Advertisements

बाजार विभागाने वाटले हजार रुपयात अवैध हॉकर्स परवाने!
नागपूर,ता. २१ मार्च २०२५: सोमवार दिनांक १७ मार्च रोजी नागपूरकरांनी कधी नव्हे अशी दोन गटात झालेली दंगल अनुभवली,पोलिसांवर देखील हल्ले झाले,तीन उपायुक्त दर्जाचे पोलिस अधिकारी जखमी झाले,महिला पोलिसाचा विनयभंग झाला,त्यांना निर्वस्त्र करण्याचा हिंसक जमावाने प्रयत्न केला,शेकडो गाड्यांना आग लावण्यात आली,शेकडो घरांवर दगडफेक झाली,अनेक दुकानांची तोडफोड करण्यात आली,या सर्वाला कारणीभूत ठरले ‘बाहेरुन’आलेले दंगलखोर.
कोणत्याही शहरात बनावट ओळखपत्रांच्या आधाराने आश्रय घेऊन नंतर शिरजोर होण्याचा इतिहास फार जुना नाही.बनावट जन्मदाखले व आधारकार्ड यांची बातमी राज्यात गाजतेय.अशात ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर शहराची प्रशासन व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी आहे,त्याच संस्थेचा एक विभाग खोटे व बनावट परवाने वाटप करण्याची बाब घडत असेल, तर त्या शहरात अशी दंगली होण क्रमप्राप्तच आहे.
मनपाच्या बाजार विभागातील काही कर्मचा-यांकडून फूटकळ विक्रेत्यांना महापालिकेचा होलोग्राम असलेले नोंदणी प्रमाणपत्र एक हजार रुपये घेऊन विकण्याचा धक्कादायक प्रकार काही प्रसार माध्यमांनी समोर आणला आहे.
महत्वाचे म्हणजे बाजार विभागाकडून परवानाधारक विक्रेत्यांची नोंदणी २०१७ मध्येच बंद करण्यात आली आहे!असे असतानाही बाजार विभागातील काही कर्मचा-यांकडून विक्रेत्यांना महापालिकेचा होलोग्राम असलेले नोंदणी प्रमाणपत्र एक हजार रुपयात विकण्याचा घोटाळा उघडकीस आला आहे.या प्रकारे प्रमाणपत्र देण्यासाठी महापालिकेकडे असलेल्या डेटाबेसचा वापर होत असल्याची माहिती समोर आली आहे.
हे प्रमाणपत्र राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियाना अंतर्गत देण्यात येत आहे.महापालिकेने या प्रकारचे प्रमाणपत्र देणे २०१७ मध्येच बंद केले आहे.असे असताना अगदी तसेच प्रमाणपत्र महापालिकेचे अधिकृत होलोग्राम व शिक्यासह देण्यात येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नुकतेच घडलेल्या दंगलीनंतर नागपूरकरांच्या सुरक्षेसाठी हे हॉकर्स परवाने खरे आहे की बनावट याचा तपास होणे गरजेचे आहे.
बनावट परवाने वाटपाचा हा प्रकार बुधवारी झालेेल्या टाऊन व्हेंडिंग कमेटीच्या बैठकीत समोर आला.मनपा आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.बैठकीत समितीचे सदस्य कौस्तव चॅटर्जी यांनी हा मुद्दा उपस्थित केला.जे प्रमाणपत्र महानगरपालिकेने देणे बंद केले ते एक हजार रुपयात हॉकर्संना कसे मिळत आहे?अशी विचारणा त्यांनी केली.विषयाचे गांर्भीय ओळखून मनपा आयुक्तांनी महसूल विभागाचे उपायुक्त मिलिंद मेश्राम यांना या प्रकारची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.मनपाच्याच एका विभागातील अधिकारी किवा कर्मचा-यांच्या विरोधात मनपाच्याच एका अधिका-याची चौकशी कितपत पारदर्शी राहील,याकडे आता नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.
नागपूरात घडलेल्या दंगलीनंतर बाह्य घटकांकडून नागपूरकरांच्या सुरक्षेची फार गांर्भीयाने स्थानिक प्रशासनाने दखल घेण्याची गरज असताना,प्रशासनातील काही भ्रष्ट कर्मचारीच शहराची सुरक्षा अशी वेशीवर टांगत असतील तर याची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेणे गरजेचे आहे,असे येथील दंगलपिडीत सांगतात.
बाजार विभागाच्या ज्या अधिकारी किवा कर्मचा-यांवर अशा एका विशिष्ट गटाच्या हॉकर्सना हजार रुपये घेऊन मोठ्या प्रमाणात परवाने देण्यात आले आहे,त्याची चौकशी करुन दोषींवर कारवाई करणार का?असा सवाल आज मनपाचे बजेट सादर झाल्यानंतर आयुक्तांना विचारला असता,टाऊन व्हेडिंग कमेटीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येईल,असे उत्तर त्यांनी दिले.हॉकर्सच्या वेगवेगळ्या प्रतिनिधींसोबत चर्चा करु,असे सांगून आयुक्तांनी हा महत्वाचा प्रश्न टाळला.
महत्वाचे म्हणजे,बुधवारी पार पडलेल्या हॉकर्स व्हेंडिंग कमेटीच्या बैठकीवर सीताबर्डी मुख्य रस्त्यावरील विक्रेत्यांनी बहिष्कार टाकला!या विक्रेत्यांना महाराजबागच्या मागच्या भागातील रस्त्यावर स्थानांतरित करण्याचा मुद्दा या बैठकीत चर्चिला जाणार होता,मात्र,त्यांनी बैठकीवरच बहिष्कार टाकला!या हॉकर्सच्या विरोधात सीताबर्डीतील दूकानदार यांनी न्यायालयात दाद मागितली आहे.वाहतूक व्यवस्थेच्या प्रश्नावर वाहतूक पोलिसांनी देखील सीताबर्डी येथील हॉकर्स झोनला न्यायालयात विरोध केला आहे,हे विशेष.
बर्डी येथील सोनचाफ्यातील गल्लीत एका इमारतीतील दोन मजल्यावरील गाळे विकत घेऊन हॉकर्स आपला उदरनिर्वाह करतात,हा संपूर्ण माल रात्री पुन्हा त्याच गाळ्यात ठेवल्या जातो असे येथील एका दूकानदाराने सांगितले.त्यामुळेच बर्डीसारखा रहदारीचा भाग सोडून येथील हॉकर्स इतरत्र व्यवसाय करु इच्छित नाही.मनपा आयुक्तांच्या हॉकर्स व्हेडिंग कमेटीच्या बैठका या केवळ न्यायालयाच्या डोळ्यात धूळफेक असल्याचा संताप ते व्यक्त करतात.महत्वाचे म्हणजे त्याच गल्लीत मनपाच्या नाकावर टिच्चून,अवैधरित्या वाहनधारकांकडून मोठ्या प्रमाणात पार्किंगचे पैसे वसूल केले जातात,याकडे ही त्यांनी लक्ष वेधले.
बनावट हॉकर्स परवाने या विषयाला घेऊन,नागपूरकरांच्या सुरक्षेच्या संदर्भात ज्यांनी दंगलीच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कठोर कारवाईची मागणी केली त्या भाजपचे मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांच्याशी संपर्क साधला असता,होऊ शकला नाही.
……………………………………..
Advertisements

Advertisements

Advertisements
