Homeblogदिवाळीचे....राजकीय फटाके

दिवाळीचे….राजकीय फटाके

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
(रविवार विशेष)

डॉ.ममता खांडेकर
(मुख्य संपादक’सत्ताधीश’)
नागपूर,ता.२२ नोव्हेंबर २०२६: हिन्दू धर्मातील सर्वाधिक उत्साही सण म्हणजे ’दिन दिन दिवाळी’.नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीलाच हा सण देशभरात उत्साहात साजरा झाला असला तरी,सध्या तुळशी विवाह तसेच दिवाळीचाच मूळ उत्साह अद्याप संपला नसल्याने अधून-मधून फटाके फूटण्याचे आवाज ऐकू येतच आहेत.त्यात समाज माध्यमांवरील राजकीय फटक्यांना तर अंतच नसतो.दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत सध्या या विशेष राजकीय फटाक्यांचा आवाज चांगलाच गाजतोय.
नुकतेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे रुग्णालयातून पुन्हा एकदा सुखरुप परत घरी आले आणि नेहमीप्रमाणे कार्याला भिडले.यानंतर बारामती घडविण्यासाठी त्यांनी केलेले दूरदृष्टिचे प्रयत्न यावर देखील ‘फूलझड्या’झडल्या.बारामतीतील प्रत्येक कुटूंबात एकाला नोकरी देण्याची किमया इतक्या वर्षातील आपल्या राजकीय कारकार्दीत त्यांनी साधली असून, लाखो कुटूंबियांचे शुभाआर्शिवाद त्यांना दरवेळी रुग्णालयातून सुखरुप घरी परत आणतात,यावर ठामपणे मते व्यक्त झाली.त्यासोबतच नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्या अगदी तिस-या टर्मपर्यंतच्या खासदार कार्यपद्धतीचीही नकळत तुलना त्या आभासी जगतात उमटली.
गडकरी यांना कार्यकर्त्यांसाठी खूप काही करता आलं असतं मात्र,तसे घडले नाही.धर्मादाय रुग्णालय काढून काही प्रमाणात समाजसेवेचे व्रत साधता येतं मात्र,ज्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर ते तीन टर्मचे खासदार झालेत त्यांच्या भविष्याच्या तरतूदीसाठी गडकरींना शरद पवारांसारखे कार्य साधता आले नसल्याचा भला मोठा ‘सुतळी बॉम्ब’ कुठेतरी फूटलाच….!कार्यकर्त्यांसाठी केलेल्या कामाच्या भरवश्‍यावर आज ही, इतक्या विपरित राजकीय परिस्थितीतही व या वयातही, शरद पवार हे पश्‍चिम महाराष्ट्रात ३५ ते ४० जागा जिंकत आहेत,अजित पवार सोबत होते त्यावेळी हीच ताकद ५८ ते ६० जागांच्या घरात होती.यातंच शरद पवार हे नाव सार्थक होतं.बारामतीत शरद पवारांनी तरुणांसाठी केंद्रीय लोकसेवाआयोग,राज्य लोकसेवा आयोगोच्या परिक्षांच्या नि:शुल्क मार्गदर्शन केंद्रांपासून तर विद्यापीठांचे फार मोठे जाळे बारामतीत विणले आहे.बारामतीचा विकास हा शरद पवारांच्या दूरदृष्टितून साधलेला विकास गणल्या जातो,नागपूरात तसे काहीच साध्य झाले नाही उलट,आहे तेच विकासाच्या नावावर, बर्बादीच्या मार्गावर धावत असताना दिसून पडत असल्याची ’भुईचक्री’ही चांगलीच फिरली….!
