Advertisements

Advertisements

Advertisements

Advertisements

नागपूरात हिवाळी अधिवेशनात शेगाव वरुन शेतक-यांचा निघणार धडक मोर्चा
आमदार रोहित पवारांची नागपूरात पत्रकार परिषदेत माहिती
दुष्काळासाठी राज्याने केंद्राला मागितले २९ हजार कोटी, मिळाले १ हजार कोटी!
दीड कोटींपैकी केवळ ५५ लाख शेतक-यांना मिळाले सरकारचे पाच हजार रुपये अनुदान
डबल,ट्रिपल इंजिन सरकारचे दावे फसवे:राज्य १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळात होरपळतोय:रोहित पवारांचा दावा
नागपूर,ता.२२ नोव्हेंबर २०२६: विदर्भ,मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र,कोकणातील भीषण दुष्काळ,शेतकरी,शेतमजूर,आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटूंबियांची अवस्था,त्यांची भेट घेणे,अडचणी समजून घेणे यासाठी विदर्भाच्या दौ-यावर आलो आहे. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी याबाबत राज्य सरकारला पत्र देखील लिहले,तातडीने उपाययोजनेसाठी पत्रात अनेक मागण्या मांडल्या मात्र,सरकारने पवार यांच्या पत्राची गेल्या सहा महिन्यांपासून कोणतीही दखल घेतली नाही.त्यामुळे नागपूरात पार पडणा-या हिवाळी अधिवशेनपूर्वी ४ डिसेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगावमधून विशाल ‘शेतकरी न्याय हक्क ट्रॅक्टर मोर्चा’काढण्यात येणार असल्याची माहिती आज नागपूरात, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिली.
या मोर्च्यात सहा जिल्ह्यातील शेतकरी,शेतमजूर,भूमिहिन,विद्यार्थी तसेच महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.एकीकडे खरीपाची फसल पूर्णपणे हातातून गेली असताना आता रब्बी पिकांवर देखील खूप मोठे संकट कोसळले आहे.या संकटाने शेतक-यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे.कर्जमाफी योजना जाहीर होऊन पाच महिने उलटले तरी दुष्काळग्रस्त ७० टक्के शेतक-यांना अद्याप मदत मिळाली नाही.दीड कोटी शेतक-यांपैकी फक्त ५५ लाख शेतक-यांपर्यंतच सरकारने घोषित केलेली पाच हजार रुपयांची मदत मिळाली आहे.महत्वाचे म्हणजेे राज्य सरकारने केंद्राकडे २९ हजार कोटींच्या मदतीची मागणी केली मात्र,केंद्राने फक्त एक हजार कोटींची मदत देऊन दुष्काळग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली.अडचणीत असलेल्या शेतक-यांसाठी सरकारच्या सर्व योजना या फक्त कागदांवरच राबविल्या जात असल्याची टिका याप्रसंगी त्यांनी केली.
महाराष्ट्रात दर आठ तासात एका शेतक-याची आत्महत्या घडत आहे.अवघ्या दीड महिन्यात १५५ शेतक-यांनी आपले जीवन संपवले.एकट्या विदर्भात २२ हजार कोटींच्या मदतीची गरज आहे.मराठवाड्यात १८ ते २३ तर पश्चिम महाराष्ट्रात २० हजार कोटींच्या मदतीची गरज आहे.मात्र,या सरकारकडून दुष्काळग्रस्त शेतक-यांसाठी व शेतीवर निर्भर असलेल्या शेतमजूरांसाठी काहीही घोषित झालेलं नाही.शेतमजूरांच्या प्रत्येक कुटूंबासाठी सरकारने पंचवीस हजार रुपये मदत जाहीर करावी.फळ बागा ज्यांच्याकडे आहेत त्यांना प्रति हेक्टर दीड लाख रुपये मदतीची मागणीही याप्रसंगी त्यांनी केली.२०१२ मध्ये शरद पवारांनी ३० हजार प्रति हेक्टरची मदत फक्त फळझाडं जगवण्यासाठी,पाणी देण्यासाठी जाहीर केली होती,अशी आठवण ही याप्रसंगी राेहित पवारांनी करुन दिली.
