Advertisements

अंशकालीन प्राध्यापक मेळाव्यात कायमस्वरूपी भरतीसाठीही प्रयत्न करण्याचे आश्वासन

नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंशकालीन प्राध्यापकांच्या समस्या, अडचणी आणि विविध मागण्या जाणून घेण्यासाठी मंथन फॉर अकॅडेमियाच्या वतीने अंशकालीन प्राध्यापक मेळाव्याचे आयोजन बुधवारी, २१ ऑक्टोबर २०२६ रोजी चिटणवीस सेंटर येथील टेमरिड हॉलमध्ये करण्यात आले. या मेळाव्यात भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकरराव कोहळे यांनी अंशकालीन प्राध्यापकांच्या मागण्या जाणून घेत त्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच, प्राध्यापकांच्या भविष्यातील सुरक्षिततेच्या दृष्टीने कायमस्वरूपी भरतीसाठीही प्रयत्न करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.अंशकालीन प्राध्यापकांना शिक्षण क्षेत्रात काम करताना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळावे, त्यांच्या मागण्यांची दखल घेतली जावी आणि या प्राध्यापक वर्गाच्या समस्या संबंधित स्तरावर मांडता याव्यात, या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला मंचावर डॉ. राजेश गादेवार, सिनेट सदस्य सुनील फुडके आणि डॉ.प्रदीप बिबटे, किशोर नैताम,डॉ नितीन कायरकर, डॉ भुपेंद्र घरत,डॉ रायन महाजन,डॉ हरीश बावनगडे उपस्थित होते. यावेळी अंशकालीन प्राध्यापकांच्या विविध समस्या, सेवाविषयक अडचणी आणि कायमस्वरूपी भरतीसंदर्भातील अपेक्षांवर चर्चा करण्यात आली.यावेळी बोलताना श्री. सुधाकरराव कोहळे यांनी अंशकालीन प्राध्यापकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. त्यांच्या न्याय्य मागण्यांची दखल घेण्यासाठी आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, कायमस्वरूपी भरतीच्या प्रश्नावरही पाठपुरावा करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कार्यक्रमाचे संचालन डॉ. राकेश कोरेकर यांनी केले, अंशकालीन प्राध्यापकांच्या समस्या आणि मागण्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा मेळावा संवादाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.