एक कोटीच्या खंडणीच्या संदर्भात महत्वपूर्ण अश्या पत्रकार परिषदेचे आयोजन ताजाबाद ट्रस्टचे अध्यक्ष व ट्रस्टी यांच्या वतीने ताजाबाद येथील कार्यालयात करण्यात आले होते.पत्रकार परिषदेत सर्वाधिक प्रमाणात उपस्थित यूट्यूबर्स(पत्रकाराच्या श्रेणीत अद्याप तरी त्यांची गणना भारतीय कायद्यानुसार झालेली नाही त्यामुळे त्यांना पत्रकार म्हणता येणार नाही,ध्रृव राठी,देशहित सर्वाधिक चर्चित युट्यूबर्स स्वत:ला पत्रकार म्हणून घेत नाहीत)एक-दोन साप्ताहिकेचे संचालक, एखादे न्यूज पोर्टलचे संपादक तर एक-दोन प्रिंटचे पत्रकार या परिषदेसाठी उपस्थित होते.पत्रकार परिषद संपल्यानंतर उपस्थितांना नाश्ता हातातच कागदात देण्यात आला व कागदी कपात चहा ही मिळाला.एवढं पुरेसं असताना व आपापसात गप्पा मारत असतानाच अचानक कार्यालयातील एका खोलीत यूट्यूबर्सची ’आवक-जावक’वेगाने वाढताना दिसली.थोड्या वेळा पूर्वी ट्रस्टच्या अध्यक्षांच्या शेजारी बसलेले एक विशवस्त हे उपस्थित सर्वांनाच त्या खोलीत आत जाण्याचा इशारा हाताने करीत होते.खोलीच्या आत एक ‘खुदा का बंदा’ वरच्या खिशात गांधींजींच्या हिरव्या रंगाच्या पाच-पाचशेच्या नोटा काढून मोजून-मोजून पटापट सर्वांच्या हातात ठेवीत होता!
‘बाबा तेरे दरबार में…पत्रकार बिके ‘हजार ’में’म्हणायची वेळ काही प्रामाणिक पत्रकरांवर आली.त्यांच्या डोळ्या समोर तरळला तो दानिश सिद्दीकी….!अल्लाहचा नेक बंदा ज्याचा मृत्यू अफगाणमध्ये तालिबान्यांच्या युद्धाचे वार्तांकन करताना गोळी लागून झाला होता.वय होते फक्त ४०.ते रॉयटर या वृत्तसंस्थेसाठी काम करीत होते.करारानुसार,अफगाणमधून अमेरिकेन फौजा आपल्या देशात परतत असताना त्यांच्यावर तालिबानींनी हल्ले वाढवले होते.अफगानिस्तानच्या सुरक्षा दलांबरोबर कंदहार भागातून जात असताना एक गोळी दानिश याच्या नावे ही आली अन्….!जामिया मिलियामध्ये प्राध्यापक असणारे त्याचे वडील महंमद अख्तर सिद्दिकी त्याचे पार्थिव घेण्यासाठी दिल्लीत आले होते त्यावेळी वृत्तछायाचित्रकार दानिश विषयी ,त्याचे संवेदनशील मन,भावनाप्रधानता,कामाप्रति निष्ठा यावर भरभरुन बोलले होते.संपूर्ण जग करोनाच्या दुस-या लाटेत होरपळून निघत असताना १६ जुलै २०२१ रोजी पत्रकारितेवर नितांत प्रेम असणारा तो अल्लाहचा बंदा जगातून रुखसत झाला.अमेरिकेच्या सैन्याने दानिशला मरणोपरांत सलामी दिली होती.बाबाच्या दरबारमध्ये तर पत्रकारितेच्या नावाखाली काल ओंगळवाणे दृष्य उमटले होते!कुठे पत्रकारितेसाठी मरणारे आणि कुठे पैशांसाठी पत्रकारितेचे मूल्य विकणारे…..!
नागपूरातील गंगा-जमुना ही बदनाम वस्ती आहे.या वस्तीतील वारांगणा ही फक्त शंभर रुपयांसाठी एखाद्या ट्रक ड्रायव्हर किवा ऑटो चालक याला आपला देह विकते.ती शंभर रुपयांची कमाई ही तिच्या अगतिकतेतून कमावलेली पण इमानदारीची कमाई असते.दिवसातून अनेक वेळा ती अशाच वर्गाच्या ग्राहकांसोबत शय्यासोबत करते मात्र,तिला तिच्या या कृत्यांसाठी कोणीही बोल लावत नाही,बाबाच्या दरबार परिसरात तर हजारोच्या नोटा क्षणात काल कमावल्या गेल्या!कशासाठी ?तर केवळ एक बातमी व्हायरल करण्यासाठी!एका कोट्याधीशाला स्वत:ची बाजू जगासमोर आणण्यासाठी या स्तरावर उतरताना पाहून,युक्रेन युद्धावर टिका केली म्हणून आपल्याच देशातील नोबेलप्राप्त ७० वर्षीय संस्थाध्यक्षाला रशियाच्या हूकूमशहाने ब्लादिमिर पुतीनने अडीच वर्षे तुरुंगात डांबले त्याची आठवण आली….त्या अवलियाला काय म्हणावे?सत्य बोलण्यासाठी,सत्य मांडण्यासाठी नोबेलप्राप्त मानवाधिकार संस्थेचे सहअध्यक्ष ओलेग ऑर्लोव्ह वयाच्या ७० व्या वर्षी तुरुंगात जाणे सहज पसंद करतात,मग बाबा ताजच्या परिसरात सत्य मांडण्यासाठी भरविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत,परिषदेनंतर ‘अनीती’ ची कास का धरण्यात आली? हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.