आजची महांगाई बघता या सरकारने फळबागा जणवण्यासाठी ६० हजार रुपये प्रति हेक्टरची मदत जाहीर करावी,अशी मागणी करीत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनाअंतर्गत जी कर्ज माफीची योजना आणण्यात आली होती,६७ टक्के शेतक-यांना अजूनही ती मदत मिळाली नसल्याचे रोहित पवार म्हणाले.ती पूर्ण मदत नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी पोहोचावी अशी मागणी त्यांनी केली.२०१७ आणि २०१९ मध्ये अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहीले आहेत त्यांना देखील या योजनेत सहभागी करुन घ्यावे तसेच जे नियमित शेतकरी आहेत त्यांना देखील या सरकारने एक लाखांची मदत जाहीर करावी,अश्या मागण्या रोहित पवारांनी केल्या.
याशिवाय एक रुपया पीक विमा योजना सरकारने पुन्हा सुरु करावी,या योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्वाचे असलेले चार ट्रिगर जे सरकारने काढले आहे यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी हा या योजनेपासून वंचित राहत आ,हे त्यामुळे परत सरकारने ते चारही ट्रिगर याेजनेत समाविष्ठ करावेअशी मागणी आम्ही या मोर्च्याच्या माध्यमातून करणार असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गेल्या वर्षी जी अतिवृष्टि झाली होती त्यावेळी साढे सतरा हजार प्रति हेक्टर पीक विम्याची मदत जाहीर केली होती पण अजूनपर्यंत ती मदत शेतक-यांपर्यंत पोहोचली नसल्याचे त्यांनी सांगितले.याशिवाय मायक्रो फायनांस अंतर्गत ग्रामीण भागात अनेक शेतक-यांनी कर्ज घेतले आहे मात्र,दुष्काळामुळे शेतकरी,शेतमजूर तसेच लहान-लहान व्यवसायिकांचीही आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्यामुळे, मायक्रो फायनांसची सक्त वसुली ही थांबवण्यात यावी तसेच यासाठी रिझर्व बँकेचे आदेश राज्य सरकारने मिळवावे कारण राज्य सरकार कायद्यानुसार रिझर्व बँकेच्या आदेशाशिवाय मायक्रो फायनांसकडून होत असलेली सक्त वसूली ही थांबवू शकत नाही,असे पवार यांनी सांगितले.याशिवाय ज्या माता-भगिंनीनी बचत गटासाठी व मायक्रो फायनांसकडून जे कर्ज घेतले आहे त्यावरील व्याज याची जबाबदारी राज्य सरकाने घ्यावी तसेच पुढच्या एक-दीड वर्षांपर्यंत शेतक-यांकडून कोणतीही वसूली होणार नाही याची पूर्णपणे दक्षता सरकारने तातडीने बैठक घेऊन घ्यावी अशी मागणी त्यांनी केली.
