फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमगडकरींच्या ड्रीम प्रोजेक्टची झाडे कापणारा ताब्यात..

गडकरींच्या ड्रीम प्रोजेक्टची झाडे कापणारा ताब्यात..

Advertisements

 

शेकडो झाडांची कत्तल करणारे राजकीय पक्षांशी संबंधित!
पर्यावरणप्रेमींचा संताप:आमदार व राजकीय पक्षांमुळेच कंत्राटदार मुजोर
आरोपीवर कठोर कारवाईची मागणी अन्यथा तीव्र आंदोलन:पर्यावरणवाद्यांचा इशारा
जाहिरात एजंसीधारकाला अटक: कंत्राट देऊन झाडे कापली
गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून अटक:शहरातील इतर झाडांचे काय?पर्यावरणवाद्यांचा खडा सवाल
नागपूर,ता.१ फेब्रुवरी २०२५: जाहीरातींचे फलक दिसत नसल्याने हिंगणा टि-पॉईंट ते कळमनापर्यतच्या दोन किलोमीटर परिसरातील शेकडो झाडांची दोन दिवसांपूर्वी कत्तल केल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून ,आरोपीच्या या कृत्याचा तीव्र निषेध शहरातील पर्यावरणवादी करीत आहेत.या संबंधी प्रताप नगर पोलिसांनी आज एका जाहीरात एजंसीधारकाला अटक केली असून तो उद्यान मित्रही असल्याचे समोर आले आहे!या रस्त्यावरील ४१० अशोकाची तसेच १५१ पामची झाडे ही किमान वीस फूटांपर्यत उंच झाली होती,त्यांना एका रात्रीतून छाटून अगदी चार फूटांपर्यंत करण्यात आल्याने अतिशय सुंदर रस्ता आता पूर्णत: बोडखा झाला आहे.आरोपी विश्‍वजीत वैरागडे या जाहीरात एजंसी धारकाच्या या कृत्यावर संपूर्ण शहरात चांगलाच संताप निर्माण होत आहे.
महत्वाचे म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हा ड्रीम प्रकल्प होता.हिंगणा टी पॉईंट ते कळमनापर्यंत शहरामधील या भागातील दूभाजकांवर उंचपुरी झाडे लावून हा भाग हिरवागार करण्याचा त्यांनी सुतोवाच केला होता.या अनुषंगाने चार वर्षांपूर्वी संपूर्ण दूभाजकांवर अशोका व पामची झाडे रोवण्यात आली होती.चार वर्षात वीस-वीस फूटांपर्यंत उंच झालेल्या झाडांची कोणत्याही परवानगी शिवाय वैरागडे या आरोपीने उद्दामपणे कंत्राटदाराला कंत्राट देत कापण्यास सांगितले.कंत्राटदाराने देखील मनपाच्या उद्यान विभागाची किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाची परवागनी आहे कींवा नाही,याची शहनिशा न करता मजूर लाऊन एवढ्या लांब किलोमीटरपर्यंची हिरवीगार झाडे कापून फेकली,यामुळे पर्यावरणवाद्यांमध्ये चांगलाच संताप असून,जाहिरातदार एजंसीधारक व कंत्राटदार हे सत्ताधारी राजकीय पक्षाशी किंवा आमदारांशी संबंधित असल्यानेच नियमांना धाब्यावर बसवून, एवढा उद्दामपणा दाखवू शकतात,असा सरळ आरोप आता केला जात आहे.
रिंगरोडवरील झाडे ही गडकरी संकल्पित होती त्यामुळेच चोवीस तासात पोलिसांनी तत्परता दाखवून आरोपीला अटक केली मात्र,आम्ही शहरभरातील झाडे वाचवण्यासाठी अहोरात्र व्यवस्थेसोबत लढतो,तक्रारी नोंदवतो,आपापले कामधंदे बाजूला सारुन सुनावणीला हजर राहतो परंतू एवढ्या तातडीची दखल कोणतीही शासकीय संस्था त्या झाडांसाठी घेत नाही,ही झाडे देखील गडकरींच्या स्वप्नातील प्रकल्पाची नसती तर पोलिस विभाग असो किवा मनपा,पीडब्ल्यूडी एवढ्या तत्परतेने आरोपीला अटक केली असती का?असा सरळ सवाल ते करतात.
राणाप्रताप नगर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम ३२४ लावण्यात आले असून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंतधक अधिनियमांतर्गत ८,२१ तसेच महाराष्ट्र वृक्ष जतन कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांनी दिली.तक्रार क्रमांक ३५/२४ असून सीसीटीव्ही फूटेजद्वारे ६ आरोपींचा शोध घेण्यात आला होता अशी माहिती त्यांनी दिली.यातील पाच आरोपी हे मजूर असून विश्‍वजीत जगदीश वैरागडे हा मुख्य आरोपी असल्याचे ते सांगतात.वैरागडे याची जाहीरात एजंसी असून इलेक्ट्रीक खांबांवर त्याने जाहीराती लावल्या होत्या मात्र,अशोका व पामच्या झाडांमुळे त्याच्या जाहीरातींवर नजर जात नसल्याने त्याने कोणत्याही परवागनी शिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात हिरव्यागार झाडांवर सरळ कु-हाड चालवली.मजूरांच्या बयाणावर आरोपीला अटक केली मात्र,हा जामीनपात्र गुन्हा असल्याने कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती त्यांनी दिली.

अजनी असो किवा मानकापूर,जिल्हाधिकारी कार्यालय असो किवा शासकीय मेडीकल कॉलेज,गेल्या काही वर्षात शहरातील अनेक ‘राजकीय पुरस्कृत प्रकल्पांसाठी’लाखो झाडांची कत्तल सुरु आहे.महामेट्रो व सिमेंट रोडपासून या विनाशाला सुरवात झाली ती कुठेही थांबवण्यास तयार नसल्याची खंत ते व्यक्त करतात.आमचा विरोध कोणत्याही विकासाला किवा प्रकल्पाला नसून शेकडो वर्ष जुनी झाडे वाचवून प्रकल्पांची आखणी करण्याची आमची मागणी आहे.झाडे ही शहरातील फूफ्फूसे असून अशाच रितीने इतक्या झपाट्याने त्यांची कत्तल होत राहीली तर नागपूर शहर हे लवकरच देशाची राजधानी दिल्ली होईल,अशी आशंका ते व्यक्त करतात.

गडकरी यांनी स्वत: त्यांना दिल्लीचे हवामान मानवत नसल्याचे सांगून लवकर नागपूरात येण्याची ईच्छा होत असल्याचे आपल्या एका भाषणात व्यक्त केली होती.गडकरींच्या त्याच नागपूर शहरात लाखोच्या संख्येने हिरवीगार वृक्षवल्ली विविध प्रकल्पांच्या नावाखाली नष्ट होत असेल तर आता गडकरी शुद्ध हवामानासाठी कोणत्या शहरात वास्तव्यास जातील?असा सरळ सवाल ते करतात.
(बातमीशी संबंधित व्हिडीयो Sattadheesh official you tube वर उपलब्ध)
………………..
(भाग-२ वाचा)
वृक्ष तोडीवरुन न्यायालयाचे ताशेरे
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या