Advertisements

Advertisements

विश्वास नांगरे पाटील यांच्या प्रेरणादायी विचारांनी दिवाळी मिलन सोहळा भावूक
संदीप जोशी यांनी मांडली ‘सोबत पालकत्व’ आणि ‘अनोखा बाजार’ या उपक्रमांची संकल्पना
नागपूर, १ नोव्हेंबर :सामाजिक बांधिलकी जपत गरजू कुटुंबांना मदतीचा आधार देण्याच्या उद्देशाने सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘सोबत पालकत्व’ आणि ‘अनोखा बाजार’ या दोन सामाजिक उपक्रमांचा दिवाळी मिलन सोहळा रविवारी उत्साहात पार पडला. ज्येष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या प्रेरणादायी विचारांनी या सोहळ्याला भावनिक आणि माणुसकीचा स्पर्श लाभला. त्यांच्या हस्ते ‘अनोखा बाजार’चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी आमदार संदीप जोशी यांची उपस्थिती होती.
विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या प्रेरणादायी विचारांतून उपस्थितांना माणुसकीचा सुंदर संदेश दिला. “देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे,” या कवितेच्या ओळींचा संदर्भ देत त्यांनी देण्यामागील खरी भावना स्पष्ट केली. समाजातील गरजू व्यक्तींना मदत करताना केवळ वस्तूंचे दान नव्हे, तर त्यांच्याप्रती आदर आणि आपुलकीची भावना जपणे महत्त्वाचे असल्याचा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.
संदीप जोशी यांनी प्रास्ताविकातून, दोन्ही सामाजिक उपक्रमांची सुरुवात कशी झाली, त्यामागील विचार काय होता आणि समाजातील गरजू घटकांना मदतीचा आधार देण्याची प्रेरणा कशी मिळाली, याची संकल्पना मांडली. समाजातील वंचित घटकांसोबत आनंद वाटून घेण्याची भावना आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव या उपक्रमांच्या केंद्रस्थानी असल्याचे त्यांनी सांगितले.
‘दिवाळी मिलन’ उपक्रमांतर्गत कोविड-१९ महामारीमुळे आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या २८९ कुटुंबांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करण्यात आला. फाउंडेशनने या कुटुंबांचे पालकत्व स्वीकारले असून, त्यांना दिवाळीचा फराळ आणि रेशनचे वाटप करण्यात आले.
‘अनोखा बाजार’ या उपक्रमातून घरात वापराविना पडून असलेल्या वस्तू गरजू व्यक्तींपर्यंत सन्मानाने पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. दानशूर नागरिकांनी दिलेल्या सायकली, अभ्यासाची टेबले, पुस्तके, संगणक, कपाटे, घड्याळे, भांडी, खेळणी आणि कपडे अशा विविध वस्तू या बाजारात उपलब्ध करून देण्यात आल्या.
या दोन्ही उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी अनोखा बाजारचे संयोजक प्रणव घुगरे, ‘सोबत पालकत्व’ प्रकल्पाच्या संयोजिका ज्योत्स्ना कुऱ्हेकर, तसेच संदीप मानकर, मंजुषा जोशी, गजानन निशितकर, आनंद टोळ, प्रकाश रथकंठीवार, प्रणय मोहबंसी, कौशिक जोशी आणि वंदना शर्मा यांनी विशेष परिश्रम घेतले.
………………………………….