Homeblogराष्ट्रीय पत्रकार दिवस आणि...राष्ट्राची पत्रकारिता!

राष्ट्रीय पत्रकार दिवस आणि…राष्ट्राची पत्रकारिता!

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
डॉ.ममता खांडेकर
(मुख्य संपादक ‘सत्ताधीश’)

नागपूर,ता.१६ नोव्हेंबर २०२६: तीन दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर एक पोस्ट व्हायरल झाली.‘शुक्रिया!भारतीय पत्रकारिता को दूनिया के सबसे निचले पायदान तक पहूंचाने के लिए…..!’संदर्भ होता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत भाजप कार्यालयात दिल्लीतील सर्व प्रतिष्ठित वृत्त वाहिन्यांच्या ‘तथाकथित’पत्रकारांना दिवाळी मिलनसाठी दिलेले आमंत्रण.ज्या पंतप्रधानांनी त्यांच्या १२ वर्षांच्या कार्याकाळात एक ही पत्रकार परिषद घेतली नाही त्यांना अचानक या वर्षी वृत्त वाहीन्यांच्या संचालक,संपादक,प्रतिनिधी,अँकर्स आदींसोबत दिवाळी मिलनचा सोहळा आयोजित करण्याची हूक्की आली.असा सोहळा आयोजित करणे यात काहीही गैर नाही मात्र,या ‘औपचारिक’सोहळ्यात जे घडले तो संपूर्ण जगात तसेच समाज माध्यमात टिकेचा विषय झाला.
‘पत्रकार’या शब्दासोबत सर्वसामान्य जनतेचा एक अतुट विश्‍वास जुळलेला असतो.पत्रकार हा त्यांच्यासाठी सरकार व प्रशासनाला थेट प्रश्‍न विचारेल अशी त्यांची आजपर्यंत भाबडी समज होती मात्र,मोदी यांच्या कार्यकाळात राष्ट्राच्या पत्रकारितेला जे नीचांकी ग्रहण लागले त्या काळोखात संपूर्ण पत्रकारिताच कलंकित झाली आहे..अर्थात,इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात असे पत्रकार नव्हते का?ज्यांनी पत्रकारितेच्या आड कोट्यावधींची माया जमवली,पत्रकरितेच्या नावावर सर्वसामान्य जनतेचा विश्‍वासघात केला,इत्यादी..इत्यादी असे प्रश्‍न ही चर्चिले जातात आणि त्यात तथ्य देखील आहे मात्र,इंदिरा गांधी असो किंवा राजीव गांधी,नरसिंहराव,मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात असे फक्त काही मोजके पत्रकार होते ज्यांनी भारतीय जनतेचा विश्‍वासघात केला.मोदी यांच्या काळात तर ‘हमाम में सब नंगे’झालेले दिसून पडतात.

महत्वाचे म्हणजे अश्‍या तथाकथित पत्रकारांमुळे आणि पत्रकारितेमुळे देशाचे कधीही भरुन न निघणारे जे अपरिमित नुकसान झाले तसे इंदिरा गांधी किंवा मनमोहन सिंग आदींच्या काळात कधीही झाले नाही.नीतीमत्ता शून्य पत्रकारितेचे परिणाम त्या काळी संपूर्ण देशाला भोगावे लागले नाहीत तर केवळ काही घटकांपुरते त्याचे परिणाम मर्यादित होते.देशाचे अमृत महोत्सवी वर्ष संपले तरी राष्ट्राच्या पत्रकारितेचा आब हा राखून होता.मोदी काळातील केवळ १२ वर्षात तीच पत्रकारिता विकल्या गेली व सर्वसामान्यांच्या नजरेत तितकीच आता ‘बेअब्रू‘ झाली आहे.ज्या काँग्रेसच्या काळात वृत्तपत्रे व वृत्त वाहीन्या मिळून फक्त ३०० कोटींचं बजेट जाहीरातींसाठी होतं ते मोदींच्या पहील्या काळात तीन हजार कोटी व उत्तरोत्तर वाढत जाऊन आता तिस-या कार्यकाळात पंधरा हजार कोटींच्या घरात जाऊन पोहोचले आहे….!
दिवाळी मिलनच्या कार्यक्रमात मोदींच्या टेलिप्राम्पटरवर झालेल्या रटाळ भाषणानंतर देशातील राष्ट्रीय पत्रकार म्हणून मिरवणा-या विभूत्या त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी ज्या पातळीवर उतरलेत,त्यावर भाष्य करायला आता समाज माध्यमांतही शब्द कमी पडू लागले आहेत.देशाचा पंतप्रधान पत्रकारांसोबत दिवाळी मिलन सोहळ्यात टेलिप्राम्पटरशिवाय साधे दोन शब्द ही शुभेच्छाचे बोलू शकत नाही,हा संदेश तर जगभरात गेलाच मात्र,त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी पत्रकार म्हणून मिरविणारे हेच प्रतिष्ठित चेहरे ज्याप्रमाणे झुंबडीने पुढे सरसावली ती टिळक,आगरकर,आंबेडकरांची देदिप्यमान पत्रकारितेला रसातळात गाडणारीच ठरली.

