
चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास

पदवीधर मतदार संघाच्या वचननाम्याचे प्रकाशन
नागपूर, १९ ऑक्टोबर पदवीधर मतदार संघाचे प्रतिनिधित्व आजवर अनेक दिग्गज नेत्यांनी केले व अनेक समस्यांची सोडवणूक केली. त्यामुळे यावेळी पुन्हा एकदा कोहळेंना मत दिल्यास केंद्र व राज्यातील डबल इंजिन सरकारच्या आशीर्वादाचा लाभ पदवीधरांना मिळेल, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
नागपूर विभाग पदवीधर मतदार संघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय आणि पीरिपा यांचे अधिकृत उमेदवार माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्या वचननाम्याचे प्रकाशन सोमवारी सकाळी पार पडले.

यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी खासदार रामदास तडस, आ. कृपाल तुमाने, माजी महापौर दयाशंकर तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर,कोषाध्यक्ष श्रीकांत शिवणकर ,आ. कृष्णा खोपडे, प्रा. अनिल सोले, आ. संजय भेंडे, आ. प्रवीण दटके, माजी आमदार मिलिंद माने, जाहीरनामा समितीचे अध्यक्ष गिरीश व्यास, आ. चरणसिंग ठाकूर, राजाभाऊ टांकसाळे, माजी आ. अशोक मानकर, डॉ. कल्पना पांडे, आनंदराव राऊत, अनिल शिवणकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना बावनकुळे यांनी, या वचननाम्यात पदवीधरांच्या विकासाचा आणि समस्या सोडवणुकीचा सर्वंकष आढावा घेण्यात आला असून कोहळेंना मत दिल्यास दोन्ही सरकारचे सहकार्य मिळून समस्या सुटतील, असा विश्वास व्यक्त केला.
बावनकुळे यांनी याप्रसंगी जाहीरनाम्यातील महत्त्वाच्या बाबींबाबत माहिती दिली. यात पदवीधरांच्या प्रगतीसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि कौशल्य विकास, रोजगार, करीअर आणि उद्योगांच्या संधी, नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि डिजिटल सक्षमता, महिला पदवीधरांसाठी विशेष उपक्रम, संपूर्ण विदर्भातील पदवीधरांना न्याय, पदवीधरांचा सशक्त संवाद व सहभाग, पारदर्शक, जनाभिमुख आणि उत्तरदायी व्यवस्था आदी बाबींवर काम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या वक्तव्यात, सुधाकर कोहळे यांना रिपाइंचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगत कोहळेंचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला.
प्रारंभी सुधाकर कोहळे यांनी मनोगत व्यक्त केले, तर वचननामा समितीचे अध्यक्ष गिरीश व्यास यांनी त्यातील ठळक वैशिष्ट्ये समजावून दिली. आभार प्रदर्शन प्रा. गिरीश देशमुख यांनी केले.
………………………………………….

आमचे चॅनल subscribe करा