Homeब्रेकिंग न्यूज'कसौटी जिंदगी की' आणि....कास्टिंग काऊच!

‘कसौटी जिंदगी की’ आणि….कास्टिंग काऊच!

Advertisements

(शुक्रवार स्तंभ-‘कहानि पुरी फिल्मी है’)

रेवती जोशी-अंधारे

लाडक्या बॉलीवूडमागचे बदनामीचे ग्रहण काही सुटता सुटत नाही. कितीदा नव्याने… असे म्हणत, त्याच त्या जुन्या विषयावर कोणीतरी काहीतरी बोलले की, झालीच कोळसा उगाळायला सुरुवात ! आता पुन्हा एकदा कास्टिंग काऊचचा विषय चर्चेत आला आहे. पण, यावेळी विषय छोट्या पडद्यावरच्या कलाकारांशी संबंधित आहे. के सिरीजची निर्माती एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेतून चर्चेत आलेल्या अदिती सनवालने कास्टिंग काऊचचा एक नवा आरोप केला आहे.

तिच्या आरोपानुसार फिल्म आणि टिव्ही क्षेत्रात फ्रॉड कास्टिंग एजंट सक्रीय आहेत आणि हे तोतया एजंट मायानगरीत धडपड करणा-या कलाकारांना लुबाडतात. आतापर्यंत कास्टिंग काऊचचे आरोप हे केवळ शारिरीक शोषणाच्या संदर्भात होत असत. पण, अदितीच्या वक्तव्याने कास्टिंग काऊचचा एक नवा चेहरा समोर आला आहे.

एक अभिनेता किंवा सेलिब्रिटी बनण्याच्या आशेने आलेले हे युवा कलाकार आपले मोबाईल नंबर मिडीयासोबत आणि पीआर समूहासोबत शेअर करतात. त्यातून त्यांना जशी कामे मिळतात तसेच त्यांचे नंबर या कास्टिंग काऊचलाही खूप सहजतेने मिळतात. मग, या कलाकारांना घाणेरड्या ‘ऑफर्स’ येऊ लागतात. हो! अगदी पुरुष कलाकारांनाही ! अशा लोकांना वेळीच ओळखून, त्यांचे नंबर ब्लॉक करता येतात. पण, जी मुले-मुली त्यांच्या गोड बोलण्याला फशी पडतात त्यांचा गैरफायदा घेण्याची संधी कास्टिंग काऊच सोडत नाहीत. तिच्या मते, कास्टिंग काऊच एक भीषण आणि गंभीर वास्तव आहे आणि त्याचा अनुभव मुलामुलींना सारखाच येतो.

यात दोन प्रकार आहेत. पहिला म्हणजे सरळसरळ पैसे घेऊन, काम मिळवून देण्याचे आश्वासन देणे! एकदा पैसे घेतले की, फोन न उचलणे, ओळख न दाखवणे आणि खूपच झाले तर त्या मुलाविषयी किंवा मुलीविषयी अपप्रचार करण्याचा उद्योग कास्टींग काऊच करतात. या क्षेत्रात आलेल्या प्रत्येकाने, भलेही तो त्यांच्या जाळ्यात अडकला नसेल पण, अशा ऑफर्सचा अनुभव सगळ्यांनीच घेतलेला असतो. दुसरा प्रकार म्हणजे, इंडस्ट्रीमध्ये आपले कसे मोठमोठे कॉन्टॅक्ट्स आहेत, हे रंगवून सांगणे, बड्या कलाकारांसोबत जवळीक दाखविणारे फोटोज दाखविणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रोफेशनल कास्टर सारखे वागणे-बोलणे !

यांचे टारगेट बहुतेक वेळा मुंबईबाहेरची मुलेमुली असतात कारण, त्यांना हा प्रकार फारसा माहिती नसतो. हे लोक नवोदितांना त्यांचे काही फोटो मागतात. मग, तुम्ही ‘सिलेक्ट’ झाल्याचे सांगतात आणि ऑडीशन व्हिडीओ मागतात. त्यानंतर, एका नव्या प्रोजेक्टसाठी तुम्ही शॉर्टलिस्ट झाल्याचे सांगतात. यासोबतच ते रजिस्ट्रेशन फी म्हणून काही रक्कम जमा करायला सांगतात. इतक्या घटनाक्रमापर्यंत त्या मुलामुलींची अपेक्षा वाढलेली असते आणि वाट्टेल ते करून पैसे भरायला ही मुले तयार होतात. पैसे भरल्यानंतर, एक कॉन्ट्रॅक्ट पाठविला जातो ज्याला कागदाच्या एका तुकड्यापेक्षा जास्त काहीही अर्थ नसतो. पण, हे लक्षात येईपर्यंत पैसे गेलेले असतात. अशा प्रकरणांमध्ये डोक्याला हात लावण्यापेक्षा दुसरे काहीही करता येत नाही.

२०१६ मध्ये प्रदर्शित दंगल ची अभिनेत्री फातिमा सना शेख हिनेदेखील कास्टिंग काऊच ऑफर आल्याचा खुलासा केला आहे. “चाची ४२०”, “वन टू का फोर” आणि “इश्क” सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम करणा-या फातिमाने, शारिरीक संबंध ठेवण्याची तयारी असेल तरच काम मिळेल, अशा स्पष्ट ऑफर आल्याचे सांगितले आहे. तेव्हा बोलायची हिंमत झाली नाही पण, आता काळ बदलला आहे. आपल्या बोलण्यामुळे किमान इतरांचे तरी नुकसान होऊ नये म्हणून आता बोलत असल्याचेही तिने मोकळेपणाने सांगितले. ती “अ‍ॅक्ट्रेस ल्युडो” आणि “सूरज पे मंगल भारी” या दोन आगामी बड्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

कला क्षेत्राची निवड प्रक्रीया अतिशय अन ऑर्गनाईज्ड् आहे. बहुतेक वेळा याच्या-त्याच्या ओळखीतूनच काम दिले जाते. क्वचित एखाद्याची निवड त्यांचे काम बघून केली जाते. कळतनकळत समाजमनावर संस्कार करणारी , कोट्यवधींची उलाढाल करणारी, लाखो लोकांना रोजगार देणारी, फॅशनपासून ते बोलण्याच्या शैलीपर्यंत सांस्कृतिक बदल घडविणारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्जनशील, संवेदनशील कलाकारांची मांदियाळी असलेली ही फिल्म इंडस्ट्री इतकी बथ्थड कशी होऊ शकते? कसौटी जिंदगी की... हेच या प्रश्नाचे उत्तर आहे.
………………

Latest बातम्या