Advertisements

Advertisements

Advertisements

(पदवीधर निवडणूक-२०२६)
पिंजून काढले संपूर्ण बूथ!शताब्दी वर्षासाठी संघही रस्त्यावर
नागपूरात अंदाजे ६०.२० टक्के मतदान: पदवीधर निवडणूक अटीतटीचीच
एकूण मतदान अंदाजे ६०.६९ टक्के
क-हाळे मास्तरांची खेळी त्यांच्यावरच उलटली?
अनुसूचित जाती-जमातींच्या मतांमागे दडलंय काय?
पहील्या पसंदीचा कोटा पूर्ण करणे अशक्य:राजकीय विश्लेषकांचा दावा
दुस-या पसंदी क्रमांकातून अंदाजे पाच ते सात हजारांच्या मताधिक्याने वंजारी होणार विजयी!
यंदा ही मतदार यादीमध्ये घोळच:आचार संहितेची ऐसीतैसी
डॉ.ममता खांडेकर
(मुख्य संपादक ‘सत्ताधीश’)
नागपूर,ता.२३ ऑक्टोबर २०२६: नागपूर जिल्हा पदवीधर मतदारसंघात २ लाख ५५ हजार ६०३ नोंदणीकृत मतदार होते ,यात ही नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक एक लाख ४४ हजार ४६६ पदवीधर मतदार होते,त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघासह नागपूरातील अनेक बूथवर दिवसभर प्रत्यक्ष हजेरी लावल्याने दीड लाख मतदारांसाठी मुख्यमंत्र्यांना स्वत: निवडणूकीच्या रणांगणात उतरावे लागले असल्याने,भाजपसारख्या सत्ताधारी व अतिशय बलशाली राजकीय पक्षासाठी ही ‘शोकांतिका’मानली जात आहे.दुसरीकडे संघाचे हे शताब्दी वर्ष असल्याने काहीही करुन हा मतदारसंघ भाजपनेच जिंकायला हवा यासाठी संघाचे स्वयंसेवक हे देखील मैदानात उतरले होते.त्यांच्यासाठी पक्षाच्या उमेदवारापेक्षा पक्ष महत्वाचा असतो.बंडखोर अनिल सोले यांना जर भाजपने पदवीधरची उमेदवारी बहाल केली असती तर वंजारींसाठी ही निवडणूक कठीण झाली असती असे राजकीय विश्लेषकांचे म्हणने आहे कारण,सोलेंसाठी ब्राम्हण वर्गासोबतच संघाने आपली संपूर्ण ताकत पणाला लावली असती,असे खासगीत वंजारी यांनीच मत व्यक्त केले होते.संदीप जोशींविरोधात मात्र वंजारी यांना सहजपणे ओबीसींची मोर्चेबांधणी एकजुट करता आली होती.
मुख्यमंत्र्यांच्या या बूथनिहाय दौ-यामुळे भाजपचे आमदार,पदाधिकारी व कार्यकर्त्यांपर्यंत ‘पक्षच‘सर्वतोपरी हा संदेश ‘योग्यरित्या’ पाेहोचला व याचा फायदा भाजप उमेदवार सुधाकर कोहळेंना होईल,अशी चर्चा सुरु आहे.निवडणूक प्रमुख असलेले मध्य नागपूरचे भाजप आमदार प्रवीण दटके यांच्यावरील दबावही स्पष्टपणे जाणवत होता.त्यांनी ही झोकून देऊन ‘पक्षाचे‘काम इमाने इतबारे केले.महत्वाचे म्हणजे भाजप कार्यकर्त्यांसाठी आज ‘मिशन कोहळे’नसून ’मिशन भाजप’हाच होता.त्यात ‘परंपरे’नुसार संघ देखील रस्त्यावर उतरुन भाजपच्या विजयासाठी कार्यरत दिसला.जानेवारीमध्ये पार पडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणूकीत देखील संघाच्या मनात भाजप विरोधात अनेक गोष्टी होत्या(भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे,भाजपला जिंकण्यासाठी संघाची आता गरज नाही,मोदी ही काफी है, हे केलेले वादग्रस्त विधान) तरी देखील ‘हिंदूत्वाची’भावना वरचढ ठरली व अखेर कमळाबाईचेच बटण दाबून संघाच्या स्वयंसेवकांनी मनपा निवडणूकीतही आपली हिंदूत्ववादी विचारधारा जपली याची चर्चा त्या काळीदेखील चांगलीच रंगली होती.
