Homeनागपूर मनपासिमेंट रस्त्याच्या फाईलवरुन काँग्रेसचे ‘हे’ आजी-माजी नगरसेवक भिडले

सिमेंट रस्त्याच्या फाईलवरुन काँग्रेसचे ‘हे’ आजी-माजी नगरसेवक भिडले

नागपूर,ता.१२ ऑगस्ट २०२६: नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीने मंजूर केलेल्या विकासकामाची अधिकृत फाईल समिती सचिवालयातून चोरी झाल्याचा गंभीर आरोप नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य अभिजीत झा यांनी केला आहे. या प्रकरणात माजी नगरसेवक कमलेश चौधरी यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप करत त्यांच्यासह फाईल घेऊन जाणाऱ्या व्यक्तीविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी झा यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांची भेट घेऊन लेखी तक्रार दाखल केली.

प्रभाग क्र. १४ मधील बडी मस्जिद ते पंचशीलनगर, गिट्टीखदान येथील सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या कामाची फाईल स्थायी समितीच्या मंजुरीनंतर ७ जुलै २०२६ रोजी आवक क्र. २७-C अन्वये समिती सचिवालयात प्राप्त झाली होती. मात्र, पुढील प्रशासकीय कार्यवाहीसाठी ही फाईल संबंधित विभागाकडे पोहोचली नसल्याचे लक्षात आल्यानंतर झा यांनी सचिवालयातील संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली.
झा यांना सचिवालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी नगरसेवक कमलेश चौधरी यांच्यासोबत आलेल्या एका अनोळखी व्यक्तीला चौधरी यांनी नागपूर महानगरपालिकेचा कर्मचारी असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. मात्र, त्या व्यक्तीचे ओळखपत्र तपासणे, तो खरोखरच मनपा कर्मचारी आहे की नाही याची शहानिशा करणे किंवा त्याच्याकडे फाईल स्वीकारण्याचे अधिकृत अधिकारपत्र आहे का, याची कोणतीही पडताळणी न करताच अधिकाऱ्यांनी सदर फाईल त्या अनोळखी व्यक्तीच्या ताब्यात दिली. संबंधित व्यक्तीला फाईल देण्यात आल्याची नोंद समिती सचिवालयाच्या आवक-जावक रजिस्टरमध्ये असून त्यात ‘शेखर नंदेश्वर’ असे नाव नोंदविण्यात आल्याचे झा यांनी म्हटले आहे.
कोणतीही शहानिशा न करता अनाधिकृत व अनोळखी व्यक्तीच्या ताब्यात विकास कामांची कामांची फाईल देणे हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. संबंधित दिवसाचे समिती सचिवालय व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तात्काळ हस्तगत करून सुरक्षित ठेवावे, फाईल नेणाऱ्या व्यक्तीची ओळख निश्चित करून फाईल हस्तगत करावी आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी,” अशी मागणी झा यांनी केली.
झा यांनी आपल्या तक्रारीत कमलेश चौधरी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्यांच्याविरोधात सरकारी कागदपत्रांमध्ये कथित गैरकायदेशीर फेरफार केल्याप्रकरणी यापूर्वी गुन्हे दाखल असल्याचाही उल्लेख केला आहे. अशा पार्श्वभूमीच्या व्यक्तीने सोबत आणलेल्या अनोळखी इसमाला केवळ त्यांच्या सांगण्यावरून मनपा कर्मचारी मानून अधिकृत फाईल देणे ही बाब अधिकच गंभीर असल्याचे झा यांनी म्हटले आहे.
या प्रकरणात कमलेश चौधरी यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप करत चौधरी आणि फाईल घेऊन जाणाऱ्या संबंधित व्यक्तीविरोधात तात्काळ पोलिसांत गुन्हा दाखल करावा, तसेच कोणतीही शहानिशा अथवा अधिकृत पडताळणी न करता महानगरपालिकेची महत्त्वाची फाईल अनोळखी व्यक्तीच्या ताब्यात देणाऱ्या संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी झा यांनी आयुक्तांकडे केली आहे.
