Advertisements

Advertisements

Advertisements

अखेर शासकीय स्वाती बंगला बिल्डरच्या घश्यात
सीताबर्डी पोलिसांनी ग्राह्य धरली ‘अवैध‘ कागदपत्रे
नागपूर,ता.१९ नोव्हेंबर २०२६: शासकीय स्वाती बंगला खासगी बिल्डरच्या घश्यात बेकायदेशीररित्या जाण्यापासून रोखण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२६ पासून तर ४ नोव्हेंबरपर्यंत मी चार तक्रारी सीताबर्डी पोलिस ठाण्यात दाखल केल्या,त्या चारही तक्रारीचं संयुक्त उत्तर मला प्राप्त झाले असून त्यात मी उपस्थित केलेल्या मूळ तक्ररींविषयी कोणतेही उत्तर मला मिळाले नसल्याचे नागरी हक्क संरक्षण मंचाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक जनार्दन मून यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
माझी तक्रार प्रदीप कुमार मैत्र व इतर आठ संचालक यांच्या विरोधात होती,मात्र,सीताबर्डी पोलिस ठाण्यातून मला लिखित उत्तर मिळाले की,प्रेस क्लबचे सचिव ब्रम्हशंकर त्रिपाठी हे उपस्थित झाले व त्यांनी स्वाती या शासकीय बंगल्यासंबंधीच्या करार-मदाराची कागदपत्रे सादर केली.त्यात त्यांनी सदर जागा प्राप्त करण्यासाठी आवश्यक ती सर्व शासकीय प्रक्रिया नियमानुसार पूर्ण केली असल्याचे नमूद केले आहे.तसेच संबंधित जागा ही शासकीय आदेशानुसार प्राप्त केल्याचे सांगितले.
त्यामुळे जर्नादन मून यांनी उपस्थित केलेले मुद्दे किंवा तक्रार अमान्य असल्याचे मून यांना सीताबर्डी पोलिसांकडून प्राप्त झालेल्या उत्तरात नमूद आहे.हाच मुद्दा घेऊन आज मून यांनी पत्रकार परिषद घेतली.
टिळक पत्रकार भवन व्यवस्थापक मंडळाने धर्मादाय आयुक्तांकडे स्वाती बंगला भाड्याने मिळावा यासाठी अर्ज केला होता आणि लगेच तिस-या दिवशी ‘प्रेस क्लब ऑफ नागपूर’ या कंपनीच्या नावाने करारनामा केला,हेच नियमबाह्य असून,त्यामुळेच ब्रम्हशंकर त्रिपाठींनी सादर केलेल्या नियमबाह्य करार-मदारांच्या कागदपत्रांच्या आधारावर सीताबर्डी पोलिस ठाणे मी विचारलेल्या प्रश्नांना असे उत्तर कसे देऊ शकते?असा सवाल जर्नादन मून यांनी केला.
आमची चौकशीची मागणी ब्रम्हाशंकर त्रिपाठीच्या विरोधात नव्हती,सीताबर्डी पोलिस ठाण्यातील अधिका-यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांना चौकशीसाठी का बोलावले नाही?असा सवाल मून यांनी केला.मूळात प्रदीप कुमार मैत्र हे अध्यक्ष म्हणून बिल्डरसोबत शासकीय बंगल्यासंबंधी करार-मदार करतात,कंपनीला अध्यक्षच नसतो तसेच ब्रम्हशंकर त्रिपाठी देखील कंपनीचे सचिव होऊ शकत नसल्याचा दावा याप्रसंगी जर्नादन मून यांनी केला.कंपनीत अध्यक्ष,सचिव कधीच नसतात.अश्या वेळी ब्रम्हशंकर त्रिपाठीचं ऐकून सीताबर्डीतील तपास अधिकारी मनोहर दंडाळे,तक्रारदार म्हणून कागदोपत्री बेकायदेशीर दिसत असलेल्या व्यवहारासंबंधी ते सर्व कायदेशीर असल्याचे लिखित उत्तर कसे पाठवू शकतात आणि त्यांना क्लिीन चीट कश्याच्या आधारावर देतात?असा सवाल त्यांनी केला.
याचा अर्थ दंडाले हे ‘प्रेस क्लब ऑफ नागपूर’चे या पूर्वीचे सर्व व्यवहार कायदेशीर ठरवित आहेत.त्यामुळेच मी पाेलिस आयुक्त,जिल्हाधिकारी व मनपा अायुक्त यांना शेवटचा इशारा देत असून येत्या सात दिवसांच्या आत त्यांनी स्वाती बंगल्याचे अर्थात शासकीय बंगल्याचे जी सार्वजनिक मालमत्ता आहे त्याचे सर्व कागदाेपत्री व्यवहार तपासावे,सरकारी मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी या तिन्ही अधिका-यांवर असल्याचे मून यांनी सांगितले.त्यामुळेच त्यांनी त्यांच्या जबाबदारीचे पालन करावे अन्यथा माझे आरोप खोटे असतील तर माझ्यावर कारवाई करावी,असा इशारा त्यांनी दिला.