या निवडणूकीत ‘तेली वर्सेस कुणबी’ हा देखील अँगल चांगलाच प्रभावी असल्याचे विश्लेषक सांगतात.चंद्रपुरमध्ये कुणबी असलेले कोहळे चांगली लीड घेतील असा अंदाज आहे.चंद्रपूरमध्ये कुणबी असलेल्या प्रतिभा धानोरकर यांचे चांगलेच वर्चस्व आहे,या निवडणूकीत बंटी भांगडीयांची चांगली साथ लाभल्याचे बोलले जात आहे.दुसरीकडे भाजपमधील काही टक्के तेली मते वंजारीकडे वळली असल्याचे बोलले जात आहे.हीच बाब काँग्रेसमधील कुणबी मतांसोबत देखील घडली.मात्र,ओबीसीमध्ये तेलींची कोणत्याही निवडणूकीत एकजूटता हा नेहमीच चर्चेचा विषय राहीला आहे.धानोरकर महाविकासआघाडीसाठी फार ताकदीने मैदानात उतरल्या नाहीत मात्र,उघडपणे वंजारी यांचा विरोध ही केला नाही.याशिवाय मुस्लिम मते ९० टक्के वंजारींकडे वळली असून अनुसूचित जाती-जमातीची दुस-या पसंदीची मते ही वंजारींनाच मिळाली असल्याची चर्चा आहे.
नागपूर पदवीधरक मतदारसंघात एकूण ३८ उमेदवार रिंगणात असून यातील किमान २० उमेदवार एका बलशाली राजकीय पक्षानेच उभी केल्याचे बोलले जात आहे.अनुसूचित जाती-जमातीला भाजपची विचारधारा जरी पटत नाही तरी त्यांची मते वंजारींकडे वळू नये यासाठी डमी उमेदवार उभे केल्याची चर्चा आहे मात्र,या उमेदवारांना जरी त्यांच्या-त्यांच्या जाती-जमातीतील पहील्या पसंदीची काही मोजकी मते मिळणार असली तरी दुस-या पसंदी क्रमांकाची मते ही वंजारी यांनाच मिळाली असल्याची खात्रीलायक माहिती आहे.अनुसूचित जाती-जमातीचे मतदार हे राजकीय बाबीमध्ये अत्यंत जागरुक असून भावनेच्या आहारी जाऊन मतदान करीत नाही किंवा एखाद्या हिंदूत्ववादी संघटनेसारखी भ्रमिष्टपणेही मतदान करीत नसल्याचे बोलले जात आहे.
मतदाना पूर्वीच्या अनेक बैठकीतही ‘आरएसएस विरुद्ध दीक्षाभूमीची’ लढाई असल्याचे मत मतदारांमध्ये होते व आरएसएसचा विजय म्हणजे दीक्षाभूमीचा पराभव ही भावना त्यांच्यात होती.त्यांच्या मनात वंजारींसाठीही नाराजी होती कारण अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरण,जातीय जनगणना इत्यादी विषयावर वंजारी हे विधान परिषदेचे आमदार असतानाही काहीच बोलले नाहीत मात्र,ही त्यांची खंत प्रासंगिक होती.यामुळेच पहील्या पसंदीचे मत जरी त्यांनी जातीच्या उमेदवाराला दिले असले तरी दुस-या पसंदीचे मत वंजारींकडे वळले असल्याचा दावा केला जात आहे.येत्या २७ तारखेला वंजारी यांना तेली,मुस्लिम,अनुसूचित जाती-जमातीची मते तारणार का,हे स्पष्ट होईल.
यंदाच्या निवडणूकीत ओबीसी नेते बबनराव तायवाडे हे वंजारींसाठी त्या ताकदीने २०२० सारखे रणांगणात नव्हते,अशी देखील चर्चा आहे मात्र,येत्या सात-आठ महिन्यात शिक्षक मतदारसंघाची निवडणूक येऊन ठेपली आहे व तायवाडे यांचे पसंदीचे उमेदवार विद्यमान आमदार सुधाकर अडबाले यांना पुन्हा रिंगणात उतरावयाचे असल्याने, तायवाडे यांना वंजारी यांच्यासाठी आज थोडे फार फिरावे लागले मात्र,छूपा पाठिंबा भाजपला होता,हा आक्षेप देखील ऐकू आला.
