मनपा व पोलीस आयुक्तालय तर्फे नागरिकांसाठी सुविधा
नागपूर ता.३ सप्टेंबर २०२६: नागपूर महानगरपालिकेने पुढाकार घेत नागपूर शहर ध्वनी प्रदूषण मुक्त करण्याच्या दिशेने पाऊल टाकत ध्वनी प्रदूषणाच्या संदर्भात तक्रार निवारण करण्यासाठी विशेष संकेतस्थळ लोकांसाठी कार्यान्वित केले आहे. याउपक्रमासाठी नागपूर पोलीस आयुक्तालयाचे सहकार्य मिळाले आहे. या संकेतस्थळांवर नागरिकांना तक्रार दाखल करता येईल.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार ‘ध्वनीप्रदूषण मुक्त’ नागपूर (Noise Free Nagpur) ही नागरिकांसाठी विशेष तक्रार निवारण प्रणाली सुरू करण्यात आली आहे. नागपूर शहराला शांत, सुरक्षित व निरोगी बनवणे तसेच प्रत्येक नागरिकाला ध्वनिप्रदूषणविरोधी तक्रार करण्याचा सोपा, निःशुल्क आणि वेळेवर हाताळला जाणारा पर्याय उपलब्ध करून देणे हे प्रणाली मागील उद्दिष्ट आहे.
वाहतूक, बांधकाम, डीजे, लाऊडस्पीकर,फटाके व औद्योगिक स्रोतांमुळे निर्माण होणारा आवाज हा नागरिकांच्या आरोग्यावर, अभ्यासावर आणि दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम करू शकतो, म्हणून यावर प्रभावी, समयसूचक आणि जबाबदार यंत्रणा उभी करण्यासाठी ही प्रणाली आवश्यक आहे.
तक्रार दाखल करण्याची पद्धत-
तक्रार दाखल करण्यासाठी मोबाईल / संगणकावर https://noisefreenagpur.in/ या पोर्टलवर जा. संकेतस्थळाच्या मुख्यपृष्ठावर ‘Register’ करून खाते तयार करा. नंतर ‘File Complaint’ हा पर्याय निवडा. घटनास्थळाचा पत्ता, स्रोत, वेळ व वर्णन नोंदवा उपलब्ध असल्यास ‘फोटो/ व्हिडिओ/ ऑडिओ’ पुरावा जोडा : LiveDecibel Meter वापरून आवाजाची प्रत्यक्ष पाहणी करा. तक्रार आपोआप त्या भागातील पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांकडे(PI) वर्ग होईल. याचवेळी एक संदर्भ क्रमांक (‘Reference) जनरेट होईल. हा क्रमांक जपून ठेवा: कोणत्याही वेळी ‘Track Complaint’ द्वारे तक्रारीची स्थिती पाहता येईल.
ही सेवा २४ तास उपलब्ध असून कुठल्याही मोबाईल, संगणक, टॅब्लेट द्वारे तक्रार नोंदविता येत असून, निनावी तक्रार नोंदविण्याचा पर्याय देखील नागरिकांसाठी उपलब्ध आहे. तक्रारीसाठी मनपाच्या सोशल मीडियावर तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यात व सूचना फलकांवर उपलब्ध करून दिलेल्या QR कोडचा वापर करता येऊ शकते. नागपूर ध्वनिप्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक असून पोर्टलचा नागरिकांनी परिचितांमध्ये (शेजारी, गृहनिर्माण संस्था, शाळा-महाविद्यालय,व्यापारी संघटना व सामाजिक संस्थां) प्रसार व प्रचार करून ही माहिती पोहचवावी असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.
………………………………………
तक्रार निवारण प्रणालीचे वैशिष्ट्ये
*‘नॉईज फ्री नागपूर’: ध्वनीप्रदूषणाच्या तक्रारीवर अवघ्या ३० मिनिटांत कारवाई.
*तक्रारदारांची ओळख गोपनीय ठेवण्याची सोय.
*३० मिनिटांत दखल न घेतल्यास तक्रार थेट एसीपी, डीसीपींकडे वर्ग होणार
मा. उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या आदेशान्वये मनपा आयुक्त डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शनात माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक श्री. मिलिंद मेश्राम व माहिती व तंत्रज्ञान अधिकारी श्री. स्वप्नील लोखंडे यांच्या नियंत्रणात विकसित करण्यात आलेले असून, शहरातील ६ पोलीस परिमंडळे (झोन) आणि ३५ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
आवाजाची तीव्रता मोजता येणार
डीजे, अवाजवी लाऊडस्पीकर, फटाके, बांधकामामुळे होणारे आवाज, वाहनांचे हॉर्न, मॉडिफाइड सायलेंसर आणि जनरेटर यांसारख्या उल्लंघनांची तक्रार करताना पोर्टलवर उपलब्ध असेल. तसेच पुरावा म्हणून फोटो, ऑडिओ अथवा व्हिडिओ अपलोड करण्याची सुविधा देण्यात आली आहे. प्रत्येक तक्रारीसोबत अचूक वेळ (टाईमस्टॅम्प) आणि जीपीएस लोकेशन जोडले जाईल.