एका महिलेचाही सहभाग!
नागपूर,ता.४ सप्टेंबर २०२६: काँग्रेस नगरसेवक शुभम शेषराव मोटघरे यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी सात आरोपींना अटक केली. गुजरात तसेच छत्तीसगढ येथून या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींनी जुन्या वादातून हा कट रचल्याचे सांगितले.
अंकुश जनक तोमसकर (३०, समतानगर, आंबा टोली, जरिपटका), अमित मधुकर ठाकरे (२२, समतानगर, आंबा टोली, जरिपटका), ऋषभ उर्फ छोट्या विशाल नागदेवे (२४, इसासनी, एमआयडीसी), रोमित उर्फ पुल्ल्या मुनेश्वर वाहने (२५, समतानगर, कपीलनगर), ऋषभ उर्फ कांच्या भगवती पैथल (३०, समतानगर, जरिपटका), केतन दुर्गाप्रसाद माटे (२४, संत लहानुजीनगर, जरिपटका), कार्तिक बबलु तोमसकर (२४ वर्षे, चंद्रमणीनगर, अजनी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
मागील २६ ऑगस्ट रोजी रात्री १२.४२ वाजेच्या सुमारास नगरसेवक शुभम मोटघरे हे त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावरील हॉलमध्ये गेले होते. यावेळी त्यांना अचानक इलेक्ट्रिक डीपी ब्लास्ट झाल्यासारखा मोठा आवाज आला. त्यांनी गॅलरीत येऊन पाहिले असता गॅलरीतील काच तुटलेला दिसला. घरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, खंडवानी टाऊन रोडवरून स्वामीनारायण मंदिराकडे जाणा-या मार्गावर दुचाकीवरून दोन अनोळखी आरोपी जात असल्याचे दिसले. त्यांपैकी मागे बसलेल्या मुलाने मोटघरे यांच्या घराच्या गॅलरीच्या दिशेने बंदुकीने गोळी झाडली.

(छायाचित्र सौजन्य: नागपूर टूडे)
गोळी गॅलरीच्या रेलिंगला लागल्याने काचाचे तुकडे उडून गॅलरीत पडले. हा गोळीबार नगरसेवकाला ठार मारण्याच्या उद्देशाने करण्यात आला होता. घटनेनंतर मोटघरे यांनी तत्काळ ‘डायल ११२’ वर कॉल करून माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. मोटघरे यांच्या तक्रारीवरून भांडेवाडी पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे, घरफोडी विरोधी पथक, एनडीपीएस विरोधी पथक, एसएसबी पथक व सायबर सेल अशा एकूण ७ वेगवेगळी पथके गठीत करण्यात आली होती.
या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत. तपासात एका महिलेचाही सहभाग असल्याचा संशय असून तीही फरार असल्याची माहिती आहे. फरार आरोपी आणि संबंधित संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर गोळीबारामागील कटाचा पूर्ण उलगडा होण्याची शक्यता असल्याचे आज पत्रकार परिषदेत पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.
या गोळीबार कांडची नागपूरात राजकीयस्तरावर देखील खूप चर्चा झाली होती.
——————————