एक काळ असा होता जेव्हा पत्रकार सत्तेतील सर्वात मोठा चेहरा असणा-या पंतप्रधानांही बेधडक प्रश्‍न विचारीत होती.दुसरीकडे आता तोच पत्रकार सर्वसामान्यांच्या अपेक्षांना वा-यावर सोडून सत्तेसोबत बरोबरीने उभा असलेला दिसून पडतो.१९८७ साली राजीव गांधी पंतप्रधान असताना भोपाळमध्ये आले होते.त्यावेळी तेथील पत्रकारांनी त्यांना ज्या पद्धतीचे व ज्या पद्धतीने प्रश्‍न विचारले ते ऐकून ते अस्वस्थ झाले होते.त्या काळी एका ही पत्रकाराला राजीव गांधींसोबत फोटो घेण्याचा मोह पडला नाही.इंडियन एक्सप्रेसचे संपादक राजकमल झा यांनी एक विधान केले होते.रामनाथ गोयनका यांचे हे मानने होते की कोणत्याही पत्रकाराची कोणत्याही मंत्र्यांशी किंवा सत्ताधारी राजकीय नेत्यासोबतची जवळीक म्हणजे ख-या पत्रकारितेसाठी आत्मघात असतो…!त्या काळी पत्रकाराची कोणत्याही नेते किंवा मंत्र्यांसोबत मैत्री नसणे ही पत्रकाराची कमजोरी नाही तर फार मोठी ताकद समजली जात होती.

आजच्या काळात मुख्यमंत्री असो,उपमुख्यमंत्री असो किंवा इतर कोणताही  राजकीय नेता असो.ते वेगवेगळ्या सोहळ्यानिमित्त पत्रकारांना सन्मानाने बोलावतात,त्या सोहळ्यात सहभागी होणे यात ही काही गैर नाही मात्र,पंतप्रधान असो,मुख्यमंत्री असो किंवा इतर कोणताही मंत्री,त्यांच्यासोबतची जवळीक साधण्याचा पत्रकारांचा केविलवाणा प्रयत्न हा भारतीय पत्रकारितेला लोकांच्या नजरेत पार रसातळात घेऊन जात असतो.असे पत्रकार कधीही सत्तेतील राजकारण्यांना अस्वस्थ करणारे प्रश्‍न विचारु शकत नाहीत.पत्रकारांचे काम सत्ताधा-यांना प्रश्‍न विचारणे हा आहे,त्यांच्या सत्तेच्या चमकत्या चेह-यात स्वत:ची उपलब्धी शोधणे हे पत्रकारांचे काम नाही.
लोकशाही देशात सत्ताधारी हे आपल्या ताकदीचा गैरवाजिब वापर तर करणारच आहेत.स्वत:विषयी चांगला माहोल देखील तयार करण्यासाठी ते पत्रकारितेचा बखुबी उपयोग करतात.सर्वच सत्ताकाळात हे घडले आहे.मात्र,ज्यावेळी पत्रकार सत्तेच्या हातचे बाहूले बनतात ते सत्ताधा-यांचे यश असते मात्र पत्रकारितेची हार असते.
मोदी यांच्या या सोहळ्यात तर एक असे ही नाव होते ज्यांना पत्रकारितेतील ‘कलंक’म्हणून गणल्या जातं.ते नाव आहे विजेंद्र सिंह हुड्डा!उत्तर प्रदेशातील बहूचर्चित बाइक बोट घोटाळ्यात लाखो मध्यमवर्गीय गुंतवणूकदार देशाधडीला लागले.यात देशातील माजी सैनिकांचे कुटूंबिय देखील होते!अंदाजे चार हजार दोनशे कोटींच्या या घोटाळ्यातील आरोपींपैकी एक नाव विजेंद्र सिंह हुड्डा याचे देखील होते!नोएडाच्या पोलिस ठाण्यात याच्या विरोधात लबाडी व फसवणूकीचे शंभरपेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद आहे.महत्वाचे म्हणजे उत्तर प्रदेशच्या योगी सरकारच्या पोलिसांनी हुड्डाला भगोडा म्हणून घोषित केले असून याच्यावर ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे!इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस ही याच्या विरोधात जारी केली आहे.
लाखो गोरगरीबांच्या फसवणूकीतून अपार माया कमावलेल्या पैशांतून या लबाडाने उत्तरप्रदेशातील हापूडमधील मोनाड विद्यापीठ विकत घेतले व शिक्षण सम्राट बनला.यात ही त्यानी बोगस पदव्या विकून अपार माया कमावली व हजारो विद्यार्थ्यांचे जीवन अंधकारमय केले.या गुन्ह्यात हुड्डा तुरुंगाची हवा देखील खाऊन आला.तुरुंगातून बाहेर येताच हुड्डाने आपला चोला बदलला व एकाच रात्रीत दोन वृत्त वाहीन्या विकत घेतल्या कारण या देशातील सर्वाधिक भ्रष्टाचा-यांना आणि काही श्रीमंतांना आपली कलंकित प्रतिमा प्रतिष्ठित करण्यासाठी सर्वात सोयीचा व्यवसाय आहे ती म्हणजे मीडिया आणि सत्ताधा-यांसोबतची जवळीक!
ज्या पोलिसांसाठी हुड्डा हा पाच लाख रुपये बक्षीस असलेला फरारी आरोपी होता तो आता दोन वृत्त वाहीन्यांचा मालक होताच लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा एक प्रतिष्ठित चेहरा बनला!

