Advertisements

Advertisements

पत्रकार परिषदेत अतुल लोंढेंनी केला पुरावा सादर
८ हजार ७४४ पदवीधर मतदारांची नावे दुबार!
एकाच एआय जनरेटेड मोबाईल क्रमांकावरुन २२ हजार बोगस मतदार नोंदणी!
निवडणूक आयोगही सहभागी!लोंढे यांचा घणाघात
नागपूर,ता.२२ ऑक्टोबर २०२६: पदवीधर नोंदणीसाठी आधारकार्ड व एआय जनरेटेड मोबाईल क्रमांकाच्या अाधारे तब्बल २२ हजार बोगस मतदारांची नोंदणी भाजपने केली असून ८ हजार ७४४ मतदारांची नावे ही दुबार असल्याचा धक्कादायक खुलासा आज पत्रकार परिषदेत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला.याप्रसंगी त्यांनी कागदोपत्री पुरावे देखील सादर केले.
या दुबार मतदारांनी कोणत्याही एकाच ठिकाणी मतदान करावे,त्यांचा तो संवैधानिक अधिकार आहे मात्र,हे दुबार नोंदणीकृत बोगस मतदार कुठेही दुसरीकडे मतदान करताना आढळले तर नागपूरातील सहाही जिल्ह्यातील प्रत्येक बुथवर काँग्रेसचा कार्यकर्ता हातात मतदार यादी घेऊन बसलेला आहे,चुकूनही दुबार मतदानासाठी आलात तर परिणाम भोगावे लागतील असा सज्जड दम याप्रसंगी लोंढे यांनी दिला.काँग्रेसचे कार्यकर्ते योग्य ताे प्रसाद देण्यास सज्ज झाले असून, आमच्या कॉल सेंटरला ही नावे आली असून एकदा मतदान झाल्याबरोबर जिल्ह्यात कुठेही दुबार मतदान काँग्रेस होऊ देणार नाही,त्यामुळे नागपूर,चंद्रपूर,गडचिरोली,गोंदिया,वर्धा.भंडारा इत्यादी ठिकाणी जाऊन दुबार मतदान करण्याचा प्रयत्न बोगस मतदारांनी करु नये,असा इशारा लोंढे यांनी दिला.या वेळी या निवडणूकीत आमच्याजवळ आम्ही सगळी अद्यावत यंत्रणा तयार ठेवली असल्याचे ते म्हणाले.
मूळात हे काम निवडणूक आयोगाचे आहे.अशा दुबार मतदारांना फक्त एका ठिकाणी ते ही त्यांच्या घरा जवळील मतदार केंद्रांमध्ये मतदानाची परवानगी देऊन इतर ठिकाणी मतदार यादीत असलेली त्यांची नावे ‘डिलीट’ करावी किंवा त्या नावांसमोर ‘डूप्लीकेट ’लिहावे,अशी विनंती आम्ही निवडणूक अायोगाला केली असल्याचे लोंढे यांनी सांगितले.
भाजपने देशाची लोकशाही किती धोक्यात आणली आहे,देशातील संवैधानिक संस्था कश्या गुलाम केल्या आहेत याचे आणखी एक उदाहरण म्हणजे निवडणूक आयोगाकडे रि-डूप्लीकेशन सॉफ्टवेअरचं बटन असताना फक्त एक क्लिक करुन ते बघण्याची व नावे दुरुस्त व डिलिट करण्याची देखील तसदी आयोग घेत नाही.एकाच मोबाईल क्रमांकाचा ५४३२१५४३२१ वापर करुन २० ते २२ हजार मतांची नोंदणी भाजपकडून करण्यात आली आहे!कशी झाली नोंदणी?निवडणूक आयोग झोपलं आहे का?निवडणूक अायोगाने भाजपलाच विजयी करण्याची पुन्हा एकदा तयारी केली आहे का,असा गंभीर आरोप लोंढे यांनी यावेळी केला.मूळात ५..४.. पासून सुरु होणारी फोन सिरीजच अस्तित्वात नाही तरी देखील या सिरीजमधून २२ हजार मते नोंदणीकृत झाली!
६ सप्टेंबर २०२६ रोजी नागपूर विभागीय आयुक्तांना माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती,काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफूल्ल गुडधे पाटील यांनी एक पत्र दिलं होतं,पण त्याचं आजपर्यंत उत्तर मिळालं नाही.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्य कार्यकारी व्यवस्थापक चोकरलिंगम यांच्यासोबत बोलून आमच्या तक्रारीवर काय करणार आहे,याचे उत्तर द्या अशी मागणी केली असता.यावर विभागीय आयुक्तांनी निवडणूक आयुक्तांसोबत बोलून काय कारवाई करता येईल,हे आम्ही बघू,असे उत्तर दिले.एका राष्ट्रीय पक्षाच्या शहराध्यक्षाच्या पत्राला अजून विभागीय आयुक्तांकडून उत्तर मिळाले नाही,वरुन भाजप आमच्यावरच ‘अराजक’पसरविण्याचा आरोप करते,असा टोला हाणत.अराजक कोण पसरवित आहेत हे जनतेला माहिती असल्याचे ते म्हणाले.