नुकतेच नागपूर जिल्ह्याच्या पदवीधराची निवडणूक आटोपली.राज्याचे मुख्यमंत्री यांनी स्वत: नागपूरात अनेक बूथवर मतदानाच्या दिवशी हजेरी लावली.त्या आधी कोराडीच्या नैवेद्यममध्ये मंत्री,आमदार.नेते व पदाधिका-यांची बैठक घेऊन सर्वांना, ही निवडणूक गांर्भीयाने घेण्याचा सज्जड दम देखील दिला व तडक भाजपचे बंडखोर उमेदवार अनिल सोले यांच्या निवासस्थानी पोहोचले.साक्षात मुख्यमंत्री घरी आल्याने सोले गहीवरले व माझे नाव जरी मतपत्रिकेत असले तरी मला मत देऊ नका,असे भावनिक आवाहन केले. यानंतर,२८ ऑक्टोबर रोजी मतपेटीतून जो निकाल बाहेर आला तो किमान मुख्यमंत्र्यांसाठी तरी ‘सुखावह’होता,असा एक ‘सुखोई बॉम्ब’देखील नागपूरातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये फूटला.फडणवीसांनी या निवडणूकीतून नेमके काय साधले?यावर दिवाळीच्या फराळासारखी खमंग चर्चा रंगली.
सोले आणि सुधाकर कोहळे हे दोन्ही माजी भाजप आमदार हे गडकरी यांच्या गोटातील मानल्या जातात. हूशार फडणवीस या निवडणूकीत ‘आपला ’उमेदवार देण्याच्या भानगडीत पडले नाहीत.महसूल मंत्री बावणकुळेंनी ही निवडणूक अंगावर घेतली,व कोहळे यांच्यासाठी दिल्लीतून तिकीट मागून घेतल्याचा ‘फटाका मसाला ’ तयार झाला.ओबीसी चेहरा असलेले बावणकुळेंची महाराष्ट्रातील ‘नेक्सट मुख्यमंत्री’ बनणण्यची महत्वाकांक्षा लपलेली नाही. त्यात केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे क्रमांक दोनचे नेते अमित शहांशी त्यांची अलीकडेच वाढलेली जवळीकही नवी नाही.ग्रामीण भागात डॉ.राजीव पोतदारांना ‘परस्पर’आमदाराची तिकीट मागून बावणकुळेंनी आपला राजकीय बारुद व्यवस्थित भरला.कोहळे यांच्या विजयानंतर निश्‍चितच त्यांचे राजकीय बळ ग्रामीण सोबतच शहरी भागात ही आणखी वाढले असते.
मात्र,जोरदार धमाका झालेल्या नागपूर पदवीधर निकालातून दिल्लीला एक साथ अनेक संदेश गेले.बावणकुळेंनी मागितलेली उमेदवारी तेच जिंकून आणू शकत नाहीत,त्यांचा उमेदवार पडतो हा योग्य संदेश दिल्लीत पोहोचला व २०२९ ची तजवीज भरुन निघाली,दूसरीकडे गडकरी यांच्याच गटातील दोन्ही उमेदवारांमध्येच रस्सीखेच सुरु असताना फडणवीसांनी ‘आपला माणूस’पदवीधरच्या ‘दिवाळी मिलनात’न उतरवता,८ ऑक्टोबर पर्यंत फडणवीसांनी सोले यांनी निवडणूकीतून माघार घेण्यासाठी प्रयत्नच केला नाही.हा आस्वादी फराळाचा किस्साही अनेकांच्या जीभेवर अद्याप रेंगाळत आहे.
८ ऑक्टोबर हा निवडणूक अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता.या दरम्यान फडणवीसांनी सोले यांच्या सभा होऊ दिल्या,प्रचार करु दिला.या सर्व घडामोडीत गडकरी गटातील कोणकोण त्यांच्या बाजूने गेले हे नेमके हेरले,त्यांना एक्सपोज होऊ दिलं व २३ ऑक्टोबर रोजी मतदान असताना,१९ ऑक्टोबर रोजी ते कोराडीतील बैठक संपवून तडक नागपूरात सोले यांच्या घरी पोहोचले!पुढची रंगबिरंगी ‘आतिषबाजी’ नागपूर जिल्ह्सह संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे.
