
मुंबई: शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आज रात्री अँजिओग्राफी करण्यात आली असून अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. हृदयरोग तज्ज्ञ अजित मेनन हे त्यांच्यावर एंजिओग्राफी करणार आहेत.
संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉक आढळले आहेत. त्यामुळे ही शस्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांनी दिली.
राऊत यांची स्ट्रेस टेस्ट केल्यानंतर काही वेगळ्या रिडिंग्ज आल्यामुळे त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. राऊत यांच्यावर आवश्यक ते उपचार केले जाणार असून फार काळजी करण्यासाठी असे काही नाही अशी माहिती सुनील राऊत यांनी दिली. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात निर्माण झालेला पेच, आणि भाजप-शिवसेनेदरम्यान निर्माण झालेला तणाव यात संजय राऊत अथकपणे कार्यरत होते. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर मोठा ताण होता.
राज्यात सत्तेचा पेच निर्माण झाल्यापासून राऊत सतत पत्रकारांशी बोलत होते. सर्व आघाड्यांवर कार्यरत राहत राऊत यांनी शिवसेनेचे बाजू जोरकसपणे मांडण्याचे काम केले. या ताणतणावाच्या परिस्थितीचा मोठा ताण संजय राऊत यांच्यावर होता. गेल्या काही दिवसांपासून राऊत यांना त्रास जाणवत होता. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तज्ज्ञ अजित मेनन यांनी उपचार केले आहेत. मात्र, आज पुन्हा आज त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.दरम्यान, संजय राऊत यांच्यावरील जबाबदारी अनिल परब, अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांना विभागून देण्यात येईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. परब, देसाई आणि नार्वेकर हे सध्या काँग्रेस पक्षाशी बोलणी करण्यासाठी दिल्लीत गेले आहेत.

आमचे चॅनल subscribe करा