Advertisements

नागपूर पोलिसांची धाडसी कारवाई:आंतरराज्यीय टोळीचा केला पर्दाफाश:अद्यावत तंत्रज्ञानाचे घेतले साहाय्य
चार जेरबंद: मुख्य आरोपीसह एक फरार
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची माहिती
नोव्हेंबर २०२५ मध्ये आखली होती योजना, डिसेंबरमध्ये केली रेकी
दिल्लीमध्ये झाले दरोड्याचे ‘फायनल प्लॅनिंग’
नागपूर,१४ ऑक्टोबर २०२६ : एमआयडीसीतील ढोमणे ज्वेलर्सवर ३ आॅक्टोबर रोजी दुपारी ४.५५ वाजताच्या सुमारास पडलेल्या दरोड्याचा कट पुझाल जेलमध्ये नोव्हेंबर २०२५ मध्ये शिजला. त्यानंतर नागपूर शहराबाहेर असलेल्या काही ज्वेलर्सची रेकी झाली. त्यात एमआयडीसी हद्दीतील ढोमणे ज्वेलर्स त्यांना अत्यंत सुरक्षित वाटले आणि दिल्लीमध्ये या दरोड्याला अंतिम रूप देण्यात आले. त्यानंतर दरोड्याची घटना घडल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
राजन सामी शर्मा (वय २९, रा. मेरठ, उत्तरप्रदेश) याची ओळख चेन्नईच्या पुझाल जेलमध्ये एका नामी गुंडाशी (गॅँग लीडर) झाली. त्याच्यावर मर्डर, रॉबरी, सायबर फ्रॉडचे गुन्हे दाखल आहेत. राजनला लोकल भाषेची जाण होती. त्यामुळे तो उत्तरप्रदेशातील जे आरोपी चेन्नईच्या पुझाल जेलमध्ये बंदिस्त आहेत त्यांना बेल मिळवून देण्यासाठी भाषेचा वापर करायचा. राजन हा गेल्या ८ ते १० वर्षापासून नागपुरात राहातो आहे. त्याच्यावर देशात विविध ठिकाणी क्रिप्टो करंसी, सायबर फ्रॉमप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.
फेब्रुवारी २०२६ मध्ये या नामी गुंडाला त्यानेच बेल मिळवून दिली आणि तो राजनसोबत नागपुरात आला. काही महिने राजनच्या मदतीने नागपुरात राहिला. जेलची कागदोपत्री पुर्तता करायची असल्याने तो ३ महिन्यानंतर पुन्हा चेन्नईला गेला. सप्टेंबर २०२६ मध्ये तो पुन्हा नागपुरला आला आणि एका ओयो हॉटेलमध्ये थांबला. त्याने राजनच्या मदतीने शहरातील काही ज्वेलरी शॉपची रेकी केली. त्यात खापरखेडा रोडवरील एका ज्वेलरी शॉपचीसुद्धा रेकी केली. पळून जाणे सोयीस्कर होण्यासाठी त्यांनी शहराबाहेरील ज्वेलर्सची निवड केली होती.
दरोड्याच्या योजनेला अंतिम रुप देण्यासाठी अभिषेकसिंग ठाकूर (रा. बरेली, उत्तरप्रदेश), जयराम उर्फ जोगिंदर अशोकसिंग ठाकूर (वय १९), शुभांकित निलेशकुमार चतुर्वेदी (वय २२, रा. नोएडा, उत्तरप्रदेश), राजन सामी शर्मा तसेच इतर दोघे असे ६ जण दिल्लीत जमा झाले. संपूर्ण योजना आखली. त्यानंतर ते वेगवेगळ्या मार्गाने नागपुरला पोहोचले. अभिषेकसिंग ठाकूर याच्या मदतीने त्यांनी मानेवाडा रोडवरील एका दुकानातून खोट्या कागदपत्राच्या आधारे ७० हजारात दुचाकी विकत घेतली. तसेच एका गॅरेजवाल्याकडून भाडेतत्वावर ‘थार’ घेतली. त्याच्याकडे स्वत:ची फोर्चुनर होतीच. अभिषेकसिंग, जयराम, शुभांकित आणि राजन हे दरोडा टाकणार असल्याचे ठरले.
३ आॅक्टोबर रोजी सकाळपासून हे चौघे ढोमणे ज्वेलर्स कधी उघडते याची वाट पाहात हिंगणा रोडवरून चकरा मारत होते. यादरम्यान त्यांनी दुकानमालकालाही कॉल केला होता. शेवटी दुपारी ४.३० वाजता ढोमणे ज्वेलर्स उघडले. इकडे नामी गुंडा हा फोर्चुनरमध्ये त्याच्या एका सहका-यासह वानाडोंगरीच्या मार्गावर उभा होता. एकाच दुचाकीवरून आलेल्या या चौघांनी पुर्णत: ठरल्याप्रमाणे शस्त्राच्या धाकावर दरोडा टाकून ४० लाखांचे ३५० ग्रॅम सोन्याची दागिने लुटले आणि पसार झाले. विकत घेतलेली दुचाकी रस्त्यावरील एका नाल्यात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि सहाही जण दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. दिल्लीत पोहोचल्यानंतर लुटलेल्या सोन्याची समसमान वाटणी केली आणि आपापल्या ठिकाणी निघून गेले.
