नागपूरच्या डागा रुग्णालयातील घटना

बाळ दगावले!आई मानसिक धक्क्यात!
डागाचे अधिष्ठाता डॉ.मडावी यांचा ‘हसून’ नकार
नागपूर,ता.३० एप्रिल २०२६: अवघ्या दीड वर्षां पूर्वी लग्न झालेल्या पत्नीला मातृत्वाचे सुख लाभणार होते.आपल्या गर्भात कलाकलाने घडणा-या,त्याची स्पंदने ऐकणा-या या मातेला याची कल्पनाच नव्हती,सरकारी आरोग्य व्यवस्था नावाची मुर्दाड,असंवेदनशील व बोजड नोकरशाही तिच्या मातृत्वाचाच गळा क्रूरतेने घोटण्यासाठी सज्ज झाली आहे!
मंगळवार दिनांक २८ एप्रिल रोजी सकाळपासून तिला प्रसुती कळा सुरु झाल्या.सकाळी ११ वाजताच्या सुमारास तिच्या पतीने सुरेंद्र बनोदे याने तिला गांधी बाग स्थित डागा मोमोरियल गव्हर्नमेंट हॉस्पीटल(Daga Memorial Goverment Women Hospital) रुगण्यालयात भर्ती केले.दिवसभर ती प्रसुती वेदनेने विव्हळत होती मात्र,अखेर रात्री आठ – नऊ वाजताच्या सुमारास तिला लेबर रुममध्ये घेण्यात आले.
असं म्हणतात,बाळंतपण हा स्त्रीचा दुसरा जन्मच असतो.एक नवसृजन जगात अाणताना तिच्या मानसिक,शारीरिक आणि भावनिक धैर्याचा कस लागत असतो,अशा वेळी तिला सर्वात जास्त गरज असते आपल्या डॉक्टर,परिचारिका व तिचे बाळंतपण सुखरुप करुन देणा-या स्टाफच्या दोन धीराच्या शब्दांची.मात्र,हे सगळं खासगी रुगण्यालातच घडत असतं,सरकारी रुग्णालयात नाही. प्रसव वेदनेने विव्हळत असणा-या या मातेच्याही वाट्याला सरकारी असंवेदनशीलताच आली.
लेबर रुममध्ये तिला अर्वाच्य शिवीगाळ सुरु होती जणू लग्नं करणे व मूल जन्माला घालणे हा फार मोठा अपराध तिने केला होता.मूळात गलेलठ्ठ पगार घेणा-या सरकारी डॉक्टर्स व कर्मचा-यांना तो पगार कोणत्या कामासाठी किंबहूना कर्तव्य बजावण्यासाठी मिळतो?याचाच अलीकडे विसर पडला आहे.सरकारी पद मिळालं म्हणजे वाट्टेल तसं वागण्याचा, इतरांना शिवीगाळ करण्याचा त्यांना सरकारी परवानाच जणू मिळत असतो.
या पिडीतेला लेबर रुममध्ये घेतल्यानंतर अघटित घडले.डागा रुगण्यातली एक ‘मावशी’या पिडीतेच्या चक्क छातीवर बसली व तिला जबरदस्ती कळा येण्यासाठी तिच्या घुडग्यांनी जोर देऊ लागली तर दूस-या कर्मचा-याने ज्याला ब्रदर संबाेधत होते, तिच्या बाळाला अमानवीय पद्धतीने बाहेर काढत होता!यात ही ती मावशी सतत अतिशय घाणेरडं त्या पिडीतेला बोलत होती,’किती माणसांसोबत झोपली?
एका सरकारी रुग्णालयाच्या लेबर रुममध्ये हा अतिशय अमानविय प्रकार ती माता सहन करत होती,फक्त आपल्या बाळासाठी.तिचं बाळ सुखरुप जगात येईल,तिच्या कुशीत शिरेल,नऊ महिनांच्या तिच्या सोबत एकरुप झालेली त्याची स्पंदने आता प्रत्यक्ष तिच्या ओंजळीत येणार होती परंतू….या सर्व क्रोर्याने ते बाळ मृत पावले जणू,…हे जग अतिशय व्यवहारी,अमानवीय आणि क्रूर असल्यामुळे अश्या जगात मलाच यायचे नाही,असा त्या बाळाचा निर्धार असावा अन् त्याने कायमचे डोळे मिटले…!
