समूह आधारित उत्पादनांवर आधारित FPO’ या विषयावर, तर दुपारी २ वाजता ‘दुष्काळात AI चा वापर करून संत्रा बागांचे नियोजन’ या विषयावर विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
यावेळी राष्ट्रीय कृषी प्रदर्शन २७ ते ३० नोव्हेंबर दरम्यान दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत आणि दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत शेतकऱ्यांसाठी विविध कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, नवीन उपकरणे, संशोधन, शेतीतील नव्या पद्धती आणि शेतीपूरक व्यवसायांची माहिती या प्रदर्शनातून मिळणार आहे.
सोमवार, ३० नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता अॅग्रोव्हिजन २०२६ चा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, केंद्रीय मंत्री मा. ना. श्री. नितीन गडकरी अध्यक्षस्थानी असतील. रोजगार हमी योजना मंत्री मा. ना. श्री. भरत गोगावले, महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
शेतकऱ्यांनी या चार दिवसीय कृषी महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
पत्रकार परिषदेला अॅग्रोव्हिजन सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी, आयोजन सचिव रवी बोरटकर व रमेश मानकर तसेच अॅग्रोव्हिजन सल्लागार समितीचे डॉ. शरद गडाख, डॉ.विलास खर्चे, डॉ. इंद्रमणी मिश्रा, डॉ.एन.जी. पाटील, डॉ. व्हि.एन. वाघमारे, डॉ. एस.के. शुक्ला, श्री. एम.जी. शेंबेकर, कॅ. डॉ.एल.बी. कलंत्री, श्रीमती रीना सिन्हा, श्री शिरीष भगत, श्री सुधीर दिवे, श्री आनंदराव राऊ त, श्री मिलींद टिचकुले, श्री प्रशांत कुकडे, श्री प्रशांत वासाडे, श्री श्रीधर ठाकरे, श्री विजय जाधव, डॉ. पिनाक दंदे, डॉ. सुनिल सहातपुरे, श्री माधव कोटस्थाने, डॉ. के. डी. ठाकुर, श्री नितीन कुळकर्णी, डॉ. हितेंद्र सिंग, श्री मारेश्वर वानखेडे, श्री दिनेश ठाकरे, श्री दिनेश सुर्यवंशी, श्री राकेश मानकर, श्री किरण पातुरकर,श्री मनोज जवंजाळ, समय बन्सोड, डॉ. प्रकाश कडू, श्री नरेंद्र जिवतोडे, बोरटकर आदि मान्यवर उपस्थित होते.

Advertisements

Latest बातम्या