
मनपाच्या ऑन-लाईन सभेचा पुरता उडाला फज्जा!
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. २० ऑगस्ट: गुरुवारी आज नागपूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा सकाळी ११ वा.वेबेक्स डॉट.कॉमवर ऑन-लाईन निर्धारित करण्यात आली होती मात्र ११ ते ११.४० पर्यंत तब्बल पाऊण तास स्क्रीनवर वेगवेगळ्या नगरसेवकांचे फक्त ‘हॅलो..हॅलो‘च ऐकू येत होते.‘हे असेच राहील तर कसे होईल?’अशी उद्वीग्नताही एका नगरवेकाने व्यक्त केली.
अधिकृत माहितीप्रमाणे तब्बल ९० च्या जवळपास विविध पक्ष्ाचे नगरसेवक व मनपाचे प्रशासकीय अधिकारी या ॲपमार्फत जुळले होते.मात्र आवाजाची अस्पष्टता,अनेकांनी मोबाईल म्यूट केलेच नसल्याने वेगवेगळ्या आवाजांचा गोंगाट यामुळे मनपाच्या सर्वसाधारण सभेचा अक्ष् रश:‘ऑन-लाईन’फज्जा उडाला. महापौर संदीप जोशी यांनी अनेकवेळा त्रस्त होऊन,प्रश्नार्थक मुद्रेत हात उंचावून अगतिकता प्रकट केली.११.४० वा.एकदाची सभा सुरु झाली,महापौरांच्या अादेशानंतर आधी शोक प्रस्ताव व यानंतर अभिनंदन प्रस्तावाचे वाचन झाले.
यानंतर लगेच भाजपचे ज्येेष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावाचे वाचन करण्यात आले.शहरातील वाढत्या करोनाचा प्रकोपाच्या संदर्भात हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मेयो-मेडीकल सारख्या शासकीय रुग्णालयात बेडची कमी संख्या,शहरातील मोजक्या खासगी रुग्णालयात करोनाच्या उपचाराला परवानगी,प्रशासनाने वाढत्या करोना प्रकाेपापासून नियंत्रणासाठी काय-काय उपाय केले इ.ची कारणमीमांसा जाणून घेण्यासाठी हा स्थगन प्रस्ताव मंजूर करण्यासंबधी महापौरांना विनंती करण्यात आली.
यावर महापौरांनी प्रस्ताव मंजूर करीत दयाशंकर तिवारी यांना स्थगन प्रस्तावावर भूमिका मांंडण्याची सूचना केली मात्र दयाशंकर तिवारी हे ‘ऑन-लाईन’नाही...असा आवाज ऐकू आला,लगेच एका मिनिटांनी दयाशंकर तिवारी हे ऑन-लाईन आहेत असे शब्द ऐकू आले व दयाशंकर तिवारी यांचा बोलण्याचा आवाज ऐकू आला.यावर ज्येष्ठ नगरसेवक प्रफूल्ल गुडधे पाटील यांचा आवाज ऐकू येत ’हा प्रस्ताव मांडला कोणी?’हे तर आधी कळू द्या…’काँग्रेसचे कमलेश चौधरी हे देखील मध्येच बोलत असल्याने,महापौरांनी प्रत्येकाने आपापला मोबाईल म्यूट करावा फक्त दयाशंकर तिवारी यांचा आवाज सुरु ठेवण्याची सूचना केली.
यावर भाजपचे आमदार व माजी महापौर प्रवीण दटके यांनी ‘ना सभागृहात नेत्यांंची लिंक नीट आहे,अश्याने सभागृह चालूच शकत नाही,कोणाचाही आवाज कोणालाही ऐकू येत नाही,तुमचा आवाज ही आमच्यापर्यंत येत नाही,राजेंद्र सोणवने,कमलेश चौधरी यांनीही हीच तक्रार केली,विरोधी पक्ष् नेते तानाजी वनवे यांनी ही ‘अश्या पद्धतीने सभागृह चालूच शकत नाही’, दटके यांनी ‘दहा मिनिटांसाठी सभागृह स्थगित करावे’अशी मागणी केली.सभागृहात मांडण्यात आलेला स्थगन प्रस्ताव हा गंभीर विषयावर आहे,यावर विस्तृत चर्चा सभागृहात झाली पाहीजे,याआधी पण शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढला असताना भट सभागृहात सभा घेण्यात आली आहे,नागपूर शहरातील जनतेसाठी हे सभागृह असताना आवाजच येत नाही,आम्ही जनतेसाठी काहीच करत नाही,असे नाही झाले पाहिजे असे म्हणत,सभा भट सभागृहात घेण्याची विनंती दटके यांनी केली.
महापौरांनी तरीही सभा सुरु ठेवण्याचा प्रयत्न करीत सर्व सदस्यांनी मोबाईल म्यूट करावा अशी सूचना केली.विरोधी पक्ष् नेत्यांनी आपले मत प्रकट करावे,असे महापौर म्हणाले.यावर माजी स्थायी समिती सभापती प्रदीप पाेहोणे यांनी ’साहेब बाेलाजी, अशी टिपण्णी केली. बोलू द्या…बोलू द्या..बोलू दिलं तर तेव्हाच तर बोलतील...’यावर एका नगरसेवकाने ‘थांबा ना तुम्ही’अशी कोटी केली,असेच आवाज स्क्रीनवर आढदळ होते…. यावर दटके यांनी पुन्हा दहा मिनिटे सभा स्थगित करण्याची महापौरांना विनंती केली.