ज्या लाखो मध्यमवर्गीय व माजी सैनिकी कुटूंबियांचे हजारो कोटी त्याने बाइक बोट घोटाळ्यात लाटले,तो मोदी यांच्यासोबत सेल्फी घेताना संपूर्ण जगाने बघितला तर दुसरीकडे आज देखील ते लाखो कुटूंबिय न्यायासाठी योगी यांच्या पोलिस चौक्यांवर पादत्राणे झिजवतात आहेत….!

राष्ट्राच्या अश्‍या पत्रकारितेनेच आज देशातील शिक्षण,आरोग्य,गरीबी,महागाई,शेतकरी,बेरोजगारी तसेच जेन-झीवर झालेल्या बेछूट लाठीमार व पेलेट गनने पोलिसी हल्ला यावर सत्ताधा-यांना प्रश्‍न विचारण्याचा हक्क गमावलेला आहे.मात्र,भारतातील मिडीया जरी संपूर्णपणे ‘गोदी मिडीया’झाला असला तरी नार्वेच्या राजधानीत ओस्लोमध्ये अवघ्या चोवीस वर्षीय पत्रकार हेले लिंग(Helle Lyng) हिने मे २०२६ मध्ये मोदी हे नार्वेच्या दौ-यावर असताना नार्वेचे पंतप्रधान योनास स्टोरे यांच्यासोबतच्या संयुक्त निवेदनानंतर मोदींना प्रश्‍न विचारण्याचा प्रयत्न केला.‘पंतप्रधान मोदी,तुम्ही जगातील सर्वात स्वतंत्र प्रेसचे प्रश्‍न का घेत नाही?’असा तिचा थेट प्रश्‍न होता.मोदींनी या प्रश्‍नाला उत्तर न देता तिथून निघून गेले.हेले लिंग ही नॉर्वेच्या ’डागब्लाडेट’वृत्तपत्रात कार्यरत आहे.लिंग यांनी या घटनेनंतर जगभर चर्चा झाल्यानंतर स्पष्ट केले ,पत्रकार म्हणून प्रश्‍न विचारणे हे तिचे कर्तव्य असून भविष्यात मोदींना प्रश्‍न विचारण्याची संधी मिळणार नसल्यानेच त्यांनी हा प्रश्‍न मोदींना केला होता.

