पिडीत मनीष तोतवानींची मुख्यमंत्री व नागपूर पोलिस आयुक्तांकडे तक्रार
भाजप आमदाराच्या ‘खास‘सहायकाचेही तक्रारीत नाव!

नागपूर,ता.११ ऑक्टोबर २०२६: खामला सिंधी कॉलनी येथे राहणा-या मनीष गोपीचंद तोतवानी यांनी २२ सप्टेंबर २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच नागपूरचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे लोकमतचे पत्रकार नरेश डोंगरे तसेच एका भाजपच्या विद्यमान आमदाराचा उजवा हात असलेल्या संदीप उर्फ गप्पू समुंद्रे यांच्या विरोधात २५ लाख रुपये खंडणी मागीतली असल्याची तक्रार नोंदवली.

तोतवानी यांनी तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे त्यांचा प्रॉपर्टी डीलिंगचा व्यवसाय असून ते संदीप उर्फ गप्पू समुंद्रे याला ओळखतात.समुद्रे हा दहा वर्षांपूर्वी खासगी काम करुन अर्थाजण करीत होता मात्र,अचानक त्याच्याकडे प्रचंड प्रमाणात मालमत्ता जमा झाली असून, आपल्यासोबत तो सतत पंधरा-वीस गुंड प्रवृत्तीच्या तरुण मुलांचा घोळका ठेवतो.आता त्याच्या वर्तवणुकीत खूप फरक पडला असल्याचे तोतवानी तक्रारित नमूद करतात.
समुद्रे याची भाजप आमदार तसेच दबंग व वादग्रस्त लोकांसाेबत उठबस आहे.यात दैनिक लोकमतचा क्राईम रिर्पोटर नरेश डोंगरे याचाही समावेश आहे.या सर्वांच्या ओळखीतून समुंद्रे लोकांमध्ये दहशत निर्माण करुन अवैध वसूली करीत असल्याचा गंभीर आरोप मनीष तोतवानी यांनी केला.माझा प्राॅपर्टी डीलिंगचा व्यवसाय खूप चांगला चालत असल्याने समुंद्रे याने जानेवरी २०२५ मध्ये माझ्या भूतकाळातील क्रिकेट बुकीच्या कामाच्या आधारावर लोकमतचा पत्रकार नरेश डोंगरेच्या नावाने खंडणी मागितली.मला वाद वाढवायचा नसल्याने मी ५० हजार ते १ लाख रुपये दर महिन्याला गेल्या सात-आठ महिन्यांपासून त्यांना देत आहे मात्र,अचानक त्यांनी आता मला २५ लाखांची खंडणी मागितली असून मी माझे जुने क्रिकेट बुकी सट्टयाचे काम सोडले असल्याने एवढी रक्कम देण्यास असमर्थ आहे.
त्यामुळे मी गप्पू समुंद्रे याला बोलावून,त्याला व नरेश डोंगरेला या पुढे मी रक्कम देण्यास असमर्थ असल्याचे सांगितले.यावर,समुंद्रे याने एकसाथ सेलटमेंट करायचे असल्यास माझे नरेश डोंगरेसोबत बोलणे झाले असल्याचे सांगून एकसाथ २५ लाख रुपयांची खंडणी मागितली.यावर माझ्याकडे इतका पैसा नसून माझे काका पंजू तोतवानी यांच्यासोबत बोलून कळवतो,असे समुंद्रेला सांगितले.माझे काका नरेश डोंगरेला चांगल्याने ओळखत असल्याने मी माझ्या काकांना नरेश डोंगरेंचे नाव नाही सांगितले व समुंद्रे याला टाळत राहीलो.
एक दिवस समुंद्रे याने फोन करुन मला खामला चौकात बोलावले व पैसे तर तुला द्यावेच लागतील, नाही तर नरेश डोंगरे याची खूप चांगली ओळख पोलिस आयुक्त व पोलिस आधिका-यांसोबत असल्याने तो तुला बर्बाद करेल,अशी धमकी दिली.त्यामुळे माझे व समुंद्रेचे तिथेच भांडण झाले.गप्पु समुंद्रेने फोन लावून नरेश डोंगरेसोबत बोलण्यास सांगितले.नरेश डोंगरेने मला फोनवर,‘तेरी चमडी बहोत मोटी हो गई है क्या?जितना पैसा तुने कमाया है वो सब तेरे गां…से निकाल दूंगा.मेरी पहचान बडे-बडे पुलिस अधिकारियों से है,सब मेरे पास आते है,मै तेरा जीना हराम कर दूंगा.अब आगे से तू और तेरा खानदान कैसे रहता है मैं देखता हूं,’.अशी फोनवर धमकी दिली.