याशिवाय जनावरांच्या चा-यांसाठी देखील तातडीने उपाययोजनेची मागणी त्यांनी केली.यासाठी चार छावण्या सरकारने उभाराव्या किंवा शेतक-यांच्या घरापर्यंत जनावरांसाठी चारा पोहोचवण्याची व्यवस्था करावी किंवा डीबीटीच्या माध्यमातून शेतक-यांना मदत पोहोचवण्याची मागणी त्यांनी केली. याशिवाय शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी गरजू विद्यार्थ्यांना सरकारकडून मदत मिळावी,धान उत्पादक शेतक-यांना गेल्या वर्षीचा प्रलंबित बोनस तातडीने देण्यात यावा तसेच यंदा देखील मोठ्या प्रमाणात मदत सरकारने धान उत्पादक शेतक-यांसाठी जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली.इतर राज्यात ज्याप्रमाणे शेतक-यांना मदत खरेदी केंद्रावरच दिली जाते,तशीच मदत आपल्या राज्यात देखील सुरु करावी,अशी मागणी करीत वीस लिटर पाणी प्रति व्यक्ति मिळत आहे जे पुरेसे नसून चाळीस लिटर पाणी प्रति व्यक्ती देण्यात यावी तसेच जनावरांसाठी घरपोच पाणी मिळावे,अशी मागणी आम्ही आमच्या मोर्च्याच्या माध्यमातून करणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
याशिवाय मेंढपाल बंधू-भगिनी हे ज्या-ज्या ठिकाणी आपल्या जनावरांसोबत भटकंती करतात त्यांच्या जनावरांना त्याच ठिकाणी चारा मिळण्याची व्यवस्था सरकारने करावी.त्यांना पाणी द्यावे तसेच त्यांच्यासाठी दुष्काळाची तीव्रता बघता एखादी विशेष योजना राबवावी.याशिवाय ग्रामीण भागातील रोजगारावर दुष्काळाचा तीव्र प्रभाव पडला असून ,८० टक्के रब्बी पिकांची पेरणीच झाली नसल्याचे रोहित पवार म्हणाले.१९७२ मध्ये भीषण दुष्काळ पडला होता मात्र त्यावेळी ४५ लाख हेक्टरवर पेरणी तरी झाली होती यंदा रब्बीची पेरणी ही १५ लाख हेक्टरच्या पुढे सुद्धा गेलेली नाही,त्यामुळे यंदाचा महाराष्ट्रातील दुष्काळ हा १९७२ पेक्षाही भीषण असल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे एक विशेष रोजगार हमी योजना राज्य सरकारने आणावी तसेच‘जी-रामजी‘योजनेच्या ब-याच अटी केंद्र सरकारने अतिशय कठोर केल्या आहेत, त्या यंदाची दुष्काळी परिस्थिती पाहता शिथिल करण्यात यावी अशी मागणी करीत,नगर परिषद,नगर पालिका हद्दीतील गरीब लोकांवरही ग्रामीण अर्थव्यवस्था अडचणीत अाल्याने घर पट्टी,पाणी पट्टी देणे शक्य नाही.अगदी लहान दूकानदारांवर देखील जे व्यवसायिक कर लावण्यात आले आहे,ते दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या तालुक्यातील नगरपालिका,नगरपरिषदांनी पूर्णपणे माफ करण्याची मागणी त्यांनी केली.
याशिवाय पाणीच नसल्यामुळे मच्छीमार यांची देखील आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.त्यांच्या हाताला काम नाही अश्या लोकांना देखील सरकारने मदत जाहीर करावी,अश्या मागण्या घेऊन आम्ही ४ डिसेंबर रोजी शेगांव पासून मोर्च्याला सुरवात करणार असून ९ डिसेंबर रोजी आमचा मोर्चा विधी मंडळात पोहोचेल.आमची सर्व नेतेमंडळी हे संबंधित शासकीय यंत्रणांकडून विधीवत मोर्च्याची परवानगी उद्या जाऊन घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.सरकारला विनंती करतो की सरकारने मोर्चाची वाट बघू नये,सरकारला जे-जे काही दुष्काळग्रस्त शेतक-यांसाठी करता येईल त्या विषयी तातडीने निर्णय घेण्याची विनंती याप्रसंगी रोहित पवारांनी सरकारला केली.