‘ज्या पद्धतीने हे सगळे प्रक्ष्े पण होत आहेत ते बघता सभा १० मिनिटांसाठी स्थगित करण्यात येत आहे’असा त्रागा करीत महापौरांनी सभा १० मिनिटांसाठी स्थगित केली.प्रफूल्ल गुडधे पाटील हे तरीही बोलतच होते त्यावर दटके यांनी ’स्थगित झाली हो स्थगित झाली’असे त्यांना कळवले.
दहा मिनिटांनी पुन्हा सभेचे कामकाज ‘लाईव्ह’सुरु होताच पुन्हा त्याच सर्व अडचणी दिसून पडताच महापौरांनी ‘ज्या पद्धतीने हे सर्व सुरु आहे,ते लक्ष्ात घेता ही तांत्रिक व्यवस्था कामाची नाही,अश्या पद्धतीने सभागृह चालणार असेल तर ते योग्य देखील होणार नाही,या सर्व तांत्रिक त्रुटी उद्यापर्यंत सुधारण्यात याव्या, सभागृह उद्या सकाळी ११.वाजेपर्यंत स्थगित होत आहे’असे निर्देश देऊन सभा स्थगित केली.यानंतर नेहमीप्रमाणे राष्ट्रगान झाले.
विशेष म्हणजे सभा स्थगित झाल्यानंतरही तब्बल दहा मिनिटे सदस्य हे एकमेकांशी बोलताना ‘लाईव्ह’दिसत होते!‘आता बोलता येणार नाही…सभा स्थगित झाली’असे सांगत होते…!
अनेक नगरसेवकांनी केला भट सभागृहाचा आग्रह-
आजच्या लाईव्ह सभेत टेक्नोसेव्ही नसलेल्या अनेक नगरसेवकांनी पराकोटीचा त्रागा व्यक्त करीत मागील सभेप्रमाणे ही सभा देखील सुरक्ष्ति अंतराचे पालन करीत सुरेश भट सभागृहात घेण्यात यावी असा आग्रह महापौरांकडे केला. आजच्या तांत्रिकी व यांत्रिकी सभेचा पुरता फज्जा उडाल्यामुळे महापौरांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केली.उद्या पुन्हा होणा-या या ऑन-लाईन सभेकडे आता नागपूरकर जनतेचे लक्ष् लागले आहे.
मुंढे शेवटपर्यंत स्क्रीनवर दिसलेच नाही!
जवळपास चालणा-या या एका तासाच्या गोंधळात, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे हे एकदाही स्क्रीनवर झळकलेच नाहीत. सभा स्थगित झाल्यानंतर एका नगरसेवकांनी त्यांचे नाव देखील घेतले मात्र सभेत आज त्यांची उपस्थिती आणि अस्तित्व शेवटपर्यंत जाणवले नाही.
२० जून रोजी पार पडलेली सर्वसाधरण सभा सत्ताधा-यांनी तब्बल चार दिवस लांबवली होती,या सभेत मुंढे यांच्या कार्यशैलीवर पराकोटीचे प्रहार करण्यात आले होते.महत्वाचे म्हणजे चार दिवसांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर मुंढे यांना उत्तर देण्याचा अवधी दोन तास देखील मिळाला नाही.सत्ताधारी हे मुंढे यांच्या उत्तराने समाधानी होत नसल्याने बराच गोंधळ झाला होता.
मुंढे यांनी याचाच वचपा काढत राज्य सरकारकडे शहरातील करोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे मनपातील सभा तसेच सर्व समितींच्या बैठका या फक्त ऑन-लाईनच घेण्यात यावा असा विनंतीपर प्रस्ताव पाठवला होता आणि तेवढ्याच तत्परतेने राज्य शासनाने तसा आदेश निर्गमित केला.परिणामी आजची सभा ही राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे ऑन-लाईन घेणे पदाधिका-यांनाही भाग पडले.
मात्र जनतेच्या अनेक प्रश्नांची उकल ही सभागृहात होत असते. सध्या जनताच नव्हे तर व्यापारी,दूकानदार वर्ग हा देखील मोठय्ा प्रमाणात नाराज आहे, कालच व्यापा-यांनी आंदोलन करीत शहरात एक दिवसाचा बंद पाळला.जनप्रतिनिधींना नागरिक हे प्रश्ने विचारत असतात त्याचे उत्तर देण्यास प्रशासनाचे प्रमुख म्हणून तुकाराम मुंढे हे बांधिल आहेत. मात्र असे घडले नाही.
एकीकडे राज्य सरकार महाराष्ट्राच्या राजधानीत पंधरा दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाला परवानगी प्रदान करतेय दूसरीकडे उपराजधानीत मात्र जनतेच्या संवैधानिक अधिकारांचीच मुस्कटदाबी करीत असल्याची चर्चा यानिमित्ताने रंगली होती.

आमचे चॅनल subscribe करा