नुकतेच हेले लिंगला हैदराबाद(तेलंगणा)येथे आयोजित एका परिषदेत ‘माध्यमांचे भविष्य आणि प्रेस स्वातंत्र्य’या विषयावर बोलण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.या परिषदेसाठी आवश्‍यक सर्व सोपस्कार पूर्ण झाले होते मात्र,ती विमानतळासाठी निघणार त्या दहा मिनिटांपूर्वी भारतातील नियोजित दौरा, भारतीय व्हिसा नॉर्वेतील भारतीय दुतावासाने रद्द केल्याची माहिती तिला देण्यात आली!तिच्याकडे वैध व्हिसा व परराष्ट्र मंत्रालयाचे राजकीय मंजुरीचे पत्र ही होते मात्र,भारताच्या गृह मंत्रालयाच्या निर्णयामुळे तिला भारतात प्रवेश नाकारण्यात आला,महत्वाचे म्हणजे ती भारतात,भारतातील माध्यमांचे भविष्य व प्रेस स्वातंत्र्य यावर बोलण्यासाठी येत होती,यावरुन राष्ट्रीय पत्रकार दिनी राष्ट्राची पत्रकारिता आज कुठे व कोणत्या स्तरावर पोहोचली आहे,याची प्रचिती येते.
नागपूरचा प्रसंग…..
हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये नुकतेच अगामी २७ नोव्हेंबर पासून ॲग्रोव्हिजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शनविषयी पत्रकार परिषद पार पडली.यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कृषी प्रदर्शनाविषयी सविस्तर माहिती दिली व शेवटी फक्त कृषी प्रदर्शनाविषयी प्रश्‍न विचारण्याची सूचना उपस्थित पत्रकारांना केली.या संपूर्ण पत्रकार परिषदेत गडकरी यांनी या कृषी प्रदर्शनाचा कसा लाभ शेतक-यांना होतो,यावरच भर दिला होता.त्यामुळे एका पत्रकाराने दिवाळीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्यासह विविध मंत्री यांनी शेतक-यांच्या घरी जाऊन दिवाळी साजरी केली मात्र,ते सगळे सधन शेतकरी असून भाजपचेच पदाधिकारी होते याकडे गडकरींचे लक्ष वेधले.
यावर हा कृषी प्रदर्शनाशी संबंधित प्रश्‍न नसल्याचे संतापून गडकरी उत्तरले.मात्र,या पत्रकाराने पुन्हा हा प्रश्‍न राज्यातील दुष्काळ व शेतक-यांशीच संबंधित असल्याची पुश्‍ती जोडली मात्र,त्याला सत्ताधा-यांकडून उत्तर मिळालेच नाही.उलट,हॉटेलमध्ये जेवणावळी उरकत असताना तो एका मंत्र्यांच्या रोषभ-या नजरेचा चांगलाच बळी ठरला!
नागपूरातही अनेक पत्रकारांची मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांसोबतची ‘अर्थपूर्ण’ जवळीक, ही नागपूर शहराचे ज्वलंत,धगधगते, पर्यावरणीय -हासाचे,प्रदुषणाचे,प्रशासनाच्या बेदरकार कारभाराचे आणि प्रचंड प्रमाणात बोकाळलेल्या भ्रष्टाचारविषयीचे प्रश्‍न बेधडकपणे विचारण्याची कुवत गमावून चुकले आहेत.त्यामुळेच राष्ट्रीय पत्रकारिता दिन हा आज ख-या अर्थाने ‘दीन’ झाला असल्याची प्रचिती येते.ज्या नागपूरात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी आहे,आंबेडकर नावाच्या त्याच महान पत्रकाराच्याच भूमीत पत्रकारितेची नीतीमूल्ये कश्‍याप्रकारे खोलवर जमीनीत गाडली जाते,बोचणारे,अस्वस्थ करणारे प्रश्‍न सत्ताधा-यांना कश्‍याप्रकारे नको आहेत याचे बोलके उदाहरण गडकरी व बावणकुळे यांच्या पत्रकार परिषदेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
रिपोर्टर्स विटाऊट बॉर्डर्स(RSF)च्या प्रसिद्ध झालेल्या २०२६ च्या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्सनुसार भारत १८० देशांच्या यादीत १५७ व्या क्रमांकावर आहे!२०२५ मध्ये भारत हे राष्ट्र १५१ व्या स्थानावर होते,म्हणजेच वृत्तपत्र व माध्यम स्वातंत्र्यात ६ अकांनी या राष्ट्राची आणखी घसरण झाली….!तरीही..राष्ट्रीय पत्रकार ’दीन’या देशात उत्साहात साजरा केला जातो….साजरा होत राहील….!
……………………………………………..
Advertisements

Latest बातम्या