Homeसांस्कृतिक / मनोरंजनमध्य नागपूरातील चार सुप्रसिद्ध गणेशांचे सामूहिक ‘महाविसर्जन’

मध्य नागपूरातील चार सुप्रसिद्ध गणेशांचे सामूहिक ‘महाविसर्जन’

Advertisements
Advertisements
नागपूरात चार गणेश मंडळांचा स्तुत्य पायंडा
नागपूरकरांची होणार वाहतूक काेंडी पासून सुटका

नागपूर,ता.२४ सप्टेंबर २०२६: महाल,हा मध्यवर्ती भाग मूळातच तूफान गर्दीचा,त्यात गणेशोत्सव काळात या भागात गर्दी नियंत्रणासाठी वाहतूक विभागाचाही चांगलाच कस लागतो,सर्वाधिक मानाचे गणपती व आकर्षक देखावे महाल भागातच असल्याने भाविकांची अतोनात गर्दी ही महालसाठी जणू पाचवीलाच पूजली आहे.अशात अनंत चतुर्दर्शीला गणपती विसर्जनाच्या दिवशी महाल,बडकस चौक,शिवाजी पुतळासारखा भाग एखाद्या मूंगीलाही शिरता येणार नाही,इतक्या दाटीवाटीचा होत असतो.यावर पहिल्यांदाच मध्य नागपूरातील एकूण चार मोठ्या गणेश मंडळांनी एकत्रित मिरवणूक व गणेश विसर्जनाचा निर्णय घेऊन नागपूरकर जनतेला फार मोठा दिलासा दिला आहे.
या सामूहिक महाविसर्जन सोहळ्यात महाल,सेंट्रल एव्हन्यू रोडवरील सुप्रसिद्ध श्री संती गणेशोत्सव मंडळ,श्री दक्षिणामूर्ती स्वयंसेवक मंडळ,श्री पाताळेश्‍वर गणेशोत्सव मंडळ(महालचा राजा) तसेच भारत क्रीडा मंडळ,मन्नत पूर्ती सांस्कृतिक ट्रस्ट सहभागी होणार आहेत.मध्य नागपूरचे भाजपचे आमदार प्रवीण दटके यांच्या पुढाकारातून नागपूरातच नव्हे तर विदर्भातील ही अभिनव व अतिशय स्तुत्य अशी संकल्पना साकारली जाणार आहे.
आज पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रसिद्ध संती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने बोलताना संजय चिंचोले यांनी सांगितले की,दर वर्षी भाविक हे विसर्जनाच्या दिवशी आपल्या लाडक्या गणपतीची वाट पाहत किती तरी तास ताटकळत उभे राहतात.मग तो संतीचा गणपती असो,महाल चा राजा असो किंवा इतर गणपती मंडळाची मिरवणूक असो.यावेळी विविध मंडळांच्या वेगवेगळ्या मिरवणुका वेगवेगळ्या दिवशी व वेगवेगळ्या वेळेत न काढता एकत्रित्रपणे काढण्याचा निर्णय वरील चार ही गणेश मंडळांनी घेतलेला असल्याचे चिंचोले म्हणाले.यामुळे पोलीस प्रशासनावरील ताण,परिसरातील दैनदिन व्यवहारांवर होणारा परिणाम,वाहतूकीचा खोळंबा,नागरिकांची गैरसोय इत्यादी बाबी टाळण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतला असून ‘एकत्रित मिरवणूक-शिस्तबद्ध विसर्जन-वाहतूक व्यवसथेला सहकार्य तसेच भाविकांची सोय व आनंद’एकत्रितपणे साधल्या जाणार असल्याचे ते म्हणाले.
मुंबई व पुणे यासारख्या मोठमोठ्या शहरात गणेश विसर्जन सोहळे सामूहिक स्वरुपातच होत असतात.त्याच धर्तीवर नागपूरात प्रथमच सामूहिक व शिस्तबद्ध,नियोजनबद्ध विसर्जन मिरवणूकीची परंपरा निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे चिंचोले म्हणाले.गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक एकता,संस्कृती,शिस्त आणि बंधुभावाचा उत्सव आहे.त्यामुळे सर्व मंडळांनी एकत्रित येऊन विसर्जन मिरवणूक काढल्यास नागरिकांमध्येही एकतेचा सकारात्मक संदेश जाईल,असे त्यांनी सांगितले.
आम्ही चार ही मंडळाच्या पदाधिका-यांनी बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार प्रत्येक मंडळाचे सुमारे १०० कार्यकर्ते व स्वयंसेवक ही महाविसर्जन मिरवणूक सुरळीत,शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडावी यासाठी मिरवणूकीच्या व्यवस्थेमध्ये सक्रियपणे सहभागी होणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली.हे कार्यकर्ते व स्वयंसेवक मिरवणुकीदरम्यान नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही,वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही तसेच मिरवणुकीत शिस्त व सुव्यवस्था कायम राहील,याची विशेष काळजी घेतील.‘सेवा,शिस्त व समन्वय’या त्रिसुत्रीचा अवलंब करुन चारही मंडळाचे कार्यकर्ते, महाविसर्जन सोहळा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी योगदान देतील,असे त्यांनी सांगितले.
