Homeनागपूर न्यूजमहापौर झालेत सात दिवसांसाठी सेल्फ क्वारंटाईन

महापौर झालेत सात दिवसांसाठी सेल्फ क्वारंटाईन

बाधित व्यक्तिच्या संपर्क साखळीत आल्याने घेतला निर्णय

नागपूर,ता. ६ ऑगस्ट: शहराचे महापौर संदीप जोशी हे सात दिवसांकरिता घरातच सेल्फ क्वारंटाईन झाल्याची माहिती त्यांनी आज त्यांच्या फेसबूकवर टाकली. बाधित व्यक्तिच्या संपर्क साखळीत आल्याने त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे कळवले.

काल ते एका व्यक्तिच्या संपर्कात आले,त्या व्यक्तिच्या कुटुंबातील एक सदस्य हा करोना बाधित आढळला. मी पूर्णपणे स्वस्थ आहे मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे पुढील सात दिवस मी घरातच विलगीकरणात राहणार असल्याचे त्यांनी कळवले.

काल मी स्वत:हून कोणालाही भेटलो तर नाही तरीही माझ्या संपर्कात कोणी सायंकाळी ६ नंतर आल्यास त्यांनी स्वत: विलगीकरणात राहण्याचे आवाहन महापौरांनी केले.

कोविड संबधी उद्याची बैठक स्थगित-
गेल्या शुक्रवारी महापौरांच्या नेतृत्वाखाली मनपा मुख्यालयाच्या कंट्रोल रुम कक्षात भाजपच्या सर्व आमदारांची तसेच प्रशासकीय अधिका-यांची लॉक डाऊन संदर्भातील बैठक पार पडली होती. त्यावेळी महापौरांनी ‘शहरात लॉक डाऊन नाही म्हणजे नाहीच’असे ठणकावून सांगितले होते,तसेच पुढील शुक्रवारी म्हणजे ७ ऑगस्ट रोजी उद्या पुन्हा एकदा दूपारी १२ वा. सर्व आमदारांसह व प्रशासकीय अधिका-यांसह ही बैठक घेणार असल्याची घोषणा केली होती. मात्र महापौरांनी पुढील सात दिवस घरीच विलगीकरणात राहाणार असल्याचे स्पष्ट केल्याने उद्याची बैठक ही स्थगित झाली असल्याची माहिती मनपा जनसंपर्क विभागाकडून प्राप्त झाली.

उद्याच्या बैठकीकडे खरे तर समस्त शहरवासियांचे तसेच माध्यमकर्मींचे लक्ष् लागले होते.कारण मागच्या शुक्रवारच्या बैठकीत ऐन वेळेवर ३१ जुलै रोजी अगदी दूपारी १२ वाजताच पालकमंत्री नितीन राऊत यांनी विभागीय आयुक्तांच्या कक्षात सर्व प्रशासकीय अधिका-यांसाेबत बैठक ठेवली आणि मनपा आयुक्त तुकाराम मुंढे हे महापौरांच्या बैठकीला उपस्थित न राहता,पालकमंत्र्यांच्या बैठकीला निघून गेले होते आणि पदाधिका-यांच्या गोटात एकच गदारोळ झाला होता.

उद्याच्या बैठकीत मनपा आयुक्तांची उपस्थिती याकडे तर लक्ष् होतेच मात्र गेल्या बैठकीतील अनुपस्थितीच्या संदर्भात आयुक्त हे महापौरांना काय उत्तर देतात,याकडे देखील नागपूरकर जनतेचे लक्ष् लागले होते.

महापौरांनी फेसबूकवर टाकलेल्या पोस्टवर अनेकांनी त्यांच्या आरोग्यदायी स्वास्थाची कामना केली आहे.

Latest बातम्या