Advertisements

मकर संक्रातीला चायनीज मांजा अडकून मृत्यूच्या घटनांची या वर्षी देखील पुर्नरावृत्ती

(छायाचित्र: सीताबर्डी पोलिस ठाण्यातील जखमी महिला पोलिस शिपाई)
नागपूर,ता.१४ जानेवरी २०२५: संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशात चायनीज मांजा विक्री-खरेदीवर कायद्याने बंदी आहे. याचे उल्लंघन करणा-याला पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास व १ लाख रुपयांपर्यंत दंडाच्या कठोर शिक्षेची तरतूद आहे.चूर्ण,काच किंवा धातूसारख्या घातक पदार्थांनी लेपित कृत्रिम नायलॉन हा मनुष्य,पशु पक्षी,प्राणी व पर्यावरणासाठी अत्यंत घातक़ आहे. अश्या या नायलॉन मांजाला प्रतिबंध असतानाही या वेळी देखील मकर संक्रातीनिमित्त या मांजाची विक्री-खरेदी मोठ्या प्रमाणात झाली असून, हे पोलिस व मनपा प्रशासनाचे अपयश असल्याचा आरोप होत आहे.
आपल्या क्षणिक आनंदासाठी इतरांच्या जीवावर उदार झालेल्या पंतगबाजांमुळे नागपूरात आज १७ जण जखमी झाले. मेडिकल रुग्णालयात सर्वाधिक १० तर मेयो रुग्णालयात ७ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले.तर अनेकांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतल्याची माहिती समोर आली आहे.नायलॉन मांजामुळे कोणाचे कान,कोणाचे नाक,बोट तसेच हाताला जखम होऊन उपचारासाठी आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.महत्वाचे म्हणजे यात १० वर्षीय बालकापासून ७५ वर्षीय वृद्धांचा देखील समावेश आहे.१० वर्षांची ३ मुले नायलॉन मांजामुळे जखमी झाली आहेत.तिघांच्या बोटाला गंभीर जखम होऊन रक्तस्त्राव थांबत नसल्याने त्यांना रुग्णालयात आणण्यात आले.सुदैवाने यंदा मृत्यूची घटना नागपूरात घडली नाही मात्र,गेल्या वर्षी इमामवाडा पोलिस ठाण्यासमोरील सिग्नलवर गळ्यात मांजा अडकून तरुणाच्या मृत्यूची हळहळ यंदा देखील आठवणीच्या रुपात तितकीच भळभळली.
नागपूरात सीताबर्डी ठाण्यातील एका महिला पोलिस कर्मचारीच्या नाकाला आज मांजा कापून गेला,सुदैवाने जिवित हानी टळली.त्यांना तातडीने लता मंगेशकर रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. शीतल खेडकर असे या जखमी महिला पोलिस कर्मचा-याचं नाव आहे.दुचाकीवरुन ड्यूटीवर येत असताना नायलॉन मांजामुळे त्यांच्या नाकाला गंभीर दुखापत झाली.
१५ जानेवरी २०२३ रोजी(त्या वर्षी मकर संक्रात ही १५ जानेवरी रोजी होती) जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दूर्देवी घटनेत वेद साहू हा चिमूकला वडीलांच्या दुचाकीवर महात्मा गांधी शाळा येथून येत असताना रस्त्यात अचानक मांजा आला आणि त्याचा गळा कापला गेला.लगेच त्याला खासगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र,जखम गंभीर होती,मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने ११ वर्षीय वेद हा प्राणाला मुकला.कोणाचा तरी पंतग उडवण्याचा शौक पूर्ण झाला मात्र,एका जन्मदात्याला आपला ११ वर्षाचा चिमूकला कायमचा गमवावा लागला,त्या बापाच्या ह्दयावरची जखम ही कधीही न भरुन निघणारी असून,दर वर्षी मकर संक्रातीचा हाच दिवस त्या जखमेवरची खिपली निघते व वेदनेने तो बाप आज ही विव्हळतो.वेद महात्मा गांधी शाळेत पाचव्या वर्गात शिकत होता.त्या दिवशी नेहमीप्रमाणे वडील शाळेत त्याला घ्यायला आले,तो दुचाकीवर पुढे बसला होता.दोघेही घराच्या दिशेने निघाले होते.घरी आई वाट बघत होती….!मांजाने घात केला.त्याची श्वसन नलिका कापली गेल्याने त्याची प्राणज्योत मालवली होती.पुढच्याच महिन्यात २३ फेब्रुवरी रोजी त्याचा वाढदिवस हाेता.
धंतोलीत ध्रूव उर्फ प्रवीण धुर्वे(रा.कुंभार टोळी वस्ती,धंतोली)या दहा वर्षीय चिमुकल्याचे पंतगच्या मागे धावल्याने रेल्वेच्या धडकेत असाच दूर्देवी मृत्यू झाला होता.२०२३ मध्ये ही नागपूरात नायलॉन मांजाने दोन बळी जाऊन १७ जखमी झाले होते.
