

नागपूर, ता. १ डिसेंबर: आंबेडकरी नाट्य चळवळीतील लेखिका, दिग्दर्शक तसेच नाट्य कलावंत पल्लवी वहाणे-जीवनतारे यांना नुकताच सोलापूर येथील अश्वघोष कलासक्त राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला. अश्वघोष कला व सांस्कृतिक रंगभूमीतर्फे हा पुरस्कार ५ डिसेंबरला सोलापूर येथे प्रदान करण्यात येईल. पल्लवी वहाणे यांनी नागपुरातील झोपडपट्टीतील १० वर्षांच्या मुलीपासून सतर ६० वर्षंच्या महिलांना पथनाट्य चळवळीत आणले. झोपडपट्टीतील फुटबॉलपटू तयार करणाऱ्या स्लॅम साकरच्या धर्तीवर त्यांनी नागपुरात स्लम ड्रामा तयार केला. विविध प्रयोग सादर केले. याशिवाय चळवळ एकपात्री प्रयोगाचे दिडशेवर प्रयोग विविध राज्यात सादर केले. तर नुकतेच समाजाला जाब विचारणरा ‘रमाई’ नव्या नाट्य प्रयोगातून वहाणे यांनी पुढे आणली आहे. त्यांच्या या योगदानाबद्धल त्यांना हा पुरस्कार घोषित झाला आहे. पुणे, मुंबई आणि सोलापूर येथील पुरस्कार समिती सदस्यांनी मागील २५ वर्षांपासून आंबेडकरी नाट्य चळवळीतील योगदान लक्षात घेत त्यांना हा पुरस्कार घोषित केला आहे.
दलित नाट्य चळवळ असे नामविधान असताना दलित रंगभूमी या संस्थेद्वारे पथनाट्य सादरीकरणापासून पल्लवी वहाणे यांची नाट्य चळवलीत एन्ट्री झाली. बालकलावंत म्हणून आकाशवाणीपासून त्यांची सरूवात झाली. धर्मेश सोनटक्के, अशोक जांभुळकर, संजय जीवने, सुनील रामटेके, अनिल कांबळे, मिलींद रामटेके या जेष्ठ नाट्यकर्मींच्या मार्गदर्शनात त्यांना आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीचे बाळकडू मिळाले. यानंतर सुर्यकुल नाट्य निकेतनच्या माध्यमातून प्रविण कांबळे लिखित आणि अशोक जांभुळकर दिग्दर्शीत ‘सावित्रीच्या लेकी’ हा नाट्यप्रयोग बराच गाजला. पल्लवी वहाणे यांनी मोहीम पथनाट्यापासून लेखनाला सुरूवात केली. राज्यातील पुणे, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूरसह मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यात ‘चळवळ’ या एकपात्री प्रयोगाचे सुमारे १५० प्रयोग केले. याशिवाय मोहीम, जाणीव या पथनाट्याचे लेखन करून झोपडपट्टीतील महिलांना पथनाट्यातून अभिनयासाठी सक्षम केले. विद्यार्थ्याना व्यसनमुक्तीचे धडे देण्यासोबतच संविधानाचा गजर करण्यासाठी लहान मुलांचे पथनाट्य लिहून, शाळेमध्ये सादर केले. त्यांच्या या कार्याची पावती म्हणून रिपब्लिकन मुव्हमेंटतर्फे डॉ. भाऊ लोखंडे, जेष्ठ साहित्यिक ताराचंद्र खांडेकर, नरेश वहाणे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
स्लम ड्रामा
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगर या झोपडपट्टीतील गरीब महिला. नाटक म्हणजे काय हे माहित नाही. अभियनाचा गंध नाही. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा जल्लोष साजरा होण्यापेक्षा त्यांचे विचार जनमानसात पोहचावे या हेतूने पल्लवी वहाणे यांनी रंगमंचाशी ओळख नसलेल्या झोपडपट्टीतील महिलांना घेऊन “जाणीव संविधानाची’ हे पथनाट्य तयार केले. वंचित महिलांनी स्वतःचा रंगमंच उभारला. वस्ती-वस्तीमध्ये बाबासाहेबांचा विचार पेरण्यासाठी झोपडपट्टी फुटबॉलच्या धर्तीवर “अ स्लम ड्रामा’ झोपडपट्टीतील महिलांनी रंगमंचावर आणला




आमचे चॅनल subscribe करा