याप्रसंगी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन व रोहित पवारांनी वीएसआर व्हेंचर्स या खासगी विमान कंपनीवर केलेले आरोप याविषयी प्रश्न केला असता, त्या कंपनीचे जे अनेक धंदे आहेत त्या धंद्याचे स्वरुप पाहता दादांसोबत ती कंपनी काही घातपात ही करु शकते,याविषयी आता आमच्या मनात संशय निर्माण झाला असल्याची कबुली त्यांनी दिली.आमचं प्रामाणिक मत आहे की आमच्या प्रामाणिक प्रश्नांना उत्तर द्या मात्र,उत्तर सत्ताधारी नेत्यांनी देण्या ऐवजी प्रवक्तेच,काय बोलायचे आहे हे नेत्यांकडून ऐकून बोलतात आहेत.दादांच्या अपघाताचा तपास हा पारदर्शी पद्धतीने व्हावा हीच आमची मागणी आहे.महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात संशय निर्माण झाला असून जनतेला पटेल असा तपास झाला पाहिजे एवढीच आमची मागणी असल्याचे रोहित पवार म्हणाले.
व्हीएसआर नावाच्या कंपनीच्या विमानात अजित दादांसोबत ही घटना घडली असून या कंपनीच्या मालकाचे व केंद्रीय विमान वाहतूक मंत्री यांच्यात खूप सलोख्याचे संबंध आहेत.मुख्यमंत्री फडणवीसांचेही या विमान कंपनीच्या मालकाशी जवळीकीचे संबंध सगळ्यांना दिसून पडत आहेत.मग या लोकांचे संबध व्हीएसआर कंपनीचे मालक व वी.के.सिंगसोबत असतील तर दादांच्या संशयास्पद अपघाताचा तपास पारदर्शक पद्धतीने कसा होईल,असा प्रश्न आम्हाला पडत असल्याचे ‘मफलर मॅन‘संबंधी प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले.एफआयआर झाला असता,सीबीआने तपास केला असता,कारवाई झाली असती,संशयास्पद कंपनीची विमाने थांबिवली गेली असती तर आम्ही समजू शकलो असतो की त्यांच्यात सलोख्याचे संबंध असतानाही दादांच्या मृत्यूचा तपास मित्र म्हणून तरी पारदर्शीपणे होत आहे,असा टोला त्यांनी हाणला.
मी दादांच्या अपघाती निधनाबाबत साधा संशय व्यक्त केला आहे मात्र,भाजपची संपूर्ण सोशल मिडीयाची चमू व त्यांचे नेते हे व्यक्तिगत टिकेवर घसरतात.मी अश्या टिकांना घाबरत नाही पण राजकीय दृष्टिकोणातून आम्हाला या सरकारकडून उत्तर हवं नसून आम्ही ज्या तांत्रिक बाबी उपस्थित केल्या आहेत,त्याला उत्तर द्या.दादांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूबाबत उत्तर देण्या ऐवजी या सरकारमधील नेते त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारी व्हीएसआर विमान कंपनी कशी आणि किती चांगली आहे हेच सोशल मिडीयावर दाखवतात आहे व त्यांचे नेते बरगळतात आहे.मूळात व्हीएसआर किती चांगली विमान कंपनी आहे हा माझा प्रश्नच नाही,माझा प्रश्न हा दादांच्या बाबतीत जे ठराविक मुद्दे व प्रश्न मांडले आहे फक्त त्याचेच उत्तर आम्हाला या सरकारकडून हवे आहेत.हे उत्तर फक्त मला हवे नसून अख्ख्या महाराष्ट्राला हे उत्तर सरकारडून हवे असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारमधील नेत्यांनी माझे पुतळे जाळले जरी मला काहीही फरक पडत नाही कारण माझा प्रश्न राजकीय नाहीच.अपघातानंतर दादांचा तो संपूर्ण जळालेला चेहरा अजूनही माझ्या मेंदूतून आणि मनातून जात नाही आहे.तो चेहरा रात्री मला झोपू देत नाही,त्यामुळेच भावनिकरित्या मी खूप अस्वस्थ असून,फक्त दादांना न्याय मिळावा यासाठी माझे प्रश्न या सरकारला आहे.जर राजकारणात असून दादांना न्याय मिळून देऊ शकत नसेल तर गरीबांना न्याय कसा देणार?या अनुषगांने आमचा हा लढा प्रामाणिक आहे,असे ते म्हणाले.