कोहळे यांच्यासाठी स्वत:राज्याचे मुख्यमंत्री यांना आज नागपूरात बुथनिहाय फिरावे लागले व त्याचा फायदा कोहळे यांना नागपूरात लीड घेण्यात जरी होणार असला तरी ग्रामीण भागात वंजारी ती भरुन काढतील,असा कयास आहे.राष्ट्रवादीचे बंडखोर मास्तर नीतेश क-हाळे यांनी सात ते आठ हजार मते जरी खेचली तर त्याचा फायदा वंजारी यांना होईल,असे विश्लेषक सांगतात.वर्धेमध्ये ५० ते ५५ टक्के मत हे वंजारी यांना पडली असून ४५ टक्के मत भाजपकडे गेली आहेत.क-हाळे मास्तरांनी आर्वी,कारंजामध्ये चांगली आघाडी घेतली असल्याची चर्चा आहे.क-हाळे हे स्वत: शिक्षक आहेत आणि शिक्षकांच्या तोंडी ‘साले..पोट्टे हो’या सारखी भाषा शोभत नाही.निदान महाराष्ट्रसारख्या मराठी मुलखात तरी मास्तरांची एक सभ्य प्रतिमा समाजमनात रुजली आहे.त्यामुळेच डिजिटल माध्यमांवर जरी क-हाळे मास्तरांची फॅन फॉलोईंग खूप जास्त असली तरी फेसबूकचा फॉलोवर हा वोटर होत नसतो.
वंजारी यांच्यासाठी सर्वात जास्त अपेक्षाभंग करणारी बाब ठरली ती म्हणजे भंडारा-गोंदियामध्ये झालेले सर्वाधिक कमी मतदान.भंडा-यात २१ हजार ३४९ मतदारांपैकी १४ हजार ३१९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर गोंदीयात २२ हजार १७६ मतदारांपैकी १५ हजार ८६२ मतदारांनी मतदान केले.नाना पटोले यांचा भंडारा-गोंदिया हा गड मानला जातो तसाच तो प्रफूल्ल पटेलांचाही आहे.२०२० मध्ये पटेल हे महाविकासआघाडीचे घटक होते यंदा ते महायुतीमध्ये आहेत.महत्वाचे म्हणजे आघाडीमधील नेत्यांची मनधरणी करण्यातच काँग्रेसच्या उमेदवाराची शक्ती खर्ची पडत असल्याने यंदा भंडारा-गोंदियातून मतदानात अनपेक्षीत निकाल येण्याची शक्यत आहे.नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्यात जसा छूपा वाद आहे तसाच भोंडेकर व परिणय फूकेंमध्ये देखील दिसून पडतो.भोंडेकरांनी ही निवडणूक गांर्भीयाने घेतली नसल्याची कार्यकर्त्यांमध्येच कुजबुज आहे.
या तुलनेत गडचिरोलीमध्ये मात्र महाविकासआघाडी एकजुट दिसून पडली.परिणामी जो डॅमेज नागपूर शहरामध्ये वंजारी यांना होणार आहे ती कसर गडचिरोलीसह ग्रामीण भागात भरुन निघणार असल्याचा दावा केला जात आहे.
थोडक्यात,सकाळी ८ वा.पासून दुपारी ४ वाजेपर्यंत निवडणूक आयोगाच्या अंदाजानुसार १ लाख ६५ हजार ५४१ इतके मतदान झाले असून ६४.७६ टक्के मतदानाचा अंदाज आयोगाने आज रात्री ११ वाजेपर्यत वर्तवला आहे.यातून आता विजयासाठी पहील्या पसंदीच्या मतांचा कोटा ठरविला जाईल.बहूतांश वेळा पहील्या फेरीत तो कोटा उमेदवाराला गाठता येणे शक्य नसतो. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र,कोहळे हे पहिल्याच पसंदी फेरीत विजयी होतील असा दावा केला आहे.भाजपच्या कोहळे यांनी पहील्याच फेरीत तो कोटा गाठला तर संघाच्या शताब्दी वर्षाचा जल्लोष भाजपाला साजरा करण्याची संधी मिळेल अन्यथा दुस-या पसंदी क्रमांकाची मते वंजारी यांना निश्चितच पुन्हा एकदा २०२० सारखीच विजयश्री मिळवून देणार असल्याचा दावा केला जात आहे.विजयाचे मताधिक्य यंदा २०२० सारखे १७ हजार राहणार नसून ५ ते ७ हजार मतांचे राहील,असा कयास लावला जात आहे.
