Homeसांस्कृतिक / मनोरंजनया रे या सारे या....

या रे या सारे या….

Advertisements
Advertisements
दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात हातमाग विणकर-कारागिरांचा जलवा

डॉ.ममता खांडेकर
संपादक ‘सत्ताधीश’
नागपूर,ता.२२ सप्टेंबर २०२६ : सिव्हिल लाइन्स येथील दक्षिण क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात १६ सप्टेंबर पासून ‘मृगनयनी’प्रदर्शन सुरु आहे.संत रविदास मध्य प्रदेश हस्तशिल्प एंव हाथकरघा विकास निगम,भोपाळ यांच्या वतीने आयोजित या प्रदर्शनीत हातमाग वस्तू तसेच विणकरांनी विणलेल्या चंदेरी,माहेश्‍वरी साड्या,ड्रेस,ज्वेलरी इत्यादी ५६ स्टॉलचा जलवा  ओसंडून वाहत आहे.महाराष्ट्रात सध्या लाडक्या गणरायाचा उत्सव सुरु आहे.त्यामुळेच मध्यप्रदेशमधून अप्रतिम कलाकृती,दागिने व साड्या,ड्रेसची विक्री करण्यासाठी आलेल्या या गुणी कारागिरांनी, नागपूरकरांना गणरायाच्या साक्षीने ‘या रे या,सारे या,गजाननाला आळवू या’अशी साद दिली आहे.
महत्वाचे म्हणजे सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये असलेल्या या अप्रतिम साड्या,ड्रेस मटेरियल तसेच विविध वैशिष्ठपूर्ण दागिन्यांनी ग्राहकांना भूरळ घातली आहे.१९३० च्या दशकातील रेशमी किनार असलेल्या चंदेरी,मलमल आणि सुती साड्या,देवी अहिल्याबाई होळकर यांच्या नगरीतील हातकरख्यावर अजूनही विणल्या जाणा-या अप्रतिम माहेश्‍वरी साड्या,तसेच १२ औषधी वनस्पतींच्या नैसर्गिक रंगांपासून तयार केलेल्या विशेष बाग प्रिंट साड्या महिला वर्गाला मोठ्या संख्येने खुणावत आहेत.उज्जैन बटीक,बाराशिवनी कोसा साड्या त्यांच्या विशेष रंगांमुळे महिला वर्गाला भूरळ घालत आहेत.
प्रदर्शनाचे प्रभारी अरविंद शर्मा यांनी खास‘सत्ताधीश’ला सांगितले की,केवळ महिलांसाठीच नव्हे तर पुरुषांसाठी देखील खादी,कोसा इत्यादीचे आकर्षक वस्त्र प्रदर्शनीत उपलब्ध आहेत.या प्रदर्शनाचे आणखी एक आकर्षण म्हणजे ‘तुळशीच्या माळा‘ आहेत.५०० रुपयांपासून ५१ हजार पर्यंतच्या आकर्षक तुळशीच्या माळा ग्राहकांचे लक्ष वेधून घेतात.जबलपूरचे सुप्रसिद्ध तुळशीसाधक शुक्ला जी हे अनेक दशकांपासून ऑरगॅनिक तुळशीची शेती करीत आहेत.हा त्यांचा पिढीजात व्यवसाय असून इतक्या प्रदीर्घ अनुभवातून साकारलेल्या या तुळशी-माळा संग्रहणीय अश्‍या आहेत.
याशिवाय शिफॉन,मल्बरी,क्रेप,कोसा आणि इंडिगो प्रिंटच्या साड्या,पंचधातू व बेल मेटलपासून तयार केलेल्या मूर्ती तसेच खादी ग्रामाेद्योगाच्या उत्पादनांची देखील चंगळ कारागिरांच्या या ‘मृगनयनी‘प्रदर्शनात बघायला मिळते.आपल्या अप्रतिम कलाकुसरीने साकारलेल्या या कलाकृतींचे विपणन म्हणजे विक्री करण्यासाठी मध्यप्रदेशमधील हे ५० ते ५५ कारागिर मायमराठी भूमीत आले आहेत.
मृगनयनी प्रदर्शनात दागिन्यांचे अनेक स्टॉल्स असून अवघ्या २०० रुपयांपासून अप्रतिम दागिने या प्रर्शनात उपलब्ध आहेत.बेंटेक्सपेक्षाही दर्जेदार व टिकाऊ एन्टी टर्मिश ज्वेलरी प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरते.शुद्ध पितळीचे दागिनेही विशेष आकर्षित करतात.याशिवाय सिहोरा चहापत्ती,विविध अर्क,देवासच्या सुप्रसिद्ध चामड्यांच्या हॅण्डबॅग्स,मनसोरची मीनाकारी ज्वेलरी लक्षवेधक आहेत.
जम्बोट लाकडाचा स्टॉल तर लक्ष वेधून घेणारा आहे.जांभूळ लाकडाचा एकच लहानचा ओंडका पाण्याच्या विशाल टाकीमध्ये टाकल्यावर १०० वर्षे देखील टाकीतील पाणी हे खराब होत नाही,त्यात शेवाळ व किटक होत नसल्याचा दावा अरविंद पांडे यांनी केला.हे मध्यप्रदेश मधील,मंडळाच्या घनदाट जंगलातून आणलेले लाकूड आहे. महत्वाचे म्हणजे या पाण्याच्या सेवनाने उच्च रक्तदाब व मधूमेहसारखे राेग देखील आटोक्यात राहतात,असे ते सांगतात.

(छायाचित्र : मंडळाच्या जंगलातील गुणकारी लाकूड)

महत्वाचे म्हणजे,मीनाकारीच्या स्टॉलवर ऑर्डर देऊन,मुंजी,लग्न,वाढदिवस,दसरा-दिवाळीसारख्या शुभ सोहळ्यात वापरल्या जाणारी पूजेची थाळी,चौरंग,पाट,दिवे इत्यादी सामग्री देखील ग्राहक बुक करु शकतात.प्रदर्शनातील सगळ्याच स्टॉल्सवर घरपोच ऑर्डरची सुविधा उपलब्ध आहे,हे विशेष.
ही प्रदर्शनी रविवार दिनांक २७ सप्टेंबर पर्यंत सुरु राहणार असून दररोज सकाळी १२ ते रात्री ९ वाजेपर्यंत ग्राहकांसाठी उपलब्ध राहणार आहे. मोठ्या संख्येने प्रदर्शनीचा लाभ घेण्याचे आवाहन प्रदर्शनीचे मुख्य संयोजक एम.एल.शर्मा यांनी केले आहे.
(बातमीशी संबंधित व्हिडीयो Sattadheesh official युट्यूबवर उपलब्ध)
………………………………………….

Latest बातम्या