Homeनागपूर न्यूजमुंढे यांचा बाजारात आकस्मिक दाैरा:बेशिस्त दूकानदारांवर केली करवाई

मुंढे यांचा बाजारात आकस्मिक दाैरा:बेशिस्त दूकानदारांवर केली करवाई

फूटाळाकडेही देतील का लक्ष्?

नागपूर,ता. २८ जुलै: मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज अकस्मात शहरातील काही बाजारांचा दौरा केला,यावेळी त्यांना नेहमीसारखाच दूकानदारांचा बेशिस्त कारभार दिसून पडला.यावेळी त्यांनी संपूर्ण फूटपाथच अतिक्रमित करुन बसलेल्या बेशस्ति दूकानदारांवर कारवाईचे आदेश अधिका-यांना दिले.

अतिक्रमणित फूटपाथ ही तशीही नागपूर शहराची एक ज्वलंत समस्या आहे. या शहरात सामान्य नागरिकांना चालायला किती साेयीस्कर फूटपाथ आहेत?यावर एक स्वतंत्र संशोधन होऊ शकतं आणि शेवटचा निष्कर्ष हा ’शून्य’निघू शकतो,अशी चर्चा पायी चालणा-या नागरिकांमध्ये नेहमीच रंगते.करोनाच्या निमित्ताने का होईना आयुक्त तुकाराम मुंढे हे बाजारात फेरफटका मारत आहेत,परिणामी काही बेशिस्त,काही बेमुरव्वत तर काही भांडखोर दूकानदारांना चांगली चपराक बसेल,असे म्हटले जात आहे.

‘भटाला दिली ओसरी आणि भट हाय-पाय पसरी’अशी एक मराठीतील म्हण आहे. शहरातील समस्त दूकानदारांवर ही म्हण चपखळ बसते. केवळ फूटपाथ ’गिळंकृत’करुनही अनेक दूकानदारांचे समाधान होत नाही तर ते समोरच्या मुख्य रस्त्यांच्याही काही भाग गिळंकृत करुन आपले सामान त्यावर पसरवून ठेवतात! शहरातील सामान्य नागरिकांना अश्‍या दूकानदारांचा कायम मनस्ताप सहन करावा लागतो. आयुक्त मुंढे यांच्या धडक पाहणी दौ-यानंतर आणि कारवाईनंतरही हे दूकानदार सुधरतील का?यात शंका आहे.

आयुक्तांच्या पाहणीनंतर केविलवाणे चेहरे करुन आपल्या बेकायदेशीर कृतीचे तकलादू समर्थन करताना या दूकानदारांचे व्हिडीयोमधील चेहरे लक्ष् वेधून घेत आहे.शहराला शिस्त ही लागायलाच हवी. मात्र त्यासाठी कायद्याचा दंडूकाच लागतो,असेच म्हणावे लागेल.

फूटाळ्यावरही आयुक्तांनी फेरफटका मारावा-
दोन दिवसांच्या लॉक डाऊन नंतर तरुणाचे आवडते ठिकाण असणारे फूटाळा तलावावर आज अनेक तरुणाईने कट्टा जमवला. देशाच्या ’उज्जवल’भविष्याची झलक या ठिकाणी पाहावयास मिळते.यात सुशिक्ष्ति विद्यार्थी वर्ग कुठेच कमी पडत नाही. हातात मोबाईल आणि मास्क फूटपाथवर!याने करोनापासून निश्‍चितच त्यांचे रक्ष् ण होणार असल्याचा ’अतिआत्मविश्‍वास’आज ’सत्ताधीश’ला बघायला मिळाला.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी असाच आकस्मिक दौरा या ठिकाणी देखील काढावा,जेणेकरुन ज्यांच्यावर करोनाविषयीचे निर्देश पालनाची सर्वात जास्त जवाबदारी आहे तीच तरुणाई फूटाळाच्या सानिध्यात किती,कशी ’स्वैर’वागते,हे त्यांच्या निदर्शनास येईल.अश्‍या बेशिस्त तरुणाईला देखील आयुक्तांनी ’ऑन द स्पॉट’ दंड ठोठवावा,जेणेकरुन त्यांनाही त्यांच्या गैरकृत्यांची जाणीव होईल.