दादांच्या न्यायाच्या लढाईत पवार कुटूंबियांपैकी आणखी कोणी पुढे का येत नाही?असा सवाल केला असता,सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत राहूल गांधींसोबत मला भेटवून दिल्याचे त्यांनी सांगितले.याशिवाय काँग्रेसच्या अनेक नेत्यांसोबत सुळे यांनी माझी भेट घालून दिली.कर्नाटकमधील काँग्रेसच्या सरकारनेच आमचा झिरो एफआयआर नोंदवून घेतला,याशिवाय उद्धव ठाकरेंंच्या पक्षातील नेते हे देखील आमची बाजू लावून धरतात याशिवाय अजित दादांचे दोन्ही पूत्र पार्थ व जय हे देखील त्यांच्या-त्यांच्या परीने प्रयत्न करीत असतील,त्यामुळे आम्ही दादांना न्याय देण्यासाठी सगळेच लढत आहोत फक्त वेगवेगळ्या लोकांची पद्धत ही वेगवेगळी असते,असे ते म्हणाले.
आम्ही सत्तेत नसल्याने मिडीया समोर येऊन मुद्दे मांडतो,आमच्याकडे जे काही पुरावे येतात ते आम्ही सीआयडीला देतो,त्या वरती एआय,डीजीपीएलाही पुरावे देतो,याशिवाय मीडीयाच्या माध्यमातून हा विषय देशातील जनतेसमोर देखील पोहोचवित असल्याचे रोहित पवार म्हणाले.
अजित दादांना न्याय देण्यासाठी ‘मफलर मॅन’ची पत्रकार परिषद रोहित पवार यांनी सुरु केली असता अनेक मराठी वृत्त वाहिन्यांनी ती अचानक पत्रकार परिषद दाखवणे बंद केले व ‘चला आता वळू या इतर महत्वाच्या बातम्यांवर’असे सांगत पत्रकार परिषदेचे प्रसारण थांबवले,परिणामी महाराष्ट्रातील मराठी माणसांना तुमची पत्रकार परिषद युट्यूब चॅनलवर पाहावी लागली,याकडे लक्ष वेधले असता,मराठी असो किंवा हिंदी पत्रकार,सगळ्यांचे सहकार्य आम्हाला मिळत असल्याचे ते म्हणाले.या पूर्वीच्या शेतकरी,कष्टकरी, विद्यार्थी,युवा यांच्याविषयीच्या वृत्तांना चांगले प्रसारण मिळाले.आता आम्ही जो शेतक-यांच्या न्याय हक्कांसाठी मोर्चा काढणार आहोत त्यातही वृत्त वाहिन्यांचे सहकार्य आम्हाला लाभणार आहे.नेमकी ‘मफलर मॅन’ची पत्रकार परिषद बंद कशी केली गेली,यावर आम्ही तक्रार करु शकत नाही,पत्रकारांवर आम्ही काहीही बोलू शकत नाही मात्र,वृत्त वाहीन्यांचे जे मालक आहेत त्यांच्यावर दबाव येऊ शकतो,त्या दबावाला मी काही करु शकत नाही, पण मराठी पत्रकार असो किंवा हिंदी पत्रकार किंवा सोशल मिडीया असो किंवा रिल्स स्टार करणारे असो,छोटे स्थानिक पत्रकार किंवा छोट्या स्थानिक वृत्त वाहिन्यांचे पत्रकार असो त्या सगळ्यांनी आता पर्यंत अजित दादांच्या विषयात खूप प्रामाणिकपणे आम्हाला मदत केली असून ती मदत मी कधीही विसरणार नाही. त्यासोबत आणखी एक महत्वाचे म्हणजे आमच्याबद्दल जे राजकारणातून बोलल्या जातं त्यावेळी सामान्य परिवारातले लोक, ज्यांचा राजकारणाशी काही एक घेणं देणं नाही असे लोकं देखील आमची बाजू घेतात,हे बघितल्यानंतर महाराष्ट्र हे स्वाभिमानी लोकांचं राज्य असल्याची खात्री पटते व जेव्हा -केव्हा काही राजकीय लोकांवर अन्याय केला जातो तेव्हा राजकारणात असले काय नसले काय,ताकद असली काय नसली काय,पैसा असला काय नसला काय तरी सुद्धा ते लोकं स्वाभिमानाबरोबर राहतात,मला हा अनुभव या सगळ्या विषयातून मिळालेला आहे,असे उत्तर त्यांनी दिले.
