Homeनागपूर मनपाझोन संख्या वाढीचा प्रस्ताव आणि सत्ताधारी-विराेधक आमने-सामने

झोन संख्या वाढीचा प्रस्ताव आणि सत्ताधारी-विराेधक आमने-सामने

मनपाच्या सर्वसाधारण सभेत गुंजलाजला ‘नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी’चा नारा

संविधान हातात घेऊन महापौरांनी मंजूर केलेल्या विषयावर घमासान
‘झोन बढाना बहाना है..सभापती हटाना है’:विरोधकांच्या सभागृहात घोषणा
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.१० ऑगस्ट २०२६: महानगरपालिकेच्या आजच्या सभेत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर(बंडू)राऊत यांनी मनपाचे एकूण झोन किती,ते किती वर्षांपूर्वी निर्धारित करण्यात आले होते,तेव्हाची व आताची अंदाजे लोकसंख्या किती आहे,असा प्रश्‍न सभागृहात मांडला.यावर उत्तर देताना २००३ मध्ये एकून दहा झोनची निर्मिती झाली असून २०१७ च्या सार्वत्रिक निवडणूकीत आरो अधिका-यांनी हेच निर्धारण गृहीत धरले असल्याचे मनपा प्रशासनाने सांगितले.
यावर,२००३ पासून  म्हणजे चोवीस वर्षात नागपूरच्या लोकसंख्येत महत्वपूर्ण वाढ झाली असून, मनपा हद्दीत अनेक ग्रामीण भाग समाविष्ट झाले असल्याने, लोकसंख्येच्या अनुपातात झोनची संख्या वाढवून ती बारा पर्यंत करण्यात आली तर मनपाचे कामकाज सोयीचे होईल,असा प्रस्ताव बंडू राऊत यांनी मांडला तसेच २०१२ मध्ये नागपूरची लोकसंख्या वीस लाख गृहीत धरली व २०२६ मध्ये ती ३३ लाख झाली असेल तर झोनची संख्या किती वाढवता येईल यावर प्रशासनाने पुढील सभेत तपशील सादर करण्याची मागणी महापौरांना केली.महापौर नीता ठाकरे यांनी बंडू राऊत यांचा प्रस्ताव मंजूर करताच विरोधकांनी एकच गदारोळ केला.
इंडियन मुस्लिम लीगचे गटनेते असलम मुल्ला खान यांनी मनपाच्या झोन कार्यालयात आधी ‘जे ई’म्हणजे कनिष्ठ अभियंता तरी आहेत का हे तपासून बघावे नंतर झोनची संख्या वाढवावी,असा आक्षेप घेतला.आमच्या आशी नगर झोनमध्ये आधी कनिष्ठ अभियंता तर बसवा,अशी मागणी करताच बंडू राऊत व असलम खान यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झडली.
यावर सत्ता पक्ष नेते बाल्या बोरकर यांनी मध्यस्थी करीत,हा आजच्या सभेपुरता विषय नसून झोनची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव आधी शासनाला पाठविला जाईल,यानंतर तो मंजूर होईल,अशी पुश्‍ती जोडत त्या प्रस्तावात आपण अधिकारी संख्या देखील वाढवून मागू,असे ते म्हणाले.यावर असलम खान यांनी एका झोनमध्ये चार प्रभाग असतात,सोळा नगरसेवक असतात,तरी रस्त्यांमध्ये खड्डे पडलेले आहेत,नागरिक खड्ड्यांसाठी आमचा उद्दार करत असतात तरी महापौर बंडू राऊतांचा प्रस्ताव मंजूर करीत आहे,ही हूकूमशाही असल्याचा आरोप त्यांनी भर सभागृहात केला.
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या गटनेत्या व ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे यांनी बंडू राऊत यांची दहा ऐवजी बारा झोनची मागणी निश्‍चित मंजूर झाली पाहीजे पण,आधी मनपाकडे तेवढा वाढलेला डोलारा सांभाळायला अधिकारी-कर्मचा-यांची संख्या आहे का?हे तर तपासून बघा असे म्हणत,सध्या मनपात कार्यरत आहेत त्याच कनिष्ठ अभियंताना नगर रचना विभागात किंवा लेखा विभागात जाण्याची ईच्छा आहे,असा टोला हाणला.एकेका अधिका-यांकडे तीन-तीन विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे,परिणामी साधी चेंबरची फाईल बनायला आठ-आठ दिवसांचा अवधी लागतो.