

70 टक्के स्लिप वाटल्याचा दावा
नागपूर,ता. 16 : मागील निवडणुकीत व्होटर स्लिपचा चांगलाच घोळ झाला होता. त्यामुळे यंदा मतदानाच्या काही दिवस आधीच व्होटर स्लिप मतदारांना देण्याचा मानस असून, आतापर्यंत 70 टक्के मतदारांना व्होटर स्लिप वाटप केल्याचा दावा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केला.
केंद्राची माहिती मिळत नसल्याने मतदार मतच करीत नाही. त्यामुळे मतदान केंद्राची माहिती देण्यासाठी प्रत्येक मतदाराला व्होटर स्लिप देण्याच्या सूचना निवडणूक आयोगाच्या आहेत. मतदारांना घरपोच व्होटर स्लिप देण्याची जबाबदारी बीएलओंडे असते. मात्र, या बीएलओंकडून याचे वाटप होत नसल्याचा अनुभव आहे. मागील लोकसभा निवडणुकीतही व्होटर स्लिपचे वाटप करण्यात आले नव्हते. मतदानाच्या दिवशी हे व्होटर स्लिप केंद्रावर ठेवण्यात आले होते. विविध राजकीय पक्षांकडून व्होटर स्लिपचे वाटप होते. लोकसभा राजकीय पक्षांकडूनही याचे वाटप झाले नव्हते. काही उमेदवारांनी तो वाटण्याचा प्रयत्न केला.
परंतु, उमेदवारांच्या लोकांकडे असलेल्या व्होटर स्लिपवरील पत्ता मिळत नसल्याने त्यांनाही ते वाटता आले नाही. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी पतीचे नाव एका केंद्रावर तर पत्नीचे नाव दुसऱ्याच केंद्रावर असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. याचा परिणाम मतदानावर झाला. मतदानाची टक्केवारी घटली. या विधानसभा निवडणुकीत या घोळ होता कामा नये म्हणून जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याकडून प्रयत्न होत आहे. 18 तारखेच्या आत सर्व मतदारांकडे व्होटर स्लिप घरपोच मिळणार असून आतापर्यंत 70 टक्के मतदारांना ते वाटप करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.
सर्व मतदारांना घरपोच व्होटर स्लिप मिळेल. दोन दिवसात शंभर टक्के वाटप होईल. यावरही कुणाला मिळाली नाही तर 1950 क्रमांकावर तक्रार करावी.




आमचे चॅनल subscribe करा