पिडीतेच्या पतीने सुरेंद्र बनोदे यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत डागा रुग्णालायचे अधिष्ठाता डॉ.मडावी व कर्मचा-यांवर अतिशय गंभीर आरोप केले.सकाळी ११ पासून रात्रीच्या ८-९ पर्यंत पत्नी वेदनेने विव्हळत असताना,तिला तातडीचे उपचार मिळालेच नाहीत.यानंतर पिडीतेच्या नातेवाईकांनी भरपूर विनवणी केल्यानंतर आठ-नऊ तासांनंतर,पिडीतेवर ‘उपकार’करीत तिला लेबर रुममध्ये नेण्यात आले परंतू, तिथे ही जणू मावशी नावाची ‘यमदूत’पिडीतेच्या छातीवर चढून बसली…आपल्या घुडग्याने जोर देऊन चुकीच्या पद्धतीने तिला जबरदस्ती बाळंत होण्यासाठी प्रयत्न करु लागली,तिच्या साडीचा पदर घामाघूम झालेल्या पिडीतेच्या तोंडावर येत असल्याने,ती आणखी जास्त घाबरली,पदर बाजूला करण्याची विनंती करु लागली मात्र, त्या मावशीच्या ताब्यात जणू संपूर्ण लेबर रुमच नव्हे तर डागा रुग्णालयाचाच कारभार असावा, इतक्या वाईट पद्धतीने ती पिडीतेला धीर देण्या ऐवजी घाणेरड्या शिव्या हासडत होती….!
त्या बाळंतणीचे सगळे रिपोर्ट्स हे नॉर्मल होते.डागा रुग्णालयातील अधिष्ठाता,डॉक्टर व स्टाफने योग्य कर्तव्य बजावले असते तर कदाचित ते बाळ जिवंत असतं.मात्र,दररोज शेकडो बाळंतपण करणा-या सरकारी कर्मचारी व अधिका-यांच्या संवेदना, या इतक्या नाजूक मानवीय भावना व जिविताशी जुळलेल्या प्रक्रियेबाबत, ‘बोथट’झालेल्या आहेत,ही घटना हे सिद्ध करते.त्यांची मानसिकताच,‘गरिबांना आणि ’नाही रे’वर्गाला’जगण्याचा अधिकार नाही,अशी बनली आहे…!
बाळंतपणानंतर पिडीतेने लेबररुममधला घटनाक्रम पतीला सांगितल्यानंतर त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठले.पतीने रात्री ११ वा.प्रभाग क्र.८ चे काँग्रेसचे नगरसेवक वसीम खान यांना फोन लावला व ढसाढसा रडला.मुर्दाड,संवेदनाशून्य व्यवस्थेने माझ्या बाळाची हत्या केली,असे ते रडताना सांगत होते.वसीम खानने रात्री डागा रुग्णालय गाठले, त्यांच्यासोबत जाऊन तक्रार नोंदवली.यावर पीएसआयने यावर अाधी चौकशी होईल,असे उत्तर दिले.
अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी देखील डागा रुग्णालयाच्या स्टाफ,परिचारिका,कर्मचारी,ब्रदर्स यांच्याविषयी तक्रारी सांगितल्या.येथील स्टाफ हा रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना नेहमीच शिवीगाळ करतो,त्यांना धक्के मारतात,अनेक प्रसंग असे डागा रुग्णालयात घडले आहेत.
