फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजनो वन किल्ड् सुशांत !

नो वन किल्ड् सुशांत !

Advertisements

(शुक्रवार स्तंभ-’कहानि पुरी फिल्मी है’)

रेवती जोशी-अंधारे

वर्ष २००६ … मॉडेल-वेट्रेस जेसिका लाल हिच्या हत्याकांडाची केस दिल्ली पोलिसांनी बंद केली. पुरेशा पुराव्यांअभावी, जेसिकाचा मारेकरी मनु शर्मा याला सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. घटना १९९९ ची… नवी दिल्लीच्या एका रेस्टॉरण्टमध्ये काम करणारी सौंदर्यवती जेसिका लाल आणि तिचा सहकारी-मॉडेल शयान मुंशी त्यांचे काम पूर्ण करून रेस्टॉरण्ट बंद करण्याच्या तयारीत होते. सिद्धार्थ वशिष्ठ उर्फ मनु शर्मा त्याच्या दोन मित्रांसह तिथे पोहचला आणि दारू सर्व्ह करण्याचा आदेश जेसिकाला दिला. आता बार बंद झालेय, असे जेसिकाने नम्रपणे वारंवार सांगूनही मनु शर्मा आणि कंपनी ऐकायला तयार नव्हती. थोडा वाद झाल्यावर, आपल्याला नकार देऊन या मुलीने गुन्हा केला आहे आणि त्याची शिक्षा तिला मिळायलाच हवी, अशा संतापाच्या भरात शर्माने जेसिकाला गोळ्या घातल्या. नंतरचा घटनाक्रम यथावकाश घडत राहीला. तपास, साक्षी-पुरावे, दावा-प्रतिदावा, राजकीय दबाव, पडद्यापुढचे आणि मागचेदेखील नाट्य ! तारीख पे तारीख…!

या सगळ्या घडामोडीनंतर फेब्रुवारी २००६ मध्ये दिल्ली सत्र न्यायालयाने निकाल दिला, ‘नो वन किल्ड जेसिका’! जेसिकाला कोणीही मारलेले नाही कारण, तसे पुरावे नाहीत. या निर्णयानंतर जनक्षोभ उसळला. मनु शर्माची सुटका झाल्यामुळे न्याय सामान्यांसाठी नाही, अशा चर्चेला उधाण आलं. जेसिकाची बहिण सबरीना लाल आणि मिड्ल फिंगर प्रोस्टेट्स या चळवळीचे संस्थापक प्रभलोच सिंह एकीकडे तर दुसरीकडे मनु शर्माचा राजकीय-आर्थिक दबदबा असलेला ‘शक्तिमान’परिवार, असे या वादाचे स्वरूप झाले. जनतेच्या दबावामुळे हे प्रकरण पुन्हा उघडण्यात आले आणि फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालविण्यात आले. सहाच महिन्यात म्हणजे डिसेंबर २००६ मध्ये मनु शर्मा दोषी असल्याचे सिद्ध झाले आणि त्याला आजीवन कारावासाची शिक्षा झाली. या प्रकरणावर २०११ मध्ये राणी मुखर्जी आणि विद्या बालन अभिनीत ‘ नो वन किल्ड जेसिका ‘ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. नंतर, जेसिका विस्मृतीत‌ गेली आणि मनू शर्मा पॅरोल वगैरे लाभ घेत जगतोय.

जवळपास दीड दशकापूर्वीचे हे प्रकरण आज आठवण्याचे कारण एवढेच की, आता ‘नो वन किल्ड सुशांत !’ हा निवाडा आपल्याला ऐकायला मिळणार आहे. जवळपास चार महिन्यांच्या तपास, आरोप-प्रत्यारोप आणि चर्चेनंतर आता सीएफएसएलच्या अहवालानुसार, सुशांतचे ‘पार्शियल हॅन्गिंग‘ झाले आहे. त्याची हत्या झाल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. पार्शियल हॅन्गिंग म्हणजे आपल्या साध्या भाषेत, अर्धफाशीची स्थिती असते. बहुतांश आत्महत्यांच्या प्रकरणांमध्ये खरे तर अर्धफाशीचीच अवस्था असते म्हणे ! तसा तर सुशांत एम्बीडेक्सट्रस म्हणजे दोन्ही हातांचा समान वापर करणारा होता. पण, दैनंदिन कामे तो उजव्याच हाताने करीत असे. गळ्याला बांधलेल्या कापडाची गाठ आणि तो उजव्या हाताचा वापर करीत असल्याची qलक अहवालात जोडण्यात आली आहे. त्या विशिष्ट कापडाची निवड, त्या कापडाचे विश्लेषण , फाशीसाठी त्याने किती जोर लावला असावा यासह इतर अनेक बारकाव्यांचा उल्लेख या अहवालात आहे. हा अहवाल आता सीबीआयकडे सोपविला जाणार आहे.

सुशांतची हत्या की आत्महत्या? इथपासून सुरू झालेला हा तपास, उडत्या बॉलीवूडपर्यंत जाऊन पोहचला आहे. आता सुशांत प्रकरणातील सगळे कंगोरे बोथट झालेत आणि कलाकारांच्या अंमलदारीला धार चढलीये. न जाणो, सुशांतच्या प्रकरणातही वर्ष-सहा महिन्यात केस पुन्हा उघडली जाईल. राजकीय-आर्थिक दबाव, बिहारच्या निवडणुकीचे वेध, तिघाडी सरकारमधील बिघाडी, कोरोना अशा सगळ्या कारणांचा निपटारा होईल कदाचित ! मगच, हू किल्ड सुशांत ? या प्रश्नाचे उत्तर आपल्यासारख्या सामान्यांना मिळेल. कदाचित, त्याच्यासोबतच त्याच्या मृत्यूचे गूढही विस्मृतीत जाईल. कदाचित…

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या