उदाहणार्थ पहील्या पसंदीची कोहळे यंदा ६८ हजार मते मिळाली व वंजारी यांना ६५ हजार मते मिळाली तरी मतांचा कोटा जर कोहळे पूर्ण करु शकले नाहीत तर दुस-या पसंदी क्रमाकांच्या मतांची मोजणी होईल व यात वंजारी हे ७५ ते ८० हजार मतांपर्यंत मजल मारुन विजय खेचतील असा दावा विश्लेषक करतात.
यंदा देखील दुबार तसेच बोगस मतदारांचा विषय चांगलाच गाजला.ऐन निवडणूकी पूर्वी अश्या हजारो मतदारांकडून कागदपत्रे घेऊन ठेवण्यात आल्याची चर्चा आहे.त्यांचे बारकाईने विश्लेषण केले व त्यातील जे पक्षाच्या राजकीय विचारधारेच्या विरोधात जातील असे अर्ज पेंडिंग ठेवण्यात आले असा देखील आरोप झाला मात्र,संघ,भाजप किंवा कोहळे यांनी कितीही प्रयत्न केले तरी ओबीसींवर मात करु शकत नसल्याचे सांगत, भाजपच्या संघटनात्मक शक्तीचे मात्र विरोधक ही भरपूर कौतूक करतात.
निवडणूकीच्या रणधुमाळीत हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसींच्या विविध संघटनेची बैठक पार पडली.या बैठकीत मात्र वडेट्टीवारांनी वंजारींसाठी एक शब्द ही खर्ची केला नाही.याच बैठकीत आमदार मेश्राम आले होते मात्र,वंजारींनी घेतलेल्या बैठकीत ते दिसले नाहीत.असे असले तरी मतदानाच्या दिवशी वडेट्टीवारांनी वंजारींसाठी जोर लावला असल्याचा दावा काँग्रेसचे नेते करीत आहेत.
याशिवाय सध्या गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत भाजपच्या विरोधात भयंकर असंतोषाचे वातावरण आहे.दिल्लीतील जंतर-मंतरवर ज्या प्रमाणे २३ जुलै रोजी जेन-झीचे आंदोलन पोलिसांनी ज्या निर्दयतेने चिरडले त्यावरुन पालकांच्याही मनात भाजपविषयी संतापाची भावना आहे.त्यामुळेच कोल्हापूरच्या गोकूळ दूध महासंघात मुख्यमंत्री फडणवीसांच्या विरोधात जे घडले त्याचीच पुर्नरावृत्ती नागपूरात होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.पंतप्रधान किंवा देशाचे गृहमंत्री हे मोदी व शाह असले तरी अजूनही ते आधी गुजरातचा विचार करुनच गुजरातच्या प्रगतीसाठीच धोरणे राबवितात.त्यांच्यातील व्यापारीपणा गेला नाही.याच वृत्तीतून गुजराती ‘अमूल’दूधाचे वर्चस्व देशभरात राबविण्यासाठी महानंदासारखेच त्यांना कोल्हापूरच्या गोकूळ दूध महासंघावरही ताबा मिळवायचा होता.जवळपास वीस लाख शेतक-यांची जीवन संजीवनी असणा-या गोकूळ दूधामुळे मुंबई-पुण्यासारख्या शहरात अमूलला आपली एकाधिकारशाही प्रस्थापित करणे अशक्य झाले आहे.
यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह महाडिक,मुश्रीफ,आमदार, खासदारांसह या निवडणूकीत पूर्ण ताकदीने उतरले. सर्वात आधी तर भाजपने ही निवडणूक टाळून महासंघावर प्रशासक नेमले.या विरोधात ठरवधारकांना न्यायालयात धाव घ्यावी लागली.यानंतर ठरावधारकांना अपात्र ठरवण्याचाही डाव सत्ताधा-यांनी खेळला.सतेज पाटील यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेऊन त्यांना पात्र ठरवले.