यानंतर माझी व गप्पू समुंद्रेची बोलचाल बंद झाली.मी पैसे देण्यास नकार दिल्याने ५ सप्टेंबर २०२५ रोजी नरेश डोंगरे याच्या पुढाकारातून समुंद्रे याच्या गुंड मुलांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला केला.याची तक्रार मी राणाप्रताप नगर पोलिस ठाण्यात केली आहे.मात्र,त्या तक्रारीत मी नरेश डोंगरेचे नाव सांगितले नाही कारण डोंगरे व नागपूरातील पोलिस विभागाच्या अधिका-यांसोबत त्याचे जवळीकीचे संबंध यांची मला भीती होती.मात्र,विगत काही दिवसांपासून नरेश डोंगरे व गप्पू समुंद्रे पोलिस अधिका-यांसोबत ओळखीची भीती दाखवून दोघेही मला बर्बाद करण्याचे षडयंत्र रचत असल्याचे मनीष तोतवानीने आपल्या तक्रारीत नमूद केले.त्यांना शहरातील एका मोठ्या नेत्याचे(आमदाराचे)संरक्षण ही मिळाले असून पोलिस आयुक्तांच्या नावाने मला धमकाविले जात असल्याची तक्रार मनीष तोतवानीने केली.मला कोणत्याही खोट्या केसमध्ये फसविण्याचे त्यांचे षडयंत्र सुरु असल्याचे तोतवानीने नमूद केले.
मला माझ्या काही ओळखीच्या लोकांकडून कळले की २०२६ मध्ये नरेश डोंगरे व गप्पू समुंद्रे आपल्या काही गुंडवृत्तीच्या चेलेचपाट्यांसोबत राजस्थानच्या पुष्कर येथे गेले असता त्या ठिकाणी माझ्याविरुद्ध षडयंत्र रचले गेले आहे.या दौ-याचा संपूर्ण खर्च गप्पू समुंद्रे यांनी केला.गप्पू,नरेश डोंगरे त्यांच्या गुंडप्रवृत्तीच्या साथीदारांमार्फत माझ्या हत्येचा कट रचत असल्याचा गंभीर आरोप मनीष तोतवानीने तक्रारीत केला.या लोकांपासून मला व माझ्या कुटूंबियांना गंभीर धोका असून ८ डिसेंबर २०२५ रोजी गप्पू व नरेश डोंगरे यांच्या इशा-यावरुनच माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला होता,त्यावेळी तर माझे प्राण वाचले मात्र आता शहरातील एका मोठ्या नेत्याचा(आमदार)गप्पूला आश्रय असल्याने व नरेश डोंगरेचे पोलिस अधिका-यांसोबत जवळीकीचे संबंध असल्याने माझी हत्या कधीही होऊ शकते.
गप्पू हा स्वत:क्रिकेट बुकी व अवैध साहूकार असल्याने त्याचे पोलिस अधिका-यांसोबतही चांगले संबंध असल्याचा गंभीर आरोप मनीष तोतवानीने केला.
यामुळेच कलम ३०७ तसेच इतर गंभीर कलमांतर्गत गुन्ह्यांची नोंद असतानादेखील पोलिस त्याच्या विरोधात कोणतीही कारवाई करीत नाही.गप्पूचा मावस भाऊ चेतन हजारेने सीताबर्डीमध्ये बाल्या बिनेकरची हत्या केली होती.हत्येनंतर चेतन हा गप्पूच्याच घरात सापडला होता.गप्पू व नरेश डोंगरे गुन्हेगारांच्या मदतीने माझ्या विराेधात हत्येचे षडयंत्र रचत असल्यानेच मी माझी संपूर्ण व्यथा या तक्रारीत नमूद केली असून, माझ्या कुटूंबियांनी मला हिंमत दिल्यानेच मी ही तक्रार देत असून डोंगरे व गप्पू समुंद्रेच्या विरोधात तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मनीष तोतवानीने आपल्या तक्रारीत केली.
या तक्रारीसोबत तोतवानी यांनी नरेश डोंगरे यांच्या एका फेसबुक पोस्टचे छायाचित्र जोडले असून,या पोस्टमध्ये डोंगरे यांनी ,‘कितने षडयंत्र करेंगा तू..कितने बार निरपराधो को फसांयेगा तू…याद रख,इश्वरने तुझे इसके पहले सिर्फ इशारा दिया है,अब…जब मिलेंगी वो सजा बहोत भयंकर होगी…सुधर जा…बंद कर अपली कुटनीति‘असे त्या पोस्टमध्ये नमूद आहे.
थोडक्यात,पत्रकार वर्तुळात या तक्रारीची चांगलीच चर्चा असून दोन दिवसांपूर्वीच प्रेस क्लबमध्ये नागपूरचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासोबत,‘मिट द प्रेस’उपक्रम पार पडला,यावेळी नरेश डोंगरे पोलिस आयुक्तांच्या शेजारी बसला असून,अश्याच ओळखींचा व व रसूखचा वापर करुन शहरातील वैध-अवैध मालदार असामींकडून खंडणी वसूल करण्याचा मार्ग मोकळा होतो,असा आरोप करीत निदान नागपूर प्रेस क्लबने तरी याची खबरदारी घ्यावी,असे आवाहन नागपूरातील पत्रकारितेप्रति समर्पित पत्रकारांनी केले आहे.