मध्य नागपूरातील तसेच संपूर्ण नागपूर शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी या उपक्रमाचा आदर्श घेऊन भविष्यात एकाच दिवशी,नियोजनबद्ध,शिस्तबद्ध तसेच गणेशोत्सवाला साजणा-या एकतेच्या संस्कृतीची कास धरीत, महाविसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याचे आवाहन चिंचोले यांनी याप्रसंगी केले.‘एकच दिवस-एकत्रित मिरवणूक-शिस्तबद्ध विसर्जन-वाहतूक व्यवस्थेला सहकार्य व नागपूरकर नागरिकांची सोय’या विचारातून पहिल्यांदा हा नवीन पायंडा पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले.
या महाविसर्जन सोहळ्यात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन भारत क्रीडा  मंडळाचे अध्यक्ष राम खुशलाणी यांनी केले.अश्‍या स्तुत्य उपक्रमाला फार उशिर का झाला?असा प्रश्‍न केला असता,ही गणरायांचीच ईच्छा असावी,त्यांनी आम्हाला आता तरी नवीन वाट दाखवली,असे ते म्हणाले.पाताळेश्‍वर मंडळाचे अध्यक्ष अक्षय नाईक यांनी आता चार मंडळांचे गणेश विसर्जन व मिरवणूक वेगवेगळ्या दिवशी व वेगवेगळ्या वेळी न निघता एकाच दिवशी व एकाच वेळी होणार असल्याने नागरिकांना चार दिवस अनेक तास गर्दीत तातकळत राहवे लागणार नसल्याचे सांगितले.फक्त एकच दिवस २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते १० एवढ्या चार तासातच आम्ही मिरवणूक संपवणार असून,मिरवणूक चिटणीस पार्क चौकात संपल्या बरोबर आम्ही आपापल्या मंडळाचे गणपती शांततेत विसर्जनासाठी कच्छीविसा व गोरेवाडा तलावात घेऊन जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री दक्षिणामूर्ती मंडळाचे प्रथमेश राव यांनी आज नागपूरकरांच्या गैरसोयीचा विचार करुन चार मंडळे एकत्रित आली मात्र पुढील काळात चाळीस मंडळे एकत्रित येऊन मिरवणूक व गणपती विसर्जन करतील असा आशावाद व्यक्त केला.आमदार प्रवीण दटके यांची ही स्तुत्य संकल्पना गणेश मंडळांनी उचलून धरावी असे आवाहन त्यांनी केले.याप्रसंगी शिवराज्याभिषेेक सोहळा समिती व युवा शक्ती मंचाचे साहिल काटोके यांनी देखील या अभिनव साेहळ्यात कार्यकर्ते व स्वयंसेवकांची भूमिका विशद केली.
असा आहे महाविसर्जन मिरवणूकीचा मार्ग-
शनिवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता संती गणेश मंडळाच्या मिरवणूकीची सुरवात सेंट्रल एव्हेन्यू वरुन होऊन बडकस चौक महालात येईल.यानंतर भारत गणेश मंडळाच्या मिरवणूकीची सुरवात होईल,यानंतर पाताळेश्‍वर महालच्या राजाची मिरवणूक निघेल व सर्वात शेवटी श्री दक्षिणामूर्ती मंडळाच्या मिरवणूकीला प्रारंभ होईल.या सर्व मिरवणूका शिस्तबद्धरित्या वाटचाल करीत बडकस चौक-कोतवाली चौक-नरसिंग टॉकीज मार्गे-शिवाजी महाराज चौक-चिटणीस पार्क चौक येथे समाप्त होतील.मिरवणूकीचा अवधी सायंकाळी ६ ते रात्री १० एवढाच असणार आहे व याच ठिकाणाहून आपापल्या वाहनांनी गणेश विसर्जनासाठी शांततेत मार्गस्थ होतील.एकमेव संती गणेशाचे विसर्जन गोरेवाडा तलावात होणार असून इतर तीन मंडळाचे गणेश विसर्जन कच्छीविसा येथे होणार आहे.
(बातमीशी संबंधित व्हिडीयो sattadheesh official युट्यूबवर उपलब्ध)
…………………………………….

Latest बातम्या