हिंगणा रोडवरील महाकाली बारसमोरील ढोमणे ज्वेलर्समध्ये बंदुकीसारख्या शस्त्राचा धाक दाखवून तब्बल ४० लाखांचे सोन्याचांदीचे दागिने या आंतरराज्यीय गुन्हेगार टोळीने लृटले. मात्र,नागपूर शहर पोलिसांच्या गुन्हेशाखेने अखेर या गुन्ह्याचा छडा लावला. तब्बल १२ दिवस उत्तर प्रदेश आणि हरियाणा राज्यांत शोधमोहीम राबवून पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली. या कारवाईत गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली फॉर्च्युनर कारही जप्त करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजचे सूक्ष्म विश्लेषण, तांत्रिक तपास आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) अश्या अद्यावत तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला.
ही घटना ३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ४.४० ते ४.५५ या दरम्यान एमआयडीसी हद्दीतील हिंगणा रोडवरील महाकाली बारसमोर घडली. राकेश सुभाष ढोमणे यांचे येथे ‘ढोमणे ज्वेलर्स’ नावाचे सोन्याचांदी खरेदी-विक्रीचे दुकान आहे. घटनेच्या वेळी दुकानात काम करणारा शुभम खेमराज हाडगे (२४) हा उपस्थित होता. याचदरम्यान चार अनोळखी व्यक्तींनी दुकानात प्रवेश केला आणि त्याला बंदुकीचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देवून, मारहाण करून दुकानातील ३५० ग्रॅम वजनाचे सुमारे ४० लाख रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसी पोलीस आणि गुन्हेशाखेने समांतर तपास सुरू केला. आरोपींचा माग काढण्यासाठी परिसरासह विविध मार्गांवरील तब्बल ३०० ते ४०० सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण केले. तांत्रिक माहिती, परिस्थितीजन्य पुरावे आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर करून संशयितांचा माग काढण्याचे काम सुरू झाले. तपासादरम्यान आरोपींचे धागेदोरे उत्तर प्रदेश आणि हरियाणापर्यंत पोहोचल्याचे समोर आले. त्यानंतर गुन्हेशाखेची दोन विशेष पथके या राज्यांत रवाना करण्यात आली. स्थानिक पातळीवर संशयितांची माहिती गोळा करताना पोलिसांनी आपली ओळख गोपनीय ठेवत स्थानिक पोलिसांच्या मदतीने आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास पुढे नेला. तपासाची व्याप्ती वाढल्याने तिसरे पथकही रवाना करण्यात आले.
विशेष पथकांनी तब्बल १३ दिवस बाहेरच्या राज्यांत तपास केला. अखेर पोलिसांना यश मिळाले. या कारवाईत अभिषेकसिंग ठाकूर याला उत्तर प्रदेशातील बरेली येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे जयराम ऊर्फ जोगीदर अशोकसिंग ठाकूर (वय १९) आणि शुभांकीत निलेशकुमार चतुर्वेदी(वय २२) यांना नोएडा येथून, तर राजन सामी शर्मा (वय २९) याला मेरठ येथून ताब्यात घेतले. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर २ साथीदारांचा शोध अद्याप सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली एमएच ४९/ बी ९१९२ क्रमांकाची फॉर्च्युनर कार जप्त केली आहे. अटक आरोपी हे सराईत आणि पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. लुटलेल्या दागिन्यांची संपूर्ण माहिती, त्यांची विल्हेवाट आणि इतर साथीदारांचा सहभाग याबाबत पुढील तपास सुरू आहे.
या मोहिमेसाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त (डिटेक्शन) दीपक अग्रवाल आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गुन्हेशाखेच्या महिला पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक चेतन बोरखेडे, नितीन चुलपार, राजाराम जाधव, पोलीस उपनिरीक्षक विवेक झिंगरे तसेच अर्जुन यादव, कमलेश गणेर, मनोज टेकाम, प्रीतम यादव, रितेश तुमडाम, योगेश वासनिक, महेंद्र सडमाके, नितीन वासनिक, चंद्रशेखर राघोर्ते, अनंता क्षिरसागर, पराग ढोक, रोशन तिवारी, नितीन वर्मा, कमलेश गहलोट, संदीप पांडे, सुधीर पवार, कुणाल गेडाम, धीरज पंचभावे, मिथुन नाईक, चैतन्य, परमेश्वर, आशिष चंदरे आणि अझमत शेख यांनी तसेच उत्तर प्रदेशातील एसडब्ल्यूएटी पथकाचे हेड कॉन्स्टेबल सचिन झा, सहारनपूर येथील उपनिरीक्षक निग्ज पवार तसेच पोलीस हवालदार हरेंद्र, अमित चिकारा, जोगेंद्र आणि पोलीस अंमलदार विवेक राणा यांचे सहकार्य लाभले.
…………………………………………….