मूळात बावणकुळेंनी रेटलेल्या काेहळे यांच्या नावाला संघ शताब्दी वर्षात संघाचाच विरोध होता,असा ‘लक्ष्मी बॉम्ब’देखील फूटला.गडकरी पदवीधरची निवडणूक लढवित होते त्यावेळी चाळीस ते पंचेचाळीस हजार ब्राम्हण मते नोंदणीकृत होती.सोले यांच्या वेळी ती तीस ते पसतीस हजारांवर आली.संदीप जोशी पदवीधर लढले तेव्हा यात आणखी घट झाली तर सुधाकर कोहळे यांच्या वेळी फक्त सात ते आठ हजार ही ब्राम्हण मते होती.कोहळे हे शहर अध्यक्ष होते यानंतर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष झाले मात्र,निवडणूक जिंकण्यासाठी ‘सबका साथ सबका विकास सबका विश्‍वास’हे सूत्रच विसरले त्यामुळे त्यांची ही दिवाळी ‘प्रदूषित’ झाल्याचा शोक ऐन उत्साहाच्या पर्वात व्यक्त होत आहे.
त्यात भरीस भर म्हणजे भाजपसारख्या शिस्तबद्ध समजल्या जाणा-या राजकीय पक्षाच्या नागपूर शहराच्या कोअर कमेटीमध्ये गेल्या २५ वर्षांपासून तेच-तेच चेहरे असून, भाजपलाच मूळात बदल हवा नसल्याने पदवीधर निवडणूकीतून भाजपच्या वाट्याला दिवाळीच्या रसरशित फराळा ऐवजी नुसता फटाक्यांचा ‘धूर’येणे क्रमप्राप्त होते,असा जळजळीत अग्निबाणही भाजपच्या काही पदाधिकारी,कार्यकर्त्यांच्या तोंडून सुटला.याशिवाय नागपूर पदवीधरच्या निवडणूकीत ऐन मतदानाच्या दिवशी रस्त्यावर उतरुन फडणवीस यांनी दिल्लीश्‍वरांनाही,बघा मी किती मेहनत घेतली,असा खसखसीत,महागड्या खसखसीने भरलेला अनारशा ही खाऊ घातला!सोले आणि काेहळे ही दोन्ही नावे नागपूरच्या राजकारणात गडकरी यांनीच आणली होती.पदवीधरच्या उत्सवी खेळातून ही दोन्ही नावे आपसूक संपली.गिरीश व्यास,राजेश बागडींचीही कृती दिवाळीच्या झगमगाटात दृष्यमान होऊन अदृष्यमान झाली….!फडणवीसांनी एकाच रॉकेटने अनेक निशान साधले.
पदवीधरमध्ये पक्षाकडून दीड लाख मतदारांची नोंदणी झाल्याच्या ’टिकल्यांची सुरळी’वारंवार फूटत होती मात्र,भाजपच्या उमेदवाराला ६१ हजारच मते मिळाली,त्यात ९ हजार मते बाद झाली मग भाजपकडून नोंद झालेली  उर्वरित मते गेली कुठे?किमान ३८ हजार मतांचा हिशेब घेण्यासाठीही सराईत भाजप शहर कोअर कमेटी धजावली नाही.ही ३८ हजार मते भाजपकडून दूरावली का?की नोंदवलीच गेली नाही!कार्यकर्त्यांनी अश्‍या ही ‘फूलझड्या‘सोडल्या की आम्ही भरलेले

मतदारांचे गठ्ठे नेमके गेले कुठे?स्वत: मुख्यमंत्री यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांचेही नाव पदवीधर मतदार यादीत नव्हते!हे गठ्ठे मतदार यादीत नोंदणी पर्यंत पोहोचले नाहीत की…पोहोचवले गेले नाहीत!याचा ’नागोळी’फटाका अद्याप जमिनीवर गोलगोलच फिरत आहे.
