पत्रकार परिषदेत विष्णू मनोहर यांना अश्रू अनावर

सायबर सेलकडून अद्याप दिलासा नाहीच:अमेरिकेतील मेक्सीकन सिटीच्या हॅकर्सची करामात
रेसिपींमध्ये मानवी अंगांचे अश्लील भाग घूसवले
साढे चार लाख सबस्क्राबर्सपैकी दहा दिवसात एक लाखांच्या वर सबस्क्राबर्सने केले विष्णू मनोहर यांच्या फेसबूक पेजला ‘अनफॉलो’
अकाउंटला असलेली लिंक कोणी क्लिक करू नये: विष्णू मनोहर यांचे आवाहन
नागपूर,ता १० मार्च २०२५: प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचे ‘मास्टर रेसिपी ’फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आले असून त्याद्वारे अश्लिल व्हीडिओ पोस्ट केले जात आहेत. विष्णू मनोहर यांनी सायबर क्राईम विभागाकडे तसेच फेसबुक व्यवस्थापनाला यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. आज सोमवारी विष्णू मनोहर यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात प्रसार माध्यमांना ही माहिती दिली.
मागील ३५ वर्षापासून पाककला क्षेत्रात विष्णू मनोहर कार्य करीत असून त्यांचे मास्टर रेसिपी युट्यूब चॅनेल देखील आहे. या चॅनेलवरून ते विविध मराठी पाककृतींचे व्हिडीओ पोस्ट करत असतात. याशिवाय, फेसबुकवर या चॅनेलच्या पेजवर दररोज चार नवीन रेसिपीचे व्हिडिओ पोस्ट केले जातात. विष्णू मनोहर म्हणाले, विविध पदार्थ तयार करण्याचे कौशल्य दर्शकांना आत्मसात करता यावे तसेच, मराठी खाद्य संस्कृती लोकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने आम्ही हे चॅनेल सुरू केले आहे. या माध्यमातून मराठी पदार्थांचा प्रचार व प्रसार व्हावा, हा आमचा उद्देश आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे यातून कुठलाही आर्थिक नफा नसतो.
पण, कोणीतरी माझे फेसबुक अकाऊंट हॅक केले असून त्याद्वारे अश्लिल व्हिडीओ पोस्ट करत आहे. असा प्रकार यापूर्वीही घडला असून त्यावेळी देखील अमेरिकेतील मेक्सीकोतूनच माझा फेसबुक पेज हॅक करण्यात आला होता मात्र,त्यावेळी मॅसेज पाठवून मला ‘बिटकॉईन‘ची मागणी करण्यात आली होती,मी हॅकर्सला कोणतेही पैसे दिले नाही व सहा महिन्यात माझा पेज हॅकर्सच्या तावडीतून सोडवण्यात यश मिळाले होते.
मात्र,मागील दहा ते बारा दिवसांपासून पुन्हा एकदा मॅक्सीकोतून,माझा फेसबुक अकाऊंट हॅक झाला असून यावेळी त्यात अश्लील व्हिडीयो अपलोड करण्यात आले आहेत.प्रत्येक रेसिपीसोबत मिळते जुळते मानवी अंगांचे अश्लील व्हिडीयोज त्यात अपलोड केल्याने माझ्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे.अत्यंत परिश्रमातून मी साढे चार लाखांच्या जवळपास सबस्क्राबर्स मिळवले होते मात्र,गैरसमजातून गेल्या दहा दिवसातच एक लाखांच्या वर सबस्क्राबर्य यांनी माझा फेसबुक पेज ‘अनफॉलो’केल्याचे सांगताना त्यांचे अश्रू अनावर झाले.अनेक सबस्क्राबर्स हे सुजाण आहेत ज्यांना कळले की माझ्या फेसबुक पेजसोबत काहीतरी गडबड झाली आहे मात्र,ज्यांना डिजिटल क्राईमविषयी अधिक माहिती नसते त्यांना खरोखर मी ते अश्लील व्हिडीयोज टाकले असा संशय आल्याने मला त्यांचे खडे बोल ही ऐकावे लागले,अशी व्यथा पत्रकार परिषदेत विष्णु मनोहर यांनी मांडली.
माझी सर्वांना अशी नम्र विनंती आहे की, मला मदतच करायची असेल तर हेल्प मास्टर रेसिपी मधे जाऊन तुम्ही कंप्लेंट करू शकता शिवाय कोणतेही टोकाचे पाऊल न उचलता त्यांनी फेसबुकला त्यासंदर्भात तक्रार करावी. अकाउंटला असलेली लिंक कोणी क्लिक करू नये अन्यथा तुमचे पण अकाउंट हॅक होईल, असे त्यांनी आवाहन केले आहे.सायबर सेलकडे तक्रार दिली असून अद्याप त्यांना यश मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले.सायबर क्राईमचे अपराधी शोधून काढणे,ते देखील इतर देशातले हे अवघड काम असून यात भरपूर वेळ लागत असतो,अशी पुश्ती देखील त्यांनी जोडली.पत्रकार परिषदेत विजय जथे उपस्थित होते.
(बातमीशी संबंधित व्हिडीयो Sattadheesh official वर उपलब्ध)
……………………………………..
तळटीप:-
एकेकाळी मोदी नंबर-३ मध्ये आपल्या कुटूंबियांसोबत वास्तव्यास असणारे विष्णू मनोहर यांनी अत्यंत हलाकीच्या परिस्थितीतून मार्ग काढून,कठोर परिश्रमातून जगभरात आपल्या अनोख्या पाकशास्त्रकलेतून प्रतिष्ठा मिळवली आहे.अनेक पुरस्कार व सन्मान त्यांना मिळाले असून अनेक विश्वविक्रम त्यांच्या नावाने नोंदवले गेले आहे.दरवेळी विश्व विक्रमासाठी रेसिपीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेणा-या विष्णू मनोहर यांना अश्या घटनेसाठी पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली याचे अत्यंत वाईट वाटत होते.जी कृती त्यांच्या हातून घडली नाही त्यासाठी समाज-मनात त्यांच्या विषयी गैरसमज निर्माण होऊन कठोर परिश्रमातून कमावलेल्या प्रतिष्ठेलाच धक्का बसण्याची वेदना त्यांच्या चेह-यावर साफ झळकत होती…!