Homeनागपूर न्यूजमुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त रामनगर येथे भव्य श्री लक्ष्मी-नृसिंह महायज्ञ

मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त रामनगर येथे भव्य श्री लक्ष्मी-नृसिंह महायज्ञ

Advertisements
सर्व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

नागपूर, दि. २० : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिवसानिमित्त बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी श्रीराम मंदिर प्रांगण व क्रीडांगण, रामनगर, नागपूर येथे भव्य श्री लक्ष्मी-नृसिंह महायज्ञ आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाची माहिती मुख्य आयोजक तथा माजी आमदार (विधान परिषद) संदीप जोशी यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी संदीप जोशी म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच स्वतःचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यावर भर दिला आहे. त्यांच्या जनहितवादी, विकासाभिमुख आणि लोककल्याणकारी कार्यातून प्रेरणा घेत त्यांचा वाढदिवस सेवा, सामाजिक समरसता आणि लोककल्याणाचा संदेश देणाऱ्या उपक्रमांद्वारे साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत भगवान श्री लक्ष्मी-नृसिंह यांच्या कृपाशीर्वादाने त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, अखंड कार्यशक्ती लाभावी तसेच त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली महाराष्ट्र अधिक वेगाने प्रगतीपथावर वाटचाल करावा, या पवित्र भावनेतून या महायज्ञाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

या महायज्ञात समाजातील सर्व जाती, धर्म, पंथातील नागरिक, विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक व धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच सर्वसामान्य भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, सामाजिक समरसता, राष्ट्रीय एकात्मता आणि लोककल्याणाचा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे. कार्यक्रमाला सुमारे पाच ते सात हजार भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा असून सर्वांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. या धार्मिक आणि सामाजिक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध मंदिर ट्रस्ट, धार्मिक संस्था, सामाजिक संघटना तसेच दानशूर नागरिकांकडून शिधा स्वरूपात सहकार्य मिळत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

महायज्ञाची तयारी अंतिम टप्प्यात असून कार्यक्रमस्थळी मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे. बुधवार, दि. २२ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत श्री लक्ष्मी-नृसिंह महायज्ञ, त्यानंतर दुपारी १२ वाजता महाआरती व लगेच महाप्रसादाचा कार्यक्रम श्रीराम मंदिर प्रांगण व क्रीडांगण, रामनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. सर्व नागरिकांनी आपल्या कुटुंबीय, मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांसह उपस्थित राहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि महाराष्ट्राच्या सुख-समृद्धीसाठी आयोजित या सामूहिक प्रार्थनेत सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य आयोजक माजी आमदार तथा माजी महापौर संदीप जोशी व आयोजन समितीने केले आहे.

पत्रपरिषदेला सहसंयोजक किसन गावंडे, आशिष पाठक, यश सातपुते यांच्यासह आयोजन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

………………………………………….

Latest बातम्या