
डॉ.गंटावार पुन्हा होणार गांधीनगर रुग्णालयात रुजू!
डॉ.ममता खांडेकर
( Senior Journalist)
नागपूर,ता.५ ऑगस्ट: महानगरपालिकेचे बहूचर्चित,ख्यातनाम,गुन्हेगारी पार्श्वभूमीची चर्चा असणारे डॉ.प्रवीण गंटावार यांना आज मनपा आयुक्तांनी बोलावून एक अनाहूत सल्ला दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात डॉ.गंटावारला आयुक्त मुंढेंनी येत्या एक-दोन दिवसात गांधी नगर येथील मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात रुजू होण्याची सूचना केली असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे!
एवढेच नव्हे तर डॉ.गंटावार यांचे खासमखास सहकारी लिपिक सेलतूरकर यांना देखील सोबतीला घेऊन जाण्याचा सल्ला दिला! आयुक्तांच्या कक्ष्ात आज सेलतूरकर यांना बोलावून तशी सूचना मुंढे यांनी दिल्याची खात्रीलायक माहिती सूत्राने दिली.सेलतूरकर हे डॉ.गंटावारांच्या प्रत्येक ‘कृ’कृत्यामधील बरोबरीचे भागीदार असल्याची चर्चा मनपाचे कर्मचारी दबक्या आवाजात करतात.
गांधी नगरच्या इंदिरा गांधी रुग्णालयात जाण्याचा अनाहून सल्ला देताना आयुक्त मुंढे गंटावारला म्हणाले की ’ तू तिथे जा, इथे सर्वांचे लक्ष् तुझ्यावर असते, तू तिथे गेलास की…लोकं आपोआप शांत होतील!
मनपाच्या ज्या सर्वसाधारण सभेत भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी डॉ.गंटावार हे इंदिरा गांधी रुग्णालयाच्या प्रमुख पदावर असताना त्यांनी त्या रुग्णालयात कश्याप्रकारे ’कूंटणखाना’चालवला,दररोज नवनवीन मुलींना घेऊन ते रुग्णालयातील त्या स्टोर जवळील त्या बेड,फ्रिज व कूलर असणा-या लहानश्या ‘खोलीत‘ रंगरेलिया साजरी करत होते,याचे चांगलेच चर्वितचवर्ण सभागृहात तब्बल साढे सहा तास बोलताना केले असताना,‘प्रामाणिक,शिस्तप्रिय व कर्तव्यकठोर तुकाराम मुंढे’हे पुन्हा त्याच गंटावार यांना वाचविण्यासाठी आता अश्या प्रकारे सरसावले आहेत?याची चर्चा आज मनपात रंगली होती.
महत्वाचे म्हणजे गंटावार यांच्या विरोधात मुंढे यांना नुकत्याच आणखी दोन अतिशय गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळेच मुंढे यांनी डॉ.गंटावार यांना मनपा मुख्यालयातून हलवण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. गंटावार यांना अश्याप्रकारे सातत्याने आयुक्तांनी पाठीशी घालण्यावर आधी देखील सत्ताधा-यांनी मुंढेंवर संशयाची सुई रोखली असताना,आज पुन्हा मुंढे यांनी गंटावार यांना दिलेला अनाहूत सल्ला, पाठीश घालणे,एवढेच नव्हे तर गंटावार यांचे खासमखास सेलतूरकर यांची देखील ’पाठवणी’गंटावार यांच्यासोबत करणे,यामुळे मनपामध्ये पराकोटीची कुजबुज सुरु झाली आहे.
उत्पन्नापेक्ष्ा अधिक संपत्ती गोळा केल्याच्या प्रकरणी डॉ.गंटावार तसेच त्यांच्या पत्नी डॉ.शीलू गंटावार यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्या विरोधात एफआयआर रद्द करण्याची मागणी देखील नुकतीच हायकोर्टाने फेटाळली आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाने गेल्या २८ जुलै रोजी गंटावार दाम्पत्याला तात्पुरता अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे. त्यावर १७ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
विषेश म्हणजे सभागृहात महापौर संदीप जोशी यांनी तात्काळ प्रभावाने डॉ.गंटावार दाम्पत्याला निलंबित करण्याचे आदेश दिले होते तसेच डॉ.शीलु गंटावार यांचा इंदिरा गांधी रुग्णालयातील हजेरी पुस्तिका ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते, त्यांच्या या आदेशाला स्थगित करण्याचे पत्र मुंढे यांनी राज्य शासनाकडे पाठवले असून,इंदिरा गांधी रुग्णालयातून २०१३ पासूनची हजेरी पुस्तिकाच गायब असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
डॉ. गंटावार व आयुक्त मुंढे यांच्या सलोख्याच्या संबंधा विषयी बरीच चर्चा मनपात रंगत असली तरी,आज मुंढेंनी जो अनाहूत सल्ला गंटावार यांना दिला त्यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अनेक खासगी रुग्णालयाकडून कोविड काळात कारवाई नं करण्यासाठी ज्या गंटावार यांनी लाच घेतल्याचे आरोप होत आहेत,त्याच सर्वस्वी भ्रष्ट आरोग्य अधिकाऱ्याला मुंढे हे किती खालच्या स्तरावर राजकारण खेळून वाचवीत असल्याचा संताप देखील आज अनेक मनपा कर्मचारी खासगीत व्यक्त करीत होते!

आमचे चॅनल subscribe करा