Homeराजकारणमाझ्या विरोधात वंचितचे आंदोलन चुकीचे: धर्मपाल मेश्राम

माझ्या विरोधात वंचितचे आंदोलन चुकीचे: धर्मपाल मेश्राम

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
भाजपच्या ‘लोकशाही बचाव अराजकता हटाव‘मोर्चा आंदोलनातील विधानावर वंचितचा प्रहार

नागपूर,ता.१५ नोव्हेंबर २०२६: एमआयएम(AIMIM)पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी दलित आणि अल्पसंख्याक(मुस्लिम)यांच्यातील राजकीय युतीसाठी ’जय भीम,जय मीम’हा नारा दिला असून उत्तर प्रदेशातील येणा-या निवडणूकीच्या संदर्भात, चंद्रशेखर आजाद रावण यांच्याशी झालेल्या युतीच्या अनुषंगाने उत्तरप्रदेशातील दलित आणि मुस्लिम मतांची गोळाबेरीज करण्यासाठी हा नारा देण्यात आला.या ना-यावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी ५ नोव्हेंबर रोजी यशवंत स्टेडियम येथील भाजपच्या ‘लोकशाही बचाव,अराजकता हटाव’मोर्चा-आंदोलनाच्या वेळी केलेल्या भाषणात सडकून टिका केली.मात्र,नागपूर शहर वंचित आघाडीतर्फे ॲड.धर्मपाल मेश्राम यांच्या विरोधात आंदोलन पुकारण्यात आले.वंचितचे हे आंदोलन राजकारणाने प्रेरित असून चुकीचे असल्याचे ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.’जय भीम जय मीम’चा संदर्भ देताना मी कुठेही परमपुज्य बाबासाहेबांची व एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांची तुलना आपल्या संपूर्ण भाषणात केली नसल्याचा दावा त्यांनी केला.
माझ्या भाषणात मी हेच सांगितलं की,काही महिन्यांपूर्वी एक आंदोलन देशाच्या राजधानीत दिल्लीत झालं,‘कॉक्रोच जनता पार्टीने’ ते आंदोलन केलं व सांगितल्या गेलं की या देशाची युवा शक्ती ही आता जागृत झाली आहे आणि त्यांनी देशातील केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामे मागण्याचा सपाटा सुरु केला आहे.त्यांना या देशाच्या संविधानाने दिलेल्या संवैधानिक संस्था मान्य नाहीत.त्यांना सर्वोच्च न्यायालय असो किंवा निवडणूक आयोगासारखी स्वायत्त संस्था देखील मान्य नाही.त्यांना या देशाची संसद देखील मान्य नाही म्हणून ते रस्त्यावर उतरुन सांगतात,की आम्हाला हा देश वाचवायचा आहे,हे कारण देऊन दिल्लीतील त्या मैदानात त्यांनी आंदोलन केले.
त्यांना उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे आजचे हे ‘लोकशाही बचाव,अराजकता हटाव’चे आंदोलन नाही तर,ज्यांनी ज्यांनी या देशामध्ये संविधानाच्या नावावर एक लाल पुस्तक हातात घेऊन ते संविधान असल्याचे दाखवतात,त्यांच्या त्या संविधानातील आतमधील पाने चक्क कोरी आहेत.कारण त्यांच्या आजोबा-आजी पासून तर वडीलांपासून तर नातू-पडनातूपर्यंत संविधानाची कोणतीही कलमं मान्य नसल्याचा घणाघाती आरोप मी केला होता,असे ते सांगतात.
या देशाचं संविधान बदलण्याचं महापाप जर कोणी केलं असेल तर ते काँग्रेसच्याच सत्ताकाळात झालं आहे.त्यांच्या सत्ताकाळात केवळ संविधानातील अनेक कलमंच बदलण्यात आली नाही तर ४२ सा व्या संविधान दुरुस्तीने इंदिरा गांधींनी आणिबाणिच्या काळात संविधानाची ‘प्रास्ताविका’देखील बदलण्याचं काम केलं.
नागपूरच्या या संघभूमीतून, दीक्षाभूमीतून देशातील लोकांकडे आज जेव्हा भाजप व महायुतीचा विचार घेऊन जाल तेव्हा काँग्रेसच्या काळतोंड्यांना विचाराल या देशाच्या संविधानात ४२ वी घटना दुरुस्ती करताना इंदिरा गांधींनी आणिबाणिच्या काळात या देशाच्या संविधानाची ‘प्रास्ताविका’बदलली की नाही बदलली?असा सवाल त्यांनी आपल्या भाषणात केला होता.