भाजपचे पदवीधर मतदार स्वत: भाजपमुळे त्रस्त झाले आहेत.पेंशन बंद केली,शिक्षक भर्तीचे प्रश्न,महाविद्यालयांचे प्रश्न यांची कोणतीही सोडवणूक नाहीच तर दुरीकडे प्रचंड बेरोजगारी निर्माण केली,लघु उद्योजकांना देशाेधडीला लावले,सर्रास कंत्राट भर्ती सुरु केली,तासिका भर्ती,शेअर मार्केट लोळवणे,पैसा घेऊन पळणे,याची सत्यता लोकांसमोर आली असल्याचे लोंढे म्हणाले.
आमच्याकडे या २२ हजार मतदारांविषयीची सगळी माहिती उपलब्ध असल्याचे ते म्हणाले.हे बोगस मतदार बोगस आधारकार्डच्या आधारे मतदानासाठी येतील,त्यांना मतदानापासून थांबवावे अशी विनंती आम्ही निवडणूक अायोगाला केली आहे,मात्र,लोकशाहीमध्ये लोकांच्या मतांद्वारे निवडून येणारे, लोकांच्या इच्छेचे सरकार असले पाहिजे,जिंकणे-हरणे ही बाब दुय्यम आहे.आम्ही आमचा पराभव देखील खेळाडू वृत्तीने स्वीकारत असतो मात्र अश्या रितीने आता भाजपला निवडणूका जिंकू देणार नसल्याचा निर्धार त्यांनी याप्रसंगी केला.
आम्ही या पूर्वी अश्या पद्धतीने लोकशाहीचा गळा घोटून लोकांची मते चोरली नाहीत मात्र,आता आम्ही देखील अद्यावत झालो असून भाजपची चोरी पकडण्यासाठी अश्या यंत्रणा आम्ही देखील विकसित केल्या असल्याचे लोंढे म्हणाले.
निवडणूकीला भाजप घाबरली-
हे सगळं सुरु आहे कारण भाजप आतून घाबरली आहे कारण काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला ॲड.अभिजित वंजारींना ४८ संघटनांनी समर्थन जाहीर केले आहे.त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दोन-दोन दिवस नागपूरात तळ ठोकून बसावं लागत आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांना वारंवार मॅसेज टाकावे लागत आहेत.मात्र,भाजपचा खरा चेहरा मतदारांसमोर आला आहे.याप्रसंगी लोंढे यांनी ४८ संघटनांची नावे वाचून दाखवली.यात अधिवक्तापासून मजूर संघ,शिक्षक संघापासून ते मुस्लिम फोरम,मागासवर्गीय ते दूकानदारसंघ,जिल्हा परिषद शिक्षक संघटनेपासून स्वाभिमानी संघटना,कास्ट्राईब संघटने पासून शारिरीक शिक्षण संघ,रोटरी क्लब चंद्रपूर ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर संघटना,कंत्राटदार संघटना पासून शाळा शिक्षकेत्तर संघटना इत्यादीचा समावेश आहे.
याच भीतीतून संविधान नामशेष करण्याचा व लोकशाही धोक्यात आणण्याचा उघड व्यापार भाजप करीत असल्याचा आरोप लोंढे यांनी केला.निवडणूक आयोगाला थोडी जरी लाज-शरम असेल तर त्यांनी निष्पक्षपणे उद्याची निवडणूक घ्यावी.आमचे नेते राहूल गांधी रस्त्यावर आहेत.प्रियंका गांधी,खर्गे,वेणूगाेपाल हे या देशात निष्पक्ष निवडणूका व्हाव्यात यासाठी रस्त्यावर आहेत असे ते म्हणाले.
निवडणूक आयोगाकडे २२ हजार बोगस मतदार व ८ हजार दुबार मतदारांची नावे दिली आहेत.ई मेल आम्ही नागपूरच्या आरोपासून राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले.महत्वाचे म्हणजे उद्याच्या निवडणूकीतही आयोग बोटाला शाईच वापरणार आहे व ती दोन दिवस मिटणार नाही असा दावा केला आहे.काँग्रेस उद्याची निवडणूक लोकशाहीचा पराभव होऊ नये यासाठीच लढत असल्याचे त्यांनी सांगितले.
…………………………………………………