

सामाजिक कार्यकर्ते हरीष अड्याळकर पाठोपाठ मुलाचाही मृत्यू!
नागपूर: प्रकृती अस्वस्थ झाल्याने घरच्यांनी मोठ्या विश्वासाने १०८ क्रमांकावर फोन केला. काही वेळातच रुग्णवाहिका महिला डॉक्टरसह दारात उभी झाली, पण रुग्ण करोनाचा आहे असे समजताच डॉक्टरांच्या डोक्यावर आठ्या आल्या. विनंती केल्यानंतर त्यांनी रुग्णाची नाडी पाहिली आणि हे मृत झाल्याचे सांगितले, मात्र घरच्यांच्या मते त्यांनी सोबत आणलेल्या रुग्णवाहिकेनेच रुग्णालयात नेले असते तर प्राण वाचू शकले असते. हा दुर्दैवी अनुभव शनिवारी सकाळी शहरातील अड्याळकर कुटुंबीयांनी घेतला. जेष्ठ लोहियावादी व गांधीवादी, सामाजिक कार्यकर्ते हरीष अड्याळकर यांचे गुरुवारी सायंकाळी करोना संसर्गाने निधन झाले असतानाच शनिवारी सकाळी त्यांचा मुलगाही याच आजाराने दगावल्याने अड्याळकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
आठवडाभरापूर्वीच हरीष अड्याळकर यांना बरे वाटत नसल्याने व मुलगा त्यांना सर्वसाधारण उपचारासाठी डॉक्टरांकडे घेऊन जात असल्याने दोघांनाही करोनाची चाचणी केली व ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे हरीष अड्याळकर यांना ३० ऑगस्ट रोजी (रविवारी) मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. मुलगा घरीच विलगीकरणात होता. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी हरीष यांचे निधन झाले. त्याचा मोठा धक्का मुलगा नितीन अड्याळकर यांना बसला. शुक्रवारी दुपारी हरीष यांच्या पार्थिवावर अंत्यंसस्कार झाल्यानंतर सायंकाळी नितीनची प्रकृती अस्वस्थ वाटू लागली. मात्र झोप न झाल्यामुळे तसे वाटत असेल म्हणून औषध घेऊन ते घरीच होते. शनिवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास ते बाथरूमला जाऊन आले व त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यांची ती अवस्था पाहून घरच्यांनी लगेच १०८ या क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका व वैद्यकीय मदतीची मागणी केली. अर्ध्या तासात रुग्णवाहिका आली. मात्र त्यात ना ऑक्सिजन ना सोबत स्ट्रेचर. अड्याळकर कुटुंब वरच्या मजल्यावर राहते. रुग्णवाहिकेत एक महिला डॉक्टर आणि चालक असे दोघेच होते. डॉक्टरांनी नितीन अड्याळकर यांची नाडी तपासली व ते मृत झाले असल्याचे सांगितले, मात्र रुग्णवाहिकेने यांना मेडिकलला घेऊन जा तेथे उपचार होतील तर हे वाचू शकतील, असे कुटुंबाचे म्हणणे होते. डॉक्टर मात्र मनपाच्या झोनची हद्द कुटुंबाला समजवत राहिल्या आणि शेवटी रुग्णवाहिका डॉक्टरसह निघून गेली. त्यानंतर पुन्हा दुसरी रुग्णवाहिका मिळविण्यासाठी कुटुंबीयांची धडपड सुरू झाली. मात्र आयुष्यभर समाजासाठी धावणाऱ्या हरीष अड्याळकर यांच्या मुलासाठी एकही रुग्णवाहिका मिळत नव्हती.

आमचे चॅनल subscribe करा