Homeनागपूर न्यूजमोमिनपुरा सील; पोलिसांची घेराबंदी

मोमिनपुरा सील; पोलिसांची घेराबंदी

दिवस-रात्रपाळीतील १५० कर्मचारी; एसआरपीएफसह दंगल नियंत्रण पथकाचीही मदत

नागपूर: करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका लक्षात घेता मध्य नागपुरातील मोमिनपुरा ‘सील’ करण्यात आला. याठिकाणी सशस्त्र पोलिस बंदोबसत तैनात करण्यात आला असून, पोलिसांची गस्तही वाढविण्यात आली आहे. या भागातील गल्ली-बोळाही कठडे लावून बंद करण्यात आल्या.

मोमिनपुरानजीकच्या तकिया भागातील एक युवक १५ मार्चला दिल्लीहून नागपुरात परतला. तो करोनाबाधित असल्याचे आढळून आल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पोलिस यंत्रणा व महापालिका खळबळून जागी झाली. त्यानंतर शनिवारी रात्री मोमिनपुरा सील करण्याचे निर्देश देण्यात आले. पोलिसांनी संपूर्ण मोमिनपुऱ्याला वेढा घातला. मोमिनपुरा चौक ते टिमकी तीनखंबा चौक व भगवाघर चौक ते नाल साहब चौकाला चहूबाजूंनी सील करण्यात आले. याशिवाय, या परिसरातील चौक व गल्ल्याबोळाही कठडे, बांबू लावून बंद करण्यात आले. येथे सशस्त्र पोलिस तैनात करण्यात आले आहेत. मोमिनपुरा परिसरात दिवस व रात्रपाळीला प्रत्येकी १५० पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात असतील. त्यांच्या मदतीला राज्य राखीव पोलिस दल व दंगल नियंत्रण पथकही तैनात असेल. परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त राहुल माकणीकर यांनी परिमंडळातील सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांसह मोमिनपुरा व टेका नाका परिसरात रविवारी रुटमार्च केला. नागरिकांनी विनाकारण बाहेर निघू नये, स्वत:ची काळजी घ्यावी, सामाजिक अंतर ठेवावे, असे आवाहनही पोलिसांकडून यावेळी करण्यात आले.

पोलिस उपायुक्त विनिता साहू यांनीही सीताबर्डी व सिव्हिल लाइन्स भागात रविवारी रुटमार्च केला. यादरम्यान पावसाच्या धारा बरसल्या. भर पावसात साहू यांच्या नेतृत्वात पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून नागरिकांमध्ये जनजागृती केली. साहू यांच्यामुळे पोलिसांचा आत्मविश्वास उंचावल्याच्या प्रतिक्रिया यावेळी उमटल्या.

खामल्यातही वाढली गस्त

खामल्यातही एकच कुटुंब करोना संशयित आढळल्याने खळबळ उडाली. करोनाची लागण होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून खामला, गोपालनगर व जवळपासच्या परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. खामला भागातील नागरिकांना वारंवार घराबाहेर न निघण्याच्या सूचना करण्यात येत आहेत. पोलिस उपायुक्त विवेक मसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतापनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे यांच्या नेतृत्वात रविवारी या भागात रुटमार्च करण्यात आला. या भागातील प्रत्येक हालचालींवर प्रतापनगर पोलिसांची करडी नजर आहे.

Latest बातम्या