(छायाचित्र : उजवीकडून दुसरे ,पत्रकार नरेश डोंगरे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासोबत एकाच मंचावर उपस्थित असताना)
मागे दैनिक ‘लोकसत्ताचा’ क्राईम रिर्पोटर मंगेश राऊत पोलिसांनाच तीन लाखांची खंडणी मागीतल्यामुळे अडचणीत आला.त्याच्यावर गुन्हा दाखल करुन तुरुंगात डांबण्याऐवजी नोकरीतून फक्त हकालपट्टीकरुन या दैनिकांच्या धुरीणांनी इतिश्री मानली.यामुळे ‘वरुन’यांना नेमकं कोणाचं वरदहस्त असतं,यावर बरीच चर्चा नागपूरातील पत्रकार जगतात झडली होती.याशिवाय हिंदी वृत्तपत्र ‘ दैनिक भास्कर’मधील मुख्य वार्ताहर सुनील हजारे याने देखील नागपूर प्रादेशिक कार्यालयातील (आरटीओ) चेसिस घोटाळ्यात नाव न छापण्याच्या मोबदल्यात ८० हजारांची खंडणी तक्रारकर्ते धनराज उर्फ टिटू साधुराम शर्मा यांना मागितली.खंडणी घेणा-या या पत्रकाराला २९ ऑगस्ट २०२४ रोजी सदर पोलिसांनी अटक देखील केली होती.मात्र, त्याच्यावर देखील दैनिक भास्करच्या व्यवस्थापनाने नोकरीतून बडतर्फ न करता फक्त नाशिक येथे बदली करुन त्या दलाल पत्रकाराला ’जीवनदान’देण्यात या दैनिकाच्या शीर्षस्थ विभूतींनी कर्तव्याची इतिश्री मानली व लोकशाचीच्या चौथ्या स्तंभाची अशी ‘सोयीस्कर‘बूज राखली.अशी परखड टिका त्या काळी समाज माध्यमात उमटली.दैनिक लोकमतच्या हिंदी आवृत्तीतील क्राईम रिर्पोटर जगदीश जोशीवरही ‘भरघोस’खंडणीचे आरोप होऊन तक्रार दाखल झाल्याने त्याची नोकरीवरुन गच्छंती झाली.मात्र,अवैध पैशांची चटक जीभेला लागली असल्याने व पोलिस विभाग,गुन्हे शाखेतील काही भ्रष्ट पोलिस आधिका-यांच्या हितसंबंधांतून सूडाच्या राजकारणात सध्या कारवाई झालेले पत्रकार व्यग्र असल्याची चर्चा आहे.
अवघे चाळीस-पन्नास हजार रुपये पगार असलेल्या नागपूरातील क्राईम बिट सांभाळणा-या काही पत्रकारांचे कोट्यावधीचे बंगले व अतिशय महागड्या चारचाक्या हे डोळे दिपवून टाकणारे आहे.यातील एकाचे तर नैनितालमध्ये पंचतारांकित हॉटेल देखील आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्ताकाळात,गृहमंत्री अमित शाह यांच्या अधिपत्याखाली येणा-या सक्तवसुली संचालनालयाने(ईडी)नागपूरात रामेश्वरीसारख्या अविकसित भागातील एका लहानशा गल्लीत दुमजली घरात राहणारे ॲड.सतीश उके यांच्या घरावर ३० मार्च २०२२ रोजी पहाटे ५ वाजता छापा मारला व त्यांना अटक करीत विमानाने थेट मुंबईला नेले,तब्बल तीन वर्षे त्यांना जामीन देखील मिळाला नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,विद्यमान महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींविरोधात ॲड.उके यांनी निवडणूक याचिका दाखल केली होती व न्यायालयीन प्रक्रियेत त्यांना जेरीस आणले होते,हाच त्यांचा दोष.दुसरीकडे,शाह यांच्या ईडीला नागपूरातील काही क्राईम रिपोटर्सचे कोट्यावधींचे बंगले व पंचतारांकित हॉटेल्स, ही कमाई मात्र दिसत नाही,त्यामुळेच काही पत्रकार व काही सत्ताधुरीण यांच्या अभ्रद युतीतून अलीकडची पत्रकारिता ही किती ‘व्यवसायिक’‘नीतीमत्ताशून्य ’आणि ‘सोयीस्कर’झाली आहे,याची प्रचिती येते.
सत्ताधीशची भूमिका:-
‘सत्ताधीश’ने गेल्या तीन दिवसात या तक्रारीवर डोंगरे यांचे काय म्हणने आहे,हे जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र,पलीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.त्यामुळे ‘सत्ताधीश‘या वृत्ताविषयी कोणतीही तथाकथित मानहानीची नोटीस स्वीकारणार नाही तसेच,तक्रारीत नमूद आरोपींनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडल्यास ‘सत्ताधीश‘त्या वृत्तालाही ठलकपणे प्रसिद्ध देईल.

…………………………………..

आमचे चॅनल subscribe करा