२०२२ पर्यंतच्या आकडेवारीत, १५ वर्षात नागपूरात नायलॉन मांजाने गळा कापल्याने ३८ निष्पाप लोकांचा बळी गेला आहे.३,५०० च्या आसपास लोक गंभीर व अतिगंभीर झाले याशिवाय ७५० वर प्राणि आणि १६०० पक्ष्यांनाही मांजामुळे आपला जीव गमावल्याचा अहवाल एका स्वयंसेवी संस्थेने प्रसिद्ध केला आहे.
एखाद्या शस्त्राप्रमाणे सजीवांवर घाव घालणा-या नायलॉन मांजावर ३० मार्च २०१५ रोजीच देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे.मात्र,शासन,प्रशासनाची उदासिनता,जानेवरी महिना आला तेव्हाच मांजा प्रतिबंधासाठी सुरु करण्यात आलेले कुचकामी प्रयत्न व पतंगबाजांचा हव्यास यामुळे नागपूरात ३८ तर राज्यात १८२ जणांचे प्राण गेले आहे.
नागपूरात तर पोलिस विभागाने या घटनांमुळे शहरातील सर्व १४ उड्डाणपूले आज वाहतूकीसाठी बंद केली होती.याशिवाय एका स्वयंसेवी संस्था व पोलिस विभागाच्या मदतीने अनेक दुचाकीस्वारांच्या गाड्यांवर पातळ तार बांधण्यात आले जेणेकरुन मांजा हा त्यात अडकून पडेल व वाहनचालकाच्या गळ्यापर्यंत पोहोचणार नाही!
महाराष्ट्रात गेल्या पाच दिवसांमध्ये या प्राणघातक मांजामुळे १२ दुचाकीचालकांचे गळे चिरले आहेत.
संपूर्ण राज्यातच यंदा देखील मकर संक्रांतीनिमित्त पंतगबाजांच्या हौसे पुढे अनेक बळी गेलेत.गुजरातवरुन नाशिकला आलेला तरुण नायलॉन मांजाला बळी गेल्याची घटना संपूर्ण राज्यालाच हळहळणारी होती.सोनू धोत्रे नावाचा २३ वर्षीय तरुण सकाळी साडे नऊ वाजता दुचाकीने पाथर्डी फाटा-वडनेरा मार्गे प्रवास करीत असताना निर्मलबाबा दर्गाजवळ कुण्या पंतगबाजाच्या हौसेला हकनाक बळी पडला.
(छायाचित्र : मृतक सोनू धोत्रे…याला जगण्याचा अधिकार नव्हता का?)
दोनच दिवसांपूर्वी नाशिक शहरातील वडाळा नाका परिसरात राहणारा २५ वर्षीय मुशरन सय्यदला गंभीर इजा झाली,दैव बलवत्तर म्हणून मृत्यूच्या दाढेतून तो बाहेर येऊ शकला मात्र,डॉक्टरांना त्याच्या गळ्याला ७५ टाके मारावे लागले!
नंदूरबारमध्येही नायलॉन मांजाने गळ्याला इजा झाल्याने सात वर्षीय चिमूरडा मृत्यूमुखी पडला.छत्रपती संभाजी नगरमध्ये एका पोलीस निरीक्षकाचाच गळा नायलॉन मांजाने चिरला.दिपक पारथे असे या पोलिस निरीक्षकाचे नाव आहे.
अकाेला येथील जुने शहर भागातील गुरुदेव नगर येथे नायलॉन मांजामुळे एका महिलेचा पाय कापल्या गेल्याची धक्कादायक घटना समोर आली.कलावती मराठे नामक या महिलेल्या पायात नायलॉन मांजा अडकल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.
दोन दिवसांपूर्वी रविवारी,वसई पूर्वेच्या मधुबन परिसरात विक्रम डांगे(वय वर्षे ३६)पत्नी व मुलासह दूचाकीने मधुबन परिसरातून जात होते,यावेळी एका पतंगाचा मांजा त्यांच्या गळा चिरत गेला.त्यांना त्वरित रुग्णालयात नेले असता ९ टाके डॉक्टरांना लावावे लागले.डांगे यांच्या गाडीचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला.सुरवातीला मांजा अडकल्याने ते खाली पडले मात्र,पतंग उडविणा-या मांजा खेचल्याने त्यांचा गळा चिरत गेला!
