Advertisements

Advertisements

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते राहणार उपस्थित
५० हजार नागरिक सहभागी होणार
नागपूर,५ नोव्हेंबर २०२६: देशभरात महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या ‘लोकशाही वाचवा – अराजकता हटवा’ अभियानाचा उद्या गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी नागपुरातून भव्य पदयात्रेने प्रारंभ होणार आहे. सायंकाळी ४ वाजता यशवंत स्टेडियम येथून या पदयात्रेला सुरुवात होणार असून, या पदयात्रेत तब्बल ५० हजार नागरिक सहभागी होतील, अशी माहिती भाजपचे नागपूर शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी दिली.या पदयात्रेचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत होणार आहे.
यशवंत स्टेडियमलगतच्या सर्कस ग्राउंड परिसरात भव्य मंच उभारण्यात आला असून, या मंचावर महायुतीच्या ५० प्रमुख नेत्यांसाठी आसनव्यवस्था करण्यात आली आहे. प्रारंभी महायुतीच्या प्रमुख नेत्यांचे मार्गदर्शन होईल. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागरिकांना संबोधित करतील. यानंतर प्रत्यक्ष पदयात्रेला प्रारंभ होईल.‘लोकशाही वाचवा – अराजकता हटवा’ असा संदेश देणारे भव्य बॅनर घेऊन मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, पालकमंत्री तसेच महायुतीचे सर्व प्रमुख नेते आणि हजारो नागरिक या पदयात्रेत सहभागी होतील. यशवंत स्टेडियम येथून सुरू होणारी ही पदयात्रा पंचशील चौक, झाशी राणी चौक, व्हेरायटी स्क्वेअर, झिरो माईल मेट्रो स्टेशन मार्गे संविधान चौक येथे पोहोचेल. तेथे भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पदयात्रेची सांगता करण्यात येईल.
देशात लोकशाही आणि संवैधानिक संस्थांविषयी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न होत असताना, विरोधकांकडून पसरविण्यात येणाऱ्या कथित चुकीच्या नरेटिव्हला उत्तर देणे, लोकशाही अधिक बळकट करणे आणि अराजकतेच्या प्रवृत्तीविरोधात जनजागृती करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. राष्ट्रवादाला सदैव अग्रस्थानी ठेवणाऱ्या नागपूरच्या प्रबुद्ध नागरिकांनी कोणत्याही राजकीय आग्रहापेक्षा लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी स्वयंस्फूर्तीने या पदयात्रेत सहभागी व्हावे आणि ही पदयात्रा भव्य व ऐतिहासिक स्वरूपात यशस्वी करावी, असे आवाहन भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी केले.
या पदयात्रेत केवळ नागपूर शहरच नव्हे, तर संपूर्ण विदर्भातून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार आहेत. विदर्भातील ज्या जिल्ह्यांमध्ये आमदार आहेत, तेथे संबंधित आमदारांच्या नेतृत्वात नागरिक उपस्थित राहतील, तर अन्य जिल्ह्यांमध्ये जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वात सहभागाचे नियोजन करण्यात आले आहे. संपूर्ण विदर्भातील पदयात्रेचे प्रमुख म्हणून आमदार प्रवीण दटके यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली असून, नागपूर शहरातील संपूर्ण पदयात्रेचे प्रमुख म्हणून आमदार कृष्णा खोपडे काम पाहणार आहेत.
पदयात्रेत सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी शहरात २० पार्किंग पॉइंट निश्चित करण्यात आले आहेत. पार्किंग व्यवस्थेवर पोलीस प्रशासनासोबत भाजपचे महामंत्री श्रीकांत आगलावे लक्ष ठेवतील. मंच व्यवस्थेची जबाबदारी महामंत्री रितेश गावंडे यांच्याकडे, महिला व्यवस्थेची जबाबदारी महामंत्री मनीषा धावडे यांच्याकडे, तर बाहेरून येणाऱ्या वाहनांच्या व्यवस्थेची जबाबदारी बाल्या बोरकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.रॅलीच्या यशस्वी साठी आमदार मोहन मते,आमदार संजय भेंडे,माजी आमदार गिरीश व्यास,अनिल सोले, सुधाकर देशमुख,मिलिंद माने, संघटन प्रमुख उपेंद्र जी कोठेकर लक्ष देत आहेत नागपूरसह संपूर्ण विदर्भातील महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोकशाहीच्या बळकटीकरणाचा संदेश द्यावा, असे आवाहन भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी केले.
………………………………………