Homeनागपूर न्यूजमुंढें का कैसा व्यवहार..हर महिला पे अत्याचार

मुंढें का कैसा व्यवहार..हर महिला पे अत्याचार


नागपूर महानगरपालिकेत मुंढेविरुद्ध नगरसेविकांचे मूक आंदोलन

नागपूर,ता. ८ जुलै: स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सचिव भानुप्रिया ठाकूर यांच्यासोबत दुर्व्यव्हार प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी मनपा आयुक्त यांना नोटीस बजावल्याच्या पार्श्वभूमीवर मनपाच्या नगरसेविकांनी देखील आज बुधवार दि. ८ जुलै राेजी आयुक्त तुकराम मुंढे यांच्याविरोधात मनपा मुख्यालयात मूक आंदोलन केले.

उपमहापौर मनीषा कोठे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात भानुप्रिया ठाकूर यांना मुंढे यांनी जी अवमानकारक वागणूक दिली त्याबद्दल ठाकूर यांची मुंढे यांनी जाहीर माफी मागावी,अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्या मातृत्व रजेचा पगार मुंढे यांनी कापला,तो त्यांना सन्मानजनकरित्या परत करावा,असे मनीषा कोठे यांनी सांगितले. महिलांप्रति मुंढे यांचा असंवेदनशील व्यव्हार या विरोधात हे मूक आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भानुप्रिया या आपल्या अडीच महिन्याच्या बाळासह आयुक्तांच्या कक्ष्ासमोर तीन तास बसल्या होत्या. मुंढे यांनी तीन तासांनंतर त्यांना भेटण्याची वेळ दिली यानंतर त्यांना ‘मला तुमच्याशी काहीच बोलायचे नाही’असे सांगितले. मुंढे यांचा हा अमानवीय व्यवहार हा केवळ भानुप्रिया नव्हे तर संपूर्ण महिला वर्गाचा अपमान असल्याचे कोठे यांनी सांगितले.

महिलांप्रति असंवेदनशीलता हा मुंढे यांचा फार प्राचिन गुण असल्याचे टिका कोठे यांनी केली. जिल्हा परिषदेत असताना २००९ साली देखील मुंढे यांच्या विरोधात तेथील एका महीला अधिकारीने पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असल्याचे त्या म्हणाल्या. केंद्र सरकारनेच नव्हे तर या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने देखील देशातील महिलांना सहा महिन्यांची हक्काची मातृत्व रजा प्रदान केली आहे,मात्र मंुढे यांनी भानुप्रिया यांच्याकडून मातृत्व रजेचा लाभ घेणार नाही,असे लिहून घेतले. भानुप्रिया यांचा अपमान हा समस्त महिला वर्गाचा अपमान असल्याचे कोठे यांनी सांगितले.

मुंढे यांनी एका महिला वैद्यकीय अधिकारी यांना ‘मनपात येणे म्हणजे रॅम्पवर चालणे नव्हे,एवढे नटून का येता?’अश्‍या शब्दांचा वापर केला होता. त्यांनी महिलांचा अपमान करण्याची भूमिकाच स्वीकारली असल्याचे त्या म्हणाल्या.मुंढे यांच्या या महिला विरोधी धोरणांच्या अाणि विचारांच्या विरोधात आज मनपातील समस्त महिला नगरसेविकांनी काळी साडी नेसून निषेध नोंदवला आहे. आम्ही कोणतीही नारेबाजी केली नाही,भाषणबाजी केली नाही. फक्त निषेधाचे फलक झळकावले,अशी माहिती मनीषा कोठे यांनी दिली.

मनपा मुख्यालयात ‘न भूतो न भविष्यती’पोलीस बंदोबस्त!

मनपा मुख्यालयात काल देखील शहरातील काही महीला या मुंढे यांच्या विरोधात आंदोलनासाठी धडकल्या मात्र प्रचंड पोलीस बंदोबस्तामुळे त्यांना मुख्यालयात आत येताच आले नाही.पोलीसांनी त्यांना चक्क मुख्यालयाच्या फाटका बाहेरच अडवून ठेवले. आज देखील नगरसेविकांच्या मूक आंदोलनादरम्यान पोलीसांचा प्रचंड ताफा हजर होता. सीआरपी,एसआरपीच नव्हे तर खुफिया विभागातील पोलीस ही मुंढे यांनी बोलावले असल्याची चर्चा आज मनपात चांगलीच रंगली होती. मुंढे यांना राष्ट्रीय महिला आयोगाने भानुप्रिया यांच्या प्रकरणावर सात दिवसात उत्तर मागवले असल्याने यावर आयुक्त आता काय उत्तर सादर करतात,याकडे शहरातील महिला वर्गाचे लक्ष् लागले आहे.

Latest बातम्या