अश्‍या या भाजप नावाच्या दिल्लीपासून गल्लीपर्यंत बलाढ्य असलेल्या सत्ताधारी पक्षालाच नागपूरात ५ नोव्हेंबर रोजी ’लोकशाही वाचवा..अराजकता हटवा’नावाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आक्रमक मोर्चा काढावा लागला.असं म्हणतात ‘राजा तोपर्यंतच सुरक्षीत असतो जोपर्यंत त्याचे सैन्य गलितगात्र होत नाही….!’अमित शहा हे देशाचे पुढील पंतप्रधान म्हणून पक्षात चर्चिले जात आहेत.अशी ईच्छा बाळगणे किंवा महत्वाकांक्षा ठेवणे यात ही काही गैर नाही मात्र,यासाठी प.बंगालमधून तृणमृल काँग्रेसचे चक्क २० खासदार तर महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव ठाकरेंचे ८ खासदार फोडणे हे जगातील कोणत्याही अग्निबाण रॉकेटपेक्षा कमी अहितकारत नाही.भाजपमध्ये आतापासूनच ही चर्चा सुरु झाली आहे,पुढचा पंतप्रधान कोण?याचा अर्थ मोदींवर दिवाळीच्या कार्तिकी अमावस्येची छाया पडली असल्याचे भाजपनेच मान्य केले आहे.
उत्तरप्रदेशचे योगी आदित्यनाथ पंतप्रधान पदाचे तगडे दावेदार मानले जात असतानाच एसआयआरमार्फत उत्तरप्रदेशात चक्क दोन कोटी हिंदूचीच मते गहाळ झाली आहेत!दूसरीकडे मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदारांची संख्या भरघोस वाढली असून पुढील वर्षी म्हणजे २०२७ मध्ये समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव हे मुख्यमंत्री पदी असणार आहे,असा दावाच इतर कोणी नाही तर उत्तरप्रदेशी भाजप कार्यकर्तेच छातीठोकपणे करीत आहेत.योगी यांना तिस-यांदा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री भाजपचे दिल्लीतील शीर्षस्थ नेते होऊ देणार नाही व  आपल्या पायावर धोंडा पाडून घेणार नाहीत…अमित शहा यांच्या कल्पनेतील ‘चायना मेड फटाका’कायमचा संपेल,असा कयास लावला जात आहे.शेवटी ‘राजकारणात कोणीही कोणाचा मित्र नसतो किंवा कायमचा शत्रूही नसतो’हेच खरे….!महाराष्ट्रात फडणवीसांच्या विरोधात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चुचकारण्याचे काम दिवाळीतील ‘नानखटाई’ मिठाईप्रमाणे अमित शहा उगाच नाही करीत आहेत.
‘गोकूळ’ची ‘घटनाबार्ह्य कृती’ फडणवीसांना शर्यतीत टिकायचं असल्यानेच घडली.तेच कर्जतच्या सह्याद्रीतील भीमाशंकरसोबतही घडतंय….!असे असून देखील २०२९ मध्ये देशात आणि महाराष्ट्रात भाजपच सत्तेवर येईल,इतके गोड ‘चिरोटे’भाजपवाल्यांच्या जीभेवर विरघळलेले दिसून पडतात.याचे एकमेव कारण भाजपला कितीही विरोध असला तरी विरोधक एकत्रित नाही….!६३ टक्के असून  देखील विरोधक भाजप विरोधात एकत्रित येत नाहीत.…त्यामुळेच सत्तेची करंजी,लाडू,शंकरपाळे,सांजो-या,चंपाकळी,लवंगलतिका,अनारसे आणि मखमल पुरीसारखी गोड चव विरोधकांना चाखता येणे दुरापस्त असून, यासाठी पुढील दिवाळीची किंबहूना निवडणूकीची वाट त्यांना पाहावी लागत राहणार आहे….!
……………………………………………
Advertisements

Latest बातम्या