
वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन, हजारो नागरिकांनी घेतला लाभ

नागपूर: समाजातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचविणे ही शासनाची प्राथमिकता आहे. गरिबांचा उपचार पैशाअभावी थांबू नये, यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीचा विस्तार करण्यात आला असून आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. सेवा हाच आमचा धर्म असून प्रत्येक गरजू रुग्णापर्यंत उपचार पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
भारतीय जनता पार्टी दक्षिण पश्चिम नागपूर, पश्चिम नागपूर आणि दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्र तसेच मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धनवटे नॅशनल कॉलेज व न्यू इंग्लिश हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित भव्य महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, भाजपाचे राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश, महापौर नीता ठाकरे, भाजपाचे नागपूर महानगर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, उपमहापौर लीलाताई हाथीबेड, आमदार मोहन मते, आमदार संजय भेंडे, आमदार डॉ. राजीव पोतदार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मनपा आयुक्त डॉ. विपीन, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी आमदार गिरीश व्यास, सुधाकर कोहळे, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख तसेच शिबिराचे मुख्य संयोजक, माजी आमदार तथा माजी महापौर संदीप जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात मुख्य संयोजक संदीप जोशी यांनी महाआरोग्य शिबिरामागील संकल्पना स्पष्ट केली. समाजातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार, सुलभ आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच १ ते १५ जुलै या कालावधीत दक्षिण-पश्चिम, पश्चिम आणि दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रात ७२ स्क्रिनिंग कॅम्प आयोजित करण्यात आले. या कॅम्पमधून हजारो नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यानंतर गरजू रुग्णांना महाआरोग्य शिबिरात पुढील उपचारासाठी जोडण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

महाआरोग्य शिबिरात जनरल हेल्थ चेकअप, विविध तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, हृदयरोग, मधुमेह, नेत्ररोग, दंतरोग, अस्थिरोग, स्त्रीरोग, बालरोग, त्वचारोग, ईएनटी आदी विभागांतील तपासण्या, रक्त तपासणी, ईसीजी, एक्स-रे, सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय तसेच आवश्यक औषधांचे मोफत वितरण करण्यात आले. याशिवाय अत्यावश्यक व गरजू रुग्णांवर पुढील टप्प्यात उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी नोंदणी आणि वैद्यकीय प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे सांगत त्यापुढील टप्प्यात आता हे महाआरोग्य शिबीर होत असल्याचे जोशी यांनी सांगितले.
कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अशा प्रकारच्या महाआरोग्य शिबिरांची आज समाजाला नितांत आवश्यकता असल्याचे सांगितले. या शिबिरातून हजारो रुग्णांना उपचाराची नवी आशा मिळते. नागपुरात उभारलेले हे मॉडेल राज्यासाठी प्रेरणादायी असून मुख्य संयोजक संदीप जोशी यांच्यासह संपूर्ण आयोजन समिती, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आतापर्यंत ५७ हजार रुग्णांना ७५२ कोटी रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती दिली. सर्व रुग्णालयांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्याचे काम सुरू असून आर्थिक अडचणीमुळे कोणाचाही उपचार थांबणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. दिव्यांग बांधवांसाठीही मोठ्या प्रमाणावर विविध योजना राबविण्यात येत असून आरोग्य क्षेत्रात सेवा आणि संवेदनशीलतेच्या भावनेतून शासन कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, हेमंत काळमेघ तसेच न्यू इंग्लिश हायस्कूल संचालित संस्थेचे अध्यक्ष डॉ. विलास डांगरे व सचिव अजी धाक्रस यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन क्षिप्रा मानकर यांनी केले, तर आभार महाआरोग्य शिबिराचे सह संयोजक तथा नगरसेवक रितेश गावंडे यांनी मानले.
डॉक्टरांचा गौरव
महाआरोग्य शिबिरात सेवा देणाऱ्या विविध शासकीय, निमशासकीय व खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डॉ. राज गजभिये, डॉ. अविनाश गावंडे, केंद्र गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डॉ. रवी चव्हाण, डॉ. नितीन शेंडे, एम्सचे डॉ. प्रशांत जोशी, डॉ. नीलेश नागदिवे, लता मंगेशकर हॉस्पिटलचे डॉ. अनुज तिवारी, डॉ. सेजल मित्रा, डॉ. निवृत्ती राठोड, नागपूर महानगरपालिकेचे डॉ. दिलीप सेलोकर, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे डॉ. समीर श्रीरंगवार, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर, शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मंगेश फडनाईक, नोडल ऑफिसर डॉ. धीरज कालरा, हिंद लॅब्सचे डॉ. श्रीकांत वानखेडे, डॉ. हसबन खान यांचा समावेश होता.

मुख्यमंत्री सहायता निधी व डायग्नोस्टिक सेंटरसाठी देणग्या
या कार्यक्रमात अनेक दात्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी तसेच गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरसाठी आर्थिक व वस्तूरूपाने योगदान दिले. कमलेश धहरवाल यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. राहुल बजरंग सोलाट यांनी डायग्नोस्टिक सेंटरसाठी अकरा लाख रुपयांचा धनादेश प्रदान केला. खासदार अजित गोपछेडे यांच्या माध्यमातून मेरिल लाइफ सायन्सेसतर्फे पॅथॉलॉजी मशीन उपलब्ध करून देण्यात आली. तसेच कार्डियाक रुग्णवाहिका, रुग्णवाहिका आणि लोढा फाउंडेशनतर्फे चालता-फिरता दवाखाना प्रदान करण्यात आला.
२०० दिव्यांगांना व्हीलचेअर वाटपाचा संकल्प
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त २०० दिव्यांगांना व्हीलचेअर वाटपाचा संकल्प करण्यात आला. त्याअंतर्गत ज्ञानेश्वर हजारे, जयनाथ मेहता, संदीप पिसे, अजय करणवार आणि सुखदेव कुंभलकर या पाच लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्री यांच्या हस्ते व्हीलचेअर प्रदान करण्यात आल्या.
महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून हजारो नागरिकांनी विविध आरोग्यसेवांचा लाभ घेतला. गरजू रुग्णांवरील आवश्यक उपचार आणि शस्त्रक्रियांची प्रक्रिया पुढील टप्प्यात सुरू राहणार असून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहोचविण्याचा संकल्प या उपक्रमातून अधिक दृढ झाला आहे.
…………………………..

आमचे चॅनल subscribe करा