सत्ताधा-यांकडून संपूर्ण यंत्रणा गोकुळ दूध महासंघाच्या निवडणूकीत उतरवून देखील ठेवीधारकांना भर सभेत ‘देवीच्या शपथा’ देण्याचा प्रकार व त्यांना मत न दिल्यास ‘ब्रेन स्ट्रोक‘होण्याची धमकी उघडपणे देण्यात आली.याशिवाय अदृष्य शक्ती म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा नको तितका हस्तक्षेपही कोल्हापूरवासियांना रुजला नाही व त्याचे परिणाम सतेज(बंटी)पाटील यांनी अतिशय प्रतिकुल परिस्थिीतही १३ पदाधिकारी निवडून आणून गोकुळवर आपली सत्ता अबाधित ठेवली.राज्याचे मुख्यमंत्री एकीकडे एखाद्या शहराच्या दूध महासंघाच्या निवडणूकीत ही दिल्लीश्वरांची आज्ञा शिरोधार्य मानून आपल्याच राज्यातील ‘महानंदा‘ सारखीच नफ्यात असणारे गोकूळ दूधसंघ गुजराती ‘अमूल’च्या दावणीला बांधण्यासाठी सज्ज झाले. मात्र, कोल्हापुरवासियांनी, करविरवासिनीचा चांगलाच झटका मुख्यमंत्र्यांना दिला.त्याचीच परिणामी नागपूरात झाल्यास याचे दूरगामी परिणाम राज्याच्या राजकारणात झाल्याशिवाय राहणार नाही,यात दूमत नाही.शांत,सुसंस्कृत,सुशिक्ष्त,प्रतिभाशाली मुख्यमंत्री असणारी फडणविसांची छवि गोकुळ दूधसंघाने धूमिळ केली असून, स्वत:च्याच गृहनगरात नागपूर पदवीधरचा निकालही जर विपरीत लागला तर ही घटना राज्याच्याच नव्हे तर देशाच्या भविष्यालाच वैचारिक कलाटणी देणारी ठरेल असे देखील मानले जात आहे.
Advertisements

आचार संहितेची ऐसी तैसी-
आचार संहितेनुसार मतदानापूर्वी कोणत्याही उमेदवाराला आपला प्रचार करता येणार नाही.मतदारांवर प्रभाव टाकता येणार नाही मात्र,आज भाजप आमदार सुधाकर कोहळे यांची मोठमोठी चुनावी फलके छत्रपती नगर,यशवंत स्टेडियम,मेहाडिया चौक,मानकापूर,मेडीकल चौक,उदय नगरसह संपूर्ण नागपूरातील रहदारीच्या चौका-चौकात तशीच झळकत होती.याविषयी मनपा व निवडणूक यंत्रणेकडे तक्रार केली असता तपास करुन कारवाईचे सरकारी उत्तर तक्रारदात्यांना मिळाले.यावरुन निवडणूक जिंकण्यासाठी फक्त भाजप प्रयत्न करीत नसून प्रशासन त्यांच्या सोबतीने कसे असते याचे ‘आदर्श’उदाहरण आज नागपूरकरांनी पाहिले.अर्थात,हा पायंडा भाजपने ६५ वर्षे देशावर राज्य करणा-या काँग्रेसकडूनच उचलला आहे,हे ही तितकंच सत्य आहे.हीच मतदारांना प्रभावित करणारी फलके विरोधकांची असती तर हेच प्रशासन कश्याप्रकारे आचार संहिता भंग केल्याचा नियमाचा आधार घेऊन प्रतिस्पर्धी उमेदवाराची उमेदवारीच ऐन मतमोजणीतच बाद करण्यास सज्ज झाली असती,या विषयी कोणालाही शंका नाही मात्र,कोहळे हे सत्ताधारी भाजपचे उमेदवार असल्याने त्यांना आचार संहितेची ऐसी तैसी करण्याचा ‘कायदेशीर’हक्क आहे,असाच प्रशासनाचा समज आहे.
……………………………………..