झोनची संख्या वाढवण्या आधी प्रत्येक झोनमध्ये किती अधिका-यांची नियुक्ती झाली आहे,याचा तपास करुन सभागृहात अहवाल सादर करावा,अशी मागणी त्यांनी केली.यासोबतच वृक्ष समितीत सदस्य म्हणून माझे नाव असताना देखील समितीच्या बैठकीची मला कोणतीही माहिती देण्यात आली नाही,तुम्ही एकटेच शहरातील उद्याने विकसित करणार का?असा टोला त्यांनी हाणला.यावर महापौर यांनी आभा पांडे यांचे नाव समितीत असल्याचे मान्य केले मात्र,बाल्या बोरकर यांनी उद्यान विभागाची अशी कोणतीच बैठकच झाली नसल्याचा दावा केला.
भाजपचे नगरसेवक विकी कुकरेजा यांनी,बंडू राऊत यांनी सादर केलेल्या प्रस्तावावर चर्चा सोडून विषय भरकटवला जात असल्याचा आरोप केला.बंडू राऊत यांनी मनपा आयुक्त डॉ.विपीन इटनकर यांनीच यावर उत्तर द्यावे,अशी मागणी केली कारण झोन वाढीचा प्रस्ताव तेच शासनाकडे सादर करणार असल्याचे सांगितले.
यावर विरोधी पक्ष नेते संजय महाकाळकर यांनी गेल्या सतरा वर्षांपासून मनपात तुमचीच सत्ता आहे,चार वर्षे प्रशासक राज होते,मनपाच्या निवडणूका पार पडल्या तेव्हा ही तुम्हाला अडचण आली नाही,मनपात मंजूर पदानुसार अधिकारी-कर्मचारीच नाहीत,नगरसेवकांची कामेच होत नाही.आधी मंजूर पदावर अधिकारी-कर्मचा-यांची नियुक्ती करा,झोनची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्याची काही एक गरज नसल्याचे त्यांनी ठणकावले.
यावर महापौरांनी,नागपूर हे सतत वाढते शहर आहे,त्यामुळे झोनची संख्या ही वाढली पाहिजे,संख्या वाढली तर अधिकारी-कर्मचारीही वाढतील,यामुळेच हा प्रस्ताव मंजूर केला असल्याचे सांगताच,विरोधकांनी  उभे राहून ‘नही चलेंगी नही चलेंगी तानाशाही नही चलेंगी’,हातात संविधानाची प्रत घेऊन‘जय संविधान’’झोन बढाना बहाना है,सभापती हटाना है’असे नारे दिले.आशी नगर झोनमध्ये विरोधी पक्षातील काँग्रेसचे आसिफ शेख हे सभापती आहेत हे विशेष.महापौरांनी या सर्व गोंधळात सभागृह दहा मिनिटांसाठी तहकुब केले.
महापौरांनी हा मंजूर प्रस्ताव मागे घ्यावा किंवा यावर चर्चा घडवून आणावी,अशी मागणी विरोधकांनी केली.बहूमताच्या आधारावर महापौरांनी बंडू राऊतांचा झोन वाढीचा हा प्रस्ताव मंजूर केला असल्याचा आरोप त्यांनी केला.आभा पांडे यांनी बंडू राऊतांनी मांडलेला विषय आहे,प्रस्ताव नाही त्यामुळे प्रशासनाने यावर तपशीलवार माहिती सादर करुन यावर सभागृहात चर्चा घडवून आणावी व रितसर कारवाई व्हावी,अशी मागणी केली.
बंडू राऊत यांनीही दोन दिवसात झोनची संख्या वाढणार नसल्याचे सांगितले.स्थायी समिती अध्यक्ष शिवाणी दाणी यांनीही प्रशासन या विषयावर आधी अभ्यास करेल,मग तो अहवाल सभागृहात मांडेल यानंतर सभागृहात त्यावर चर्चा होईल,शासनाकडे मंजूरीसाठी जाईल,किती ही घाई केली तरी या सर्व प्रक्रियेत एक ते दीड वर्षे सहज जातील,अशी पुश्‍ती त्यांनी जोडली.
महाकाळकर यांनी अनेक झोनमध्ये कनिष्ठ अभियंतेच नाही,नागपूरकर नागरिक व प्रशासनाच्या दृष्टिने हा ज्वलंत मुद्दा असून यावर मनपा आयुक्तांनी उत्तर देण्याची मागणी केली.
विरोधकांनी अाभा पांडे यांच्या सूचनांसह हा प्रस्ताव मंजूर करावा,अशी मागणी लावून धरली.अखेर महापौरांनी हा प्रस्ताव सादर करण्यासाठी  प्रशासनाला सूचना दिली व या वादावर पडला पडला.
……………………………………………..

Latest बातम्या