या ठिकाणी चहाच्या ठेल्यांवरच खुलेआम सिगारेट विकल्या जाते. सकाळी-सकाळी फिरायला येणा-या तरुणाईची येथे अशीच बेशिस्त वर्दळ असते. ज्येष्ठ नागरिकांना मात्र तरुणाईच्या अश्‍या स्वैर वागण्याचा खूप त्रास होतो. अनेकदा ज्येष्ठ नागरिक या तरुणाईला समज देताना आढळतात,यातून तरुणाई आणि ज्येष्ठांमध्ये वाद देखील घडले आहेत.

(फूटाळा-छायाचित्रे ‘सत्ताधीश’फोटो जर्नलिस्ट बोनी)

मूर्तीकारांवर ठोठावला दंड-

शहरातील सी.ए.रोड, गोळीबार चौक, मस्कासाथ, इतवारी, मच्छीबाजार आदी भागांमध्ये ) मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आकस्मिक भेट दिली आणि नियमांचे उल्लंघन करणा-यांची चांगलीच धांदल उडाली. फुटपाथवर सामान ठेवणारे दुकान, दुकानातील गर्दी अशा सर्वांसह चितारओळीतील मूर्तीकारांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली.

प्रारंभी आयुक्तांनी सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील फुटपाथवर सामान ठेवणा-या दुकानांचा चांगलाच समाचार घेतला व नियमांचे उल्लंघन करणा-या प्रत्येक दुकानदाराकडून १० हजारांचा दंड वसूल केला. त्यानंतर गोळीबार चौकातील जागन्नाथ बुधवारी भागात अनेक किराणा दुकानांमध्येही तिच स्थिती दिसून आली. त्यांच्यावरही १० हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. पुढे मस्कासाथ बंगाली पंजा, इतवारी भागात काही किराणा दुकानांनी फुटपाथवर अतिक्रमण करून सामान ठेवले होते तर काहींनी फुटपाथवरच दुकान मांडले होते. अशा दुकानदारांनाही यापुढे अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन केल्यास सामान जप्त करण्याचा इशारा देत त्यांच्याकडून पाच व १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

पुढे चितारओळीत मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्त्या रस्त्यावर ठेवल्याचे दिसून आले. या ठिकाणी आयुक्तांनी मूर्तीकारांना नियमांचे उल्लंघन न करण्याचे आवाहन केले. रस्त्यावर मूर्ती ठेवल्याने अतिक्रमणाच्या कारवाई अंतर्गत सर्व मूर्तीकारांकडूनही दंड वसूल करण्यात आला.

फुटपाथवरील लाखो रुपयांचे साहित्य जप्त-
मच्छीबाजार जुने मोटार स्टँड भागात हार्डवेअर विक्रेत्यांनी संपूर्ण साहित्य फुटपाथवर ठेवले होते. सदर प्रकाराची गांभीर्याने दखल घेत मनपा आयुक्तांनी अतिक्रमण विभागाच्या पथकाला बोलवून संपूर्ण साहित्य जप्त केले. या भागातील दोन हार्डवेअर दुकानांचे बरेच सामान फुटपाथवर ठेवले होते. या सामानांची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे. पाईप, लोखंडी साहित्य, ट्रक व बुलडोजरचे टायर, लोखंडी पत्रे आदी साहित्यांवर जप्तीची कारवाई करून अतिक्रमण विरोधी पथकाच्या ट्रकमध्ये टाकण्यात आले. याच भागात चप्पल आणि बुट विक्री करणा-याने थेट फुटपाथवरच दुकान मांडले होते. सुरूवातीला दंड भरण्यास टाळाटाळ करणा-या या दुकान मालकाने साहित्य जप्त होताना पाहून दंड भरला. दंड भरल्याने जप्तीची कारवाई टळली असली तरी यापुढे फुटपाथवर दुकान न लावण्याची सक्त ताकीदही आयुक्तांनी दिली.

-तर २५ हजार रुपये दंड
शहरात नियमांचे उल्लंघन करणारे आणि अतिक्रमण करणा-यांवर कारवाई करीत सद्या पाच व १० हजार रुपये दंड वसूल करण्यात येतो. शहरातील नागरिकांसह दुकाने, आस्थापनांना शिस्त लागावी. नियमांचे पालन व्हावे व रस्ते, फुटपाथ मोकळे राहावेत या उद्देशाने ही कारवाई केली जाते. मात्र दंड भरूनही काही नागरिक नियमांचे उल्लंघन करणे सोडत नाही. यापुढे नागरिकांकडून नियमांचे पालन न झाल्यास पुढे २५ हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येईल, असा इशाराही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यावेळी दिला.

(व्हिडीयोमध्ये ऑडीयो अवाज नाही)

Latest बातम्या