यासोबतच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आयुक्तांनी सुधारित प्रशासकीय आदेश काढून महानगरपालिकेच्या सर्व विभागांना फाईल हाताळणी व एका विभागातून दुसऱ्या विभागात फाईल पाठविण्याच्या प्रक्रियेचे काटेकोर पालन करण्याच्या स्पष्ट सूचना द्याव्यात. कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला महानगरपालिकेची अधिकृत फाईल हाताळण्यास, ताब्यात घेण्यास अथवा पाहण्यासही मज्जाव करण्यात यावा अशी मागणी झा यांनी आयुक्तांकडे केली आहे.
‘तो मी नव्हेच’: कमलेश चौधरींचा दावा
६५ लाख आणि ४० लाखांच्या सिमेंट रस्त्यांच्या दोन प्रस्तावांना २०२५ मध्येच मंजुरी मिळाली होती.निविदा काढून झाल्या होत्या.वर्क ऑर्डर निघाले होते.या सर्वांसाठी मी प्रचंड मेहनत घेतली होती. तो काळ मनपामध्ये प्रशासक राजचा होता. .जानेवरी २०२६ मध्ये मनपाच्या निवडणूका झाल्या,त्या आधी विविध निवडणूकांमुळे आचार संहिता लागली होती.मनपात नवे सत्ताधारी आले.त्यांनाही मी या दोन्ही मंजूर झालेल्या कामासाठी प्रत्यक्ष भेटलो,स्थायी समिती अध्यक्षांनी देखील वर्क ऑर्डर मंजूर झाले असल्याने यात कोणताही अडथळा येणार नसल्याचा शब्द दिला.
मात्र,सोशल मिडीयावर नगरसेवक अभिजित झा याने माझ्या या मंजूर कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला.जे काम तो नगरसवेक नसताना २०२५ मध्येच मंजूर झाले,त्याचे श्रेय तो कसा घेऊ शकतो?मूळात एक-एक फाईल अधिका-यांच्या टेबलांवर किती हजार फे-या मारल्यावर मंजूर होतात, याचा तरी अनुभव झा यांना आहे का?अधिकारी चक्क जनहिताच्या तसेच खूप महत्वाच्या फाईलींवरही ’डिस्कस’ म्हणून शेरा लिहून मोकळे होतात.त्यानंतर ती फाईल कोणत्याही ’डिस्कशन’शिवाय अडगळीत पडून राहते.झा यांनी आधी फाईली कशा मंजूर करुन घ्याव्या लागतात आधी हे तर शिकून घ्यावे असा टोला हाणत, आता ही मंजूर फाईल फक्त झोनला पाठवायची होती,असा कमलेश चौधरी यांनी खुलासा पाठवला.
झा यांची सोशल मिडीयावरील पोस्ट बघितल्यानंतर मी विद्यमान नगरसेवक तेलंग यांना याबाबत पुढाकार घेण्यास सांगितले.त्यांनी दोन पत्रे जोडली.मूळात मनपात शेकडो नगरसेवक हे फाईली घेऊनच अधिका-यांच्या टेबलवर फिरत असतात.मनपात ‘Hand to Hand’फाईली फिरवून कामे मंजूर करुन घ्यावी लागतात, त्यामुळे तेलंग यांनी काही वेगळे अघटित केले असा त्याचा अर्थ होत नाही.मी त्या फाईलचे आता काय करणार आहे?मात्र,त्या कामाचे श्रेय कमलेश चौधरीला मिळू नये म्हणून झा यांनी हा सगळा कांगावा केला आहे.
ज्या दिवशी विद्यमान नगरसेवक धनराज तेलंग फाईलसाठी विभागात गेले,त्या दिवशी मी मुंबईत होतो.माझे मोबाईल लोकेशन झा पोलिस विभागाच्या मदतीने ट्रेस करु शकतात.त्यामुळे मी ती फाईल घेऊन गेलो ,हा आरोप हास्याससपद आहे.निवडणूक हरल्यानंतरही कामाचे श्रेय कमलेश चौधरीला मिळू नये म्हणून झा यांची ही पोटदुखी आहे.झा यांनी आधी मनपात पाच वर्षे शासन-प्रशासनाच्या कामात मुरावे नंतरच असे बालिश आरोप करावे,असा सल्ला देत, झा यांच्यासाठी इतकंच म्हणेल,‘नया है वो!’
……………………………………..

Latest बातम्या