४ डिसेंबरचा मोर्च्यात आघाडीतील पक्ष सहभागी होणार का?या प्रश्नावर बोलताना, हा मोर्चा कोण्या एका पक्षाचा नसून सगळ्यांना खुले आवाहन आहे त्यांनी यात सहभागी व्हावे.या अधिवेशनात इतर कुठल्याही राजकीय विषयावर चर्चा आम्हाला नको असून फक्त राज्यातील दुष्काळ व संकटात असलेला शेतकरी यावरच चर्चा हाेणार,असा इशारा देखील याप्रसंगी रोहित पवारांनी सरकारला दिला.
आनंदराज आंबेडकरांनी दिवंगत अजित पवारांविषयी केलेले वादग्रस्त विधान याकडे लक्ष वेधले असता,आनंदराज आंबेडकर फार मोठ्या घरातून आले आहेत,त्यांचे हे विधान अत्यंत दूर्देवी असून त्या विधानाचे मी निषेध करतो,असे ते म्हणाले.जो व्यक्ती जगात नाही त्यांच्याविषयी आपल्या भाषणात उपरोधिक बोलणे योग्य नाही.आनंदराज आंबेडकरांचे विधान त्यांच्या त्यांच्या फार मोठ्या परिवाराला,घराला शोभणारे नाही,त्यांनी महाराष्ट्रा समोर दिलगिरी व्यक्त करावी,असे रोहित पवार म्हणाले.
संसदेत लवकरच पुन्हा येऊ पाहणारा मतदारसंघ पुर्नबांधणी(डीलिमिटेशन)च्या विधेयकाला शरद पवार गटाकडून मिळणारा पाठींबा याविषयी छेडले असता,अद्याप या विधेयकाचा मसुदाच तयार झाला नसून तो पुढे आला नाही.एकदा मसुदा समोर आला की आमचा पक्षा त्यावर स्पष्ट भूमिका घेईल,हे सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले.काँग्रेसची देखील हिच भूमिका असल्याचे ते म्हणाले.
भीमाशंकर(कर्जत)मध्ये झालेली हजारो हेक्टर जंगलतोड यासारखेच आता गडचिरोलीतील वीजेच्या प्रकल्पासाठी केली जाणारी १४०० हेक्टरची जंगलतोड यावर प्रश्न केला असता,कोणत्याही प्रकल्पासाठी सरकारने ग्रामपंचायत,स्थानिक नागरिक,लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घ्यायला हवे,असे ते म्हणाले.अचानक एखाद्या प्रकल्प घोषित होतो व स्थानिकांना मानसिक धक्का बसतो.एआय डेटा सेंटर तर भारतात कुठेही बनायला नको कारण लाखो लिटर पाणी सातत्याने डेटा सेंटरमधील उपकरणे थंड ठेवण्यासाठी वापरले जाते.मात्र,सगळे पाणी व पर्यावरणाची नासाडी करणारी प्रकल्पे महाराष्ट्रात तर नोकरी व राेजगार देणारी प्रकल्पे गुजरातमध्ये होत असल्याची टिका त्यांनी केली.
…………………………………………
Advertisements
