Homeनागपूर न्यूजमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त २६ जुलै रोजी भव्य महाआरोग्य शिबिर

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त २६ जुलै रोजी भव्य महाआरोग्य शिबिर

Advertisements

शिबिराची तयारी अंतिम टप्प्यात; हजारो नागरिकांसाठी निःशुल्क तपासणी व उपचारांची सुविधा

नागपूर, दि. २४ जुलै : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या रविवार, दि. २६ जुलै रोजी धनवटे नॅशनल कॉलेज आणि न्यू इंग्लिश हायस्कूल काँग्रेसनगर, नागपूर येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराची सर्व तयारी अंतिम टप्प्यात असून, नागरिकांना अधिकाधिक दर्जेदार आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती महाआरोग्य शिबिराचे मुख्य संयोजक तथा माजी आमदार संदीप जोशी यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत शिबिर-

रविवार, दि. २६ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत होणाऱ्या या महाआरोग्य शिबिरात २० ते २५ हजार नागरिकांची आरोग्य तपासणी व आवश्यक उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व तपासण्या, वैद्यकीय सल्ला आणि उपचार पूर्णपणे निःशुल्क असतील.

५०० हून अधिक तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा-

महाआरोग्य शिबिरात मेडिसीन, त्वचारोग, बालरोग, शल्यचिकित्सा, अस्थिरोग, स्त्रीरोग व प्रसूती, कान-नाक-घसा, नेत्ररोग, न्यूरॉलॉजी, हृदयविकार, पोटविकार, कर्करोग आदी विविध शाखांतील ५०० हून अधिक तज्ज्ञ डॉक्टर नागरिकांना सेवा देणार आहेत. तसेच आवश्यकतेनुसार पुढील तपासण्या, उपचार व शस्त्रक्रियांसाठी शासकीय योजनांअंतर्गत निःशुल्क मार्गदर्शन व कार्यवाही करण्यात येणार आहे.

फडणवीस, गडकरींसह मान्यवरांची उपस्थिती-

या महाआरोग्य शिबिराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाचे राष्ट्रीय संघटन मंत्री शिवप्रसादजी यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे विदर्भातील खासदार, आमदार आणि पदाधिकारी भेट देणार आहेत.

नागरिकांसाठी पार्किंगची विशेष व्यवस्था-

शिबिराला मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन होमगार्ड प्रशिक्षण केंद्र, दीनानाथ हायस्कूल आणि इंडियन जिमखाना येथे वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संदीप जोशी यांनी केले.

पूर्वतयारी शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद-

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५ ते १५ जुलै या कालावधीत पश्चिम नागपूर, दक्षिण पश्चिम नागपूर, दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रात विविध भागांत ६९ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये ३१,७४० नागरिकांची आरोग्य तपासणी, ४,४६३ रक्त तपासण्या तसेच २,६४१ आभा व आयुष्मान भारत कार्डांची नोंदणी करण्यात आली.

या शिबिरांमध्ये जनरल मेडिसीन, बालरोग, स्त्रीरोग, कान-नाक-घसा, नेत्ररोग, दंतरोग, शल्यचिकित्सा, अस्थिरोग, हृदयरोग तपासणी, ईसीजी, आभा कार्ड व आयुष्मान भारत नोंदणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच एक्स-रे, सीटी स्कॅन, एमआरआय, अँजिओग्राफी, नेत्र, रक्त व मूत्र तपासणी तसेच आवश्यक उपचार व शस्त्रक्रिया शासकीय योजनांअंतर्गत निःशुल्क उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

पत्रपरिषदेला शिबिराचे संयोजक माजी आमदार तथा माजी महापौर संदीप जोशी यांच्यासह सहसंयोजक रितेश गावंडे, सहसंयोजक विनोद कन्हेरे, सहसंयोजक रितेश पांडे, मंडळ अध्यक्ष प्रा. दिलीप दिवे (सुभाष नगर), महेंद्र भुगावकर (नरेंद्र नगर), ईश्वर ढेंगळे (त्रिमूर्तीनगर), विनोद शिंदे (धंतोली), विनय दाणी (धरमपेठ), विनोद बघेल (सुरेंद्रगड), अमर खोडे (झिंगाबाई टाकळी), शशांक खेकरे (जानकी मंडळ), किरण दातीर (हनुमान मंडळ) आणि प्रकाश यादव (अयोध्या मंडळ) उपस्थित होते.

Latest बातम्या