याच महिन्यात ७ जानेवरी रोजी उत्तरप्रदेशच्या मेरठमध्ये एका तरुणाचा मांजा गळ्यात अडकल्याने दूर्देवी मृत्यू झाला तर त्याच्या दुचाकीवर मागे बसलेल्या मित्राचे नाक कापल्या गेले!मृत्युमुखी पडलेल्या तरुणाने नाव सुहेल असे होते व तो फक्त २१ वर्षांचा होता. जखमी झालेल्या त्याच्या मित्राचे नाव नवाजीश असे आहे.कामावरुन घरी परतत असताना हा अपघात घडला.या घटनेचा व्हिडीयो सोशल मिडीयाव व्हायरल झाला असून बघणा-यांना भयकंपित करीत आहे.यामध्ये मृत्यू झालेलया तरुणाची मान नायलॉन मांजामुळे पूर्णपणे कापली गेली आहे!पीव्हीएस मॉलकडून तेजगढी चौकाकडे जात असताना त्याला मृत्यूने रस्त्यातच गाठले.त्याचे वडील जान मोहम्मदने सांगितले की सुहेल मजुरी करीत असे.दगड कापण्याची मशीन दुरुस्त करण्यासाठी त्याला मेरठला पाठवण्यात आले होते.
अकोलामध्ये किरण प्रकाश सोनोने (वय वर्ष ३५)यांचा नायलॉन मांजामुळे गळा चिरुन मृत्यू झाल्याची दूर्देवी घटना घडली.शहरातील एनसीसी कार्यालयाजवळील उड्डाणपुलाजवळून दुचाकीने जात असताना अकोट फैल येथील रहीवासी किरण सोनोने यांचा गळा चिरल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.रक्कबंबाळ अवस्थेत ते खाली कोसळले.दोन वर्षापूर्वी फारुक नगरात मुलीचा गळा कापून तिला २६ टाके पडले.सुदैवाने तिचा जीव वाचला.
मकरसंक्राती पूर्वी डिसेंबर २०२३ मध्ये एका जवानाचा मृत्यू मांजा मुळे झाला,तर मध्यप्रदेशच्या धार येथे वडीलांसोबत मोटरसायकलवर जात असलेल्या लहान मुलाच्या गळ्यात मांजा अडकल्याने त्याचा मृत्यू झाला.जुलै २०२२ मध्ये अशीच एक घटना देशाची राजधानी दिल्लीत घडली व एका जन्मदात्याला आपल्या मुलाचा मृत्यू चायनीज मांजामुळे बघावा लागला.
यंदा देखील नागपूरात प्रत्येक पोलीस ठाण्यात पतंगबाजांवर नजर ठेवण्यास विशेष पथक स्थापन करण्यात आले होते.डिसेंबर पासूनच पोलिसांनी नायलॉन मांजा संदर्भात १३१ गुन्हे दाखल करुन १८३ जणांना अटक केली.त्यांच्याकडून नायलॉन मांजासह ७४ लाखांचे साहित्य जप्त केले.२०२३ मध्ये देखील १४६ जणांवर गुन्हा दाखल करुन १८८ जणांना गजाआड केले व ३२ लाख ७२ हजार ३४१ किमतीचे साहित्य जप्त केले होते.हे सर्व आकडे सिद्ध करतात पतंगबाजांवर या पोलीसी कारवाईचा कोणताही परिणाम होत नाही.दरवर्षी संक्रात येणार व दरवर्षी राज्यभरात अनेक जीव नायलॉन मांजाचे बळी ठरणार.
परिणामी,नागरिकांनीच सज्ज राहण्याची गरज असून डिसेंबर पासूनच हा सण संपेपर्यंत आपल्या गळ्याभोवती मफलर तसेच शरीरावर योग्य कापडांचे कवच घालूनच घराबाहेर निघणे गरजेचे आहे अन्यथा दुस-या दिवशी कोण बातमीचा ठलक मथळा होईल याचा नेम नाही.या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे कारण अश्या घटनांमध्ये मारेकरी हे अज्ञात असतात.कायद्याच्या कचाट्यात ते सापडू शकत नाही,त्यामुळे पतंगबाजांची मजल दरवर्षी शेकडो जीव घेण्यापर्यंत पोहोचलेली आढळते.
त्यामुळेच,आपल्या लहान मुलांना व इतरांना दुचाकीवरुन नेताना त्यांच्याही सुरक्षेची संपूर्ण काळजी पोलिस किवा यंत्रणेऐवजी स्वत: घेणे गरजेचे आहे,हेच या सर्व घटनेतून बोध होतो.
खरे तर केंद्र सरकारने चायनावरुन भारतात आयात होणा-या या मांजावर संपूर्ण बंदी घालणे गरजेचे आहे मात्र,जागतिक करारातून इतर देशांसोबतच्या आयात-निर्यात धोरणांमुळे अद्याप तरी भारत सरकारला या हवेत उडणा-या मृत्यूवर बंदी घालता आली नाही,परिणामी देशातील नागरिकांनी मांजा मुळे होणा-या मृत्यू व जखमींचे हे आकडे बघता, स्वत:ची सुरक्षा स्वत: करने गरजेचे झाले आहे.
Advertisements

Advertisements

Advertisements
