Homeनागपूर न्यूजव्हीएनआयटी कोविड केअर सेंटरमध्ये शहरातील पहीला मृत्यू

व्हीएनआयटी कोविड केअर सेंटरमध्ये शहरातील पहीला मृत्यू

नागपूर,ता. २५ ऑगस्ट: शहरात विविध शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त मृत्यूंची नोंद झाली आहे मात्र  विश्‍वेशवरैया नॅशनल इंन्सिटीट्यूट ऑफ टेक्नेलॉजी [व्हीएनआयटी] कोविड केअर सेंटरमध्ये शहरातील आज पहीला मृत्यू झाला.

सिवनी(मध्यप्रदेश)चे गुप्ता नावाचे गृहस्थ हे शस्त्रक्रियेसाठी नागपूरातील एका खासगी रुग्णालयात आले होते. त्यांचे वय हे ८५ वर्षापेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्यांना सर्दी,खोकला व श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांची करोना चाचणी करण्यात आली.त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्यांना मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.

आज सायंकाळी ४.३० ते ५ वा.च्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये झालेला हा पहीलाच मृत्यू आहे. याबाबतची संपूर्ण माहिती घेण्याकरिता मनपाच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ.योगेंद्र सवाई यांना फोन केला असता आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पाठोपाठ त्यांचा ही अहवाल हा करोना पॉझिटीव्ह आला असल्याचे सांगून त्यांनी उद्या सविस्तर माहिती देतो,असे सांगितले.
मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी यांना फोन केला असता त्यांनी याबाबत तपशीलवार माहिती नसल्याचे सांगून उपरोक्त माहीती दिली. व्हीएनआयटी कोविड केअर सेंटरचे प्रमुख डॉ.नंदेश्‍वर यांनी फोन उचललाच नाही.

यापूर्वी १३ ऑगस्ट रोजी याच कोविड केअर सेंटरमधील १४ डॉक्टर्स आणि परिचारिकांना करोनाची बाधा झाली असल्याचे निदान झाले होते,हे विशेष! या केंद्रातील २०० पेक्षा अधिक रुग्णांच्या संपर्कात सातत्याने येत असल्याने करोना योद्धे हेच करोना बाधित झाल्याचे समोर आले होते.

Latest बातम्या