ज्यांना संविधान मान्य नाही ते लाल संविधान घेऊन आतील सर्व पाने कोरे ठेवतात,त्यांनी या देशामध्ये अराजकता पसरविण्याचा प्रयत्न केला आहे.काल-परवा जन्म झालेला एक एनआरआय मूलगा(अभिजित दिपके) देशात येतो.परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो आणि सांगतो की आम्ही या देशाच्या सत्ताधीशांना खाली खेचल्याशिवाय राहणार नाही.काल आम्ही केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला आता या पुढेही आम्ही अनेक राजीनामे घेऊ.जर देशाचा संविधान त्यांना मान्य असेल तर त्याच संविधानाने निर्माण केलेल्या निवडणूक आयोगाच्या निवडणूकीतून देशाच्या जनतेसमोर दिपके का जात नाही?असा सवाल त्यांनी केला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधानाच्या माध्यमातून बहूपक्षीय संवैधानिक राजकीय व्यवस्था दिली आहे.कालच्या कोणत्याही पोराने देशात यायचं आणि कॉक्रोचसारखा पक्ष स्थापन करायचा,हिंमत असेल तर त्याने या देशाच्या एकशे चाळीस कोटी लोकसंख्ये समोर मत मागायला जावं.जर तुम्हाला हे मान्य नाही तर त्यांना बाबासाहेबांचं नाव घेण्याचाही अधिकार नसल्याचे ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी आपल्या भाषणात सांगितले.
आजकाल तर देशात एक नवा नारा ऐकू येतो,‘जय भीम जय मीम’!मात्र,गेल्या २५ वर्षांपासून मी भारतीय जनता पक्षात आहे.माझा एकच नारा आहे,‘जय भी, जय हिंद’.‘जय भीम जय मीम’चा नारा उत्तर प्रदेशात लागत असताना महाराष्ट्रातील बाळासाहेब आंबेडकर आज कुठे आहेत?असा सवाल त्यांनी केला.बाळासाहेब आंबेडकरांचे नाव घेतल्यामुळे वंचितच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मूळ विषय समजून न घेता,चुकीचे आंदोलन केले असल्याचा दावा ॲड.मेश्राम करतात.
संविधानाचे खोटे नाव घेणा-यांनीच  या देशातील युवकांना बरगळवण्याचं काम केलं,ते सारे थोतांड लोकं असल्याचा आरोप मेश्राम यांनी केला.त्यांच्या थोतांडाला या देशातील जनता कदापि बळी पडणार नसून, भाजप व महायुतीच्या झेंड्याखाली त्यांना उत्तर देण्यासाठी आम्ही आज एकत्रित आलो असल्याचे ते म्हणाले.
आम्हीच या देशाचे युवा आहोत,आम्हीच या देशाची जनता आहोत, आम्हीच या देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी आहोत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सत्ताकाळात ३७० वे कलम संपुष्टात आणून जम्मू-काश्‍मीरला  ‘एक देश-एक संविधानाच्या’ अधिनस्थ आणण्याचं काम केलं.‘एक देश में दो निशान-दो प्रधान नहीं चलेंगे’सांगत ते कलमच संविधानातून कायमचे संपुष्टात आणले मात्र,दुसरीकडे ६४ हजार किलोमीटर अरुणाचल प्रदेशाचा भू-भाग व सेवन सिस्टरचा भाग चीनला देण्याचं महापाप तत्कालीन पंतप्रधान नेहरुंनी त्यांच्या कार्यकाळात केल्याची घणाघाती टिका ही मेश्राम यांनी केली.
भाजप घाबरत नाही.या देशात कोणाचीही सत्ता येऊ देत,या जगामध्ये कोणत्याही पक्षाचं राज्य येऊ देत किंवा जार्ज सोरेससारख्या आंतरराष्ट्रीय शक्तीने ज्याची मालमत्ता ५० हजार कोटींच्या पलीकडे आहे तो जर पडद्या मागून राहूल गांधीना मदत करत असेल तरी भाजपला त्याचं नवल वाटत नसल्याचे मेश्राम आपल्या भाषणात म्हणाले.राहूल गांधीला समाजमाध्यमांवर सातत्याने चालवणारे हे अमेरिकेच्या केलिर्फोनियातूनच सूत्रबद्ध होतात.
मात्र,आमच्या पाठीशी कोण आहेत,आमच्या पाठीशी कोण नाही आहेत ते देखील दाखवण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी आपल्या १२ वर्षांच्या पंतप्रधान काळात केलं आहे.या महाराष्ट्रात खरा विकासाचा नारा व आवाज बुलंद करण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे.काश्‍मीर पासून कन्याकुमारीला रस्त्यांनी जोडण्याचं काम जर कोणी केलं तर ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलं आहे.हे सगळं या देशातील मतदारांमुळे शक्य झालं आहे.
त्यामुळेच त्यांच्या डाेळ्यांवरचे झापडं आता आपल्याला उडवून टाकावे लागतील.या देशातील सत्ताधीशांना उघड आव्हान देणा-या या अराजक शक्तींना पुन्हा एकदा सांगायची वेळ आली आहे की आम्हीच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे खरे रक्षक आहोत.हे सांगण्यासाठी आजचा मोर्चा व संविधान चौकापर्यंतची पदयात्रा काढत असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
माझ्या या संपूर्ण भाषणात कुठेही,कोणतेही वादग्रस्त विधान मी केले नसल्याचा दावा ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी माध्यमांकडे केला.
………………………………………….
Advertisements

Latest बातम्या