


नागपूर, २७ नोव्हेंबर :
शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, संशोधन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती मिळावी, तसेच बदलत्या हवामानाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम बनविण्याच्या उद्देशाने आयोजित मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ‘
ऍग्रोग्रोव्हिजन २०२६’ च्या पहिल्या दिवशी ‘शेती क्षेत्रातील स्टार्टअप आणि माहिती तंत्रज्ञान’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

अमरावती रोडवरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर झालेल्या या कार्यशाळेत बायोवाल ॲग्री प्रायव्हेट लिमिटेड (मित्रसेना)चे विजय ढोले, सहायक आयुक्त नीता औघड, स्वदेशी व्यापारी मंचचे बाळकृष्ण भरतीया आणि कृषी अभियांत्रिकी विभागप्रमुख (राहुरी) सुनील कदम वक्ते म्हणून उपस्थित होते.
विजय ढोले यांनी कृषी क्षेत्रातील स्टार्टअपच्या संधींविषयी माहिती दिली. ‘मित्रसेना’ कंपनीने शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी (एफपीसी) ‘मायक्रो फर्मेंटर’ हे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गावपातळीवरच ताजे जैविक खत आणि जैविक कीटकनाशक तयार करणे शक्य होणार आहे, असे ते म्हणाले.

नीता औघड यांनी कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधींविषयी मार्गदर्शन केले. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माध्यमातून युवकांना मोफत कौशल्य प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी आणि स्वयंरोजगारासाठी पाठबळ दिले जात आहे. सोलर, इलेक्ट्रॉनिक्स आणि कृषी क्षेत्रातील अल्पकालीन अभ्यासक्रमांचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. तसेच रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून कंपन्या आणि उमेदवार यांच्यात समन्वय साधला जातो. उद्योजकतेला चालना देण्यासाठी विविध महामंडळे आणि जिल्हा उद्योग केंद्रांच्या माध्यमातून प्रशिक्षण व आर्थिक साहाय्य दिले जाते. इनोव्हेशन सोसायटीमार्फत स्टार्टअप्स आणि नाविन्यपूर्ण कल्पनांना मार्गदर्शनासह निधी उपलब्ध करून दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
बाळकृष्ण भरतीया यांनी ‘खर्च कमी करण्यासाठी पारंपरिक शेतीची नव्या स्टार्टअपशी जोडणी’ या विषयावर विचार मांडले. शेती हे केवळ पारंपरिक काम नसून ते एक प्रगत कौशल्य आहे. शेतकरी हाच खरा उद्योजक आणि नवोन्मेषक आहे; मात्र चुकीच्या मानसिकतेमुळे शेतकरी स्वतःला कमकुवत समजत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सुनील कदम यांनी कृषी क्षेत्रातील ड्रोन स्टार्टअप आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराविषयी माहिती दिली. बदलते हवामान, मर्यादित पाणी, वाढता उत्पादन खर्च आणि मजुरांची कमतरता यांसारख्या आव्हानांवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अपरिहार्य असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन जितेंद्र सातपुते यांनी केले, परिचय डॉ. सी. डी. मायी तर आभार मोरेश्वर वानखेडे यांनी मानले.


आमचे चॅनल subscribe करा