वसीम खान याने अधिष्ठाता यांना या घटनेविषयी विचारले असता,त्यांनी अगदी ‘हसत-हसत’,असे काही या रुग्णालयात घडत नाही असे उत्तर दिले!त्यांच्या उत्तरदायित्वाखाली एक नवजात बाळ दगावले,एका मातेचे स्वप्नं भंगले,ती कोलमडली,बाबा होऊ पाहणारा पती सैरभैर झाला,मात्र याचे कोणतेही गांर्भीर्य डॉ.मडावी यांच्या बोलण्यात नव्हते,असा आरोप वसीम खान व नावेद सौदागर यांनी केला.नातेवाईकांच्या आक्रोशानंतर त्या मावशीला स्टाफने आधी बाथरुममध्ये लपवले,यानंतर तिला एका वॉर्डातील खोलीत लपवून ठेवण्यात आल्याचा आरोप पिडीतेच्या नातेवाईकांनी केला.
सरकारी खाक्याप्रमाणे त्यांनी अशी कोणती घटना घडलीच नसल्याचे.सांगून पल्ला झटकला.माध्यमकर्मींनी त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच कित्ता गिरवला.२०१४ पासून मोदी यांनी एक ही पत्रकार परिषद घेऊन देशातील नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर दिलेले नाही,अनेक वाहिन्यांना सुनियोजित ‘मुलाखती’तेवढ्या दिल्या,दूसरीकडे माजी पंतप्रधान मनमाेहन सिंह हे पत्रकारांच्या खोचक प्रश्नांनाही संयतपणे सामोरे जात होते.नुकतेच एका पुस्तक प्रकाशन समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘ज्याचा राजा व्यापारी त्याची जनता भिकारी’अशी मिश्किली केली होती.डॉ.मडावी यांनीही माध्यमकर्मींशी मी बोलणार नाही माझ्या असिसटेंटशी बोला म्हणून टोळवले!असिसटेंट म्हणाली,मी का बोलू?तुम्ही डॉ.मडावी यांच्याशीच बोला!या कृतीतून त्यांची व्यापारी नव्हे तर ‘सरकारी’वृत्ती दिसून पडली.
पिडीतेचे नातेवाईक व नगरसेवकाने सातत्याने दबाव टाकल्याने रात्री अडीच वाजता डागा रुग्णालयात बैठक झाली व रुग्णालयाच्या प्रशासनाने चूक झाली हे मान्य केले…..!दोषींवर कठोर कारवाई,पिडीतेला योग्य मोबदला,संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व भविष्यात अश्या घटनांची डागामध्ये पुनर्रावृत्ती थांबवणे,अशी मागणी वसीम खान यांनी केली आहे.
आज ती ओली बाळंतीण प्रसवानंतरच्या शारीरिक व मानसिक सर्व पिडा भोगत आहे,स्त्री… ज्या सृजनाला प्रसव वेदना सहन करुन जन्म देते,तो तिच्या काळजाशी असल्यानंतर जगातील प्रत्येक स्त्री ,त्या वेदना विसरुन त्या बाळाच्या अस्त्विाशी एकरुप होते,या पिडीतेकडे तिच्या पलंगाच्या शेजारी असलेल्या रिकाम्या लोंखडी पाळण्याकडे उधवस्त होऊन बघत राहण्याशिवाय काहीही नाही…!त्याच वॉर्डात इतर बाळंतिणीं त्यांच्या नवसृजनाच्या सानिध्यात खोलवर सुखावल्याचे दृष्य,पिडीतेच्या घायाळ ह्दयाला रक्तबंबाळ करीत आहेत….!
एकीकडे संपूर्ण राज्य सांभाळणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच जन्म व कर्मभूमीत एका मातेसोबत पराकोटीचे ‘सरकारी’क्रोर्य घडले,याची जबाबदारी घेऊन डागा प्रशासनावर,आरोग्य मंत्र्यांच्या पुढाकारातून कठोर कारवाई होईल का?याकडे आता समस्त नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.
(बातमीशी संबंधित व्हिडीयोज Sattadheesh official युट्यूब चॅनलवर उपलब्ध)
………………………………………………..