१७ डिसेंबर २०१६ रोजी प्रेस क्लब ऑफ नागपूरच्या नावाने ही कंपनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अर्ज करते मात्र,१८ जानेवरी २०१८ मध्ये म्हणजे आधी अर्ज केल्याच्या ३२ दिवसांनंतर ही कंपनी अस्त्विात आली याचा अर्थ स्वाती बंगला मिळावा यासाठी कंपनी निर्माण होण्यापूर्वीच अर्ज सादर झाला,हे कोणत्या नियमात बसतं?सरकार व प्रशासन तरी जी कंपनी अस्तित्वातच नाही त्याला चक्क कसा इतका मोक्याच्या ठिकाणी असलेला इतका मोठा भूखंड देऊन टाकते?असा सवाल त्यांनी केला.२०१६ मध्ये पाच वर्षांसाठी १ रुपया लीजवर हा भूखंड मागणारी प्रेस क्लब ऑफ नागपूर ही कंपनी लगेच २०१७ मध्ये ९९ वर्षांसाठी एक रुपया लिजवर हा भूखंड मिळावा म्हणून बांधकाम विभागात अर्ज करते!यानंतर अगदी मंत्रीमंडळाच्या पातळीवर नगर रचना विभागासोबत झालेल्या नियमबाह्य करारत आणखी नियमबाह्य करार केले जातात.आणि कुकरेजा बिल्डरला स्वाती बंगला पाडून टोलेजंग इमारत बांधण्यासाठी करार केला जातो
मूळात,रजिस्टर्ड करार हा डेव्हलपमेंट करार जर नसेल तर होऊच शकत नाही,असा दावा पत्रकार परिषदेत मून यांनी केला.एक तर हा स्वाती बंगला या बोगस म्हणजे त्या वेळी अस्तित्वात नसलेल्या कंपनीला एक रुपया लीजवर देण्यात आला.दूसरे म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांना हाताशी धरुन प्रशासनिकच नव्हे तर सरकारी पातळीवर अवैध करार करण्यात आला.सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यावेळी कंपनी रजिस्टर्ड नसतानाच एक रुपया लीजवर पाच वर्षांचा करार करुन टाकला.
यावर कहर म्हणजे डेव्हलपमेंट करार तोच करु शकतो जो त्या जमीनीचा मालक असतो,प्रदीप मैत्र हे स्वाती बंगल्याचे म्हणजे सरकारी जागेचे मालक कधीपासून झाले?जो मालकच नाही त्याने स्वत:च्या नावाने कुकरेजा बिल्डरसोबत करार करुन टाकला व शासकीय बंगला पाडण्यात आला,
या करारात मूळ मालक कुकरेजा बिल्डर राहणार असून ५५ टक्के समभाग या प्रकल्पात बिल्डरचे राहणार असून प्रेस क्लब सारख्या तद्दन बोगस कंपनीच्या नावे ४५ टक्के समभाग असणार आहे.स्वाती बंगल्याचे क्षेत्रफळ ३७४४.४० चौ.मी असून बंगला क्र.६४/१ आहे.इतका मोठा भूखंड नागपूरातील नामवंत बिल्डरच्या घश्यात घालण्यासाठी या करारात सुरवातीपासूनच अनेक अनियमितता आहे.प्रदीप मैत्र कंपनी स्थापन करतो,कंपनीत अध्यक्ष पद नसतानाही अध्यक्ष म्हणून बिल्डरसोबत करार मदार करतो.
या विरोधात मून यांनी स्वाती बंगल्याच्या संदर्भात सीताबर्डी पोलिस ठाण्यात पहीली तक्रार २१ ऑगस्ट २०२६ रोजी केली होती.यानंतर २९ सप्टेंबर रोजी दुसरी तक्रार दाखल केली.यानंतर २३ ऑक्टोबर रोजी सर्व पुराव्यानिशी विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी,पोलिस आयुक्त,वरिष्ठ पोलिस निरीक्षक,सीताबर्डी आणि उपसंचालक,नगर रचना विभाग,मनपा यांना निवेदन दिले.२ नोव्हेंबर २०२६ रोजी पुन्हा मून यांनी वरील सर्व शासकीय अधिका-यांकडे पुन्हा स्वाती बंगल्याच्या संदर्भात अनियमिततेविषयी तक्रार दाखल केली मात्र,राजकीय दबावात या अधिका-यांनी माझ्या कायदेशीर तक्रारीची कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
प्रदीप मैत्र सरकारी जमीनीचा मालक नसतानाही डेव्हलपमेंट एग्रीमेंट करतो,याशिवाय कुकरेजा बिल्डरला ही जमीन शासकीय असल्याचे माहिती असतानाही त्याने डेव्हलपमेंट एग्रीमेंट स्वीकारला,मालकी हक्काचे दस्तावेजही तपासले नाहीत,
५ जून २०२५ रोजी लीजवर मिळालेली शासकीय जमीन पाडकाम करुन पुर्नविकसित करण्याची परवानगी नगर रचना विभागाला मागणे तसेच १० मार्च २०२६ रोजी त्यांना पुर्नविकासाची परवानगी मिळणे या संबधी सर्व शासकीय फाईल्स ताब्यात घेऊन पोलिसांनी योग्य तपास करण्याची आमची मागणी होती मात्र,सीताबर्डी पोलिस ठाण्यातील पोलिस अधिका-याने ब्रम्हशंकर त्रिपाठींनी सादर केलेली नियमबाह्य कागदपत्रे वैध मानली व आम्ही केलेल्या चौकशीच्या मागणीला केराची टोपली दाखवली.आम्हाला त्यांचे हे पत्र अमान्य आहे.
त्यामुळेच नागपूर पोलिस आयुक्त,मनपा आयुक्त आणि .जिल्हाधिकारी यांनी त्वरित या तक्रारीची योग्य व कायदेशीर दखल घ्यावी किंवा आम्ही दिलेले पुरावे खोटे असल्यास आमच्यावर सात दिवसांच्या आत कारवाई करावी,असे अाव्हान याप्रसंगी मून यांनी केले.
…………………………………………
Advertisements