‘न्यूजक्लिक‘या न्यूज पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ यांना फेक न्यूजच्या आरोपाखाली बेकायदा अटकेत ठेवण्यात आल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या सुटकेचे आदेश दिले.न्यूयार्क टाईम्समध्ये छापून आलेल्या एका वृत्तानुसार चीनचे धाेरण राबविण्यासाठी न्यूजक्लिकला एका धनाढ्य अमेरिकनकडून फंडिंग झाल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.या वृत्तानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांच्यासह चार पत्रकारांना अटक केली होती.अतिशय कठोर असा ‘यूएपीए’ कलम त्यांच्यावर लावण्यात आला. मणिपूरच्या धगधगत्या वास्तवाचे वार्तांकन केल्यामुळे विविध समुदायांमध्ये वैमनस्य भडकवण्याचा आरोप ठेवीत, एडिटर्स गिल्डच्या चार सदस्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.!उद्देश्य एकच….सत्य समाेर येऊ नये…यावर हे गुन्हे म्हणजे मोदी सरकारचे ‘प्रति कथन’असल्याची टिपण्णी सर्वोच्च न्यायालयाने केली होती.जगभर गाजलेले प्रकरण ‘विकीलिक्स’हे शोध पत्रकारितेशीच संबंधित आहे.अद्यापही विकिलिक्सचे संस्थापक ज्युलिअन असांजे यांच्यावर अमेरिकेतील प्रत्यारोपणाची लढाई न्यायालयात सुरु आहे.५२ वर्षीय असांजे मागील दहा वर्षांपासून लंडनमधील इक्वेडोरच्या दूतावासात सात वर्ष तर उच्च सुरक्षेच्या तुरुंगात पाच वर्षांपासून जीवन कंठीत आहेत.ही कोणती पत्रकारिता होती?हे कोणते झपाटलेपण होते?स्वत:ला मिटवून सत्य बाहेर आणने पत्रकारितेचा हा कोणता उच्चांक होता?बाबा ताज परिसरात मग असे का घडले?
उगाच पत्रकारिता हे ‘मूल्य’ आहे असे म्हटले जात नाही…पण ते कागदी नोटांच्या परिमापात मोजल्या जाणारे ‘मूल्य’ नाही. हे ना पत्रकार म्हणून घेणा-या यूट्यूबर्सला कळले ना त्यांच्या हातात नोटा काेंबणा-या ‘र्निबुद्ध’ यंत्रणेला कळले.दूर्देवाने नागपूर शहरात पत्रकारितेच्या नावावर,अ्शा कमाईच्या बाबतीत सर्वाधिक पुढाकार घेण्यात दिसून पडणारा,कपाळावर टिळा लावून फिरणायांच्या कळपात एक ब्राम्हण देखील आहे! पत्रकारितेच्या मूल्याला अनीतीच्या कोंदणात बसवून उजळ माथ्याने कमाई करणा-या त्या ब्राम्हणाने यापेक्षा पौरोहित्य करुन,सत्यनारायणाची पूजा सांगून ,आपला व कुटूंबियांचा उदरनिर्वाह करने हे त्याचा धर्म सांगत नाही का?मात्र,शॉर्ट कटने मिळत असलेल्या पैशांसाठी चटावलेल्यांना राजकारण्यांप्रमाणे ,धर्म हा फक्त सोयीसाठी वापरण्याचा हतकंडा अवगत झाला आहे.अश्या धर्ममार्तंडांना म्हणूनच पत्रकार परिषदांमध्ये पत्रकार म्हणून मिरवून घेत बघताना,पत्रकारिताही आपले सत्व मिटून घेत असेल,यात असत्यता नाही.
मंडीत पत्रकारितेच्या मूल्याचा बाजार भरविणा-या या सर्व प्रकारावर खुलासा ताजाबाद ट्रस्ट कडून काय आला?बाबा ताज यांचा उर्स लवकरकच सुरु होणार असून दीड लाखांचे बजेट यासाठी ट्रस्टने राखून ठेवले आहे.उर्सच्या प्रसिद्धीसाठी यूट्यूबर्सला पैसे वाटण्यात आले!काय अचूक टायमिंग साधले ट्रस्टींनी!याची दाद द्यावी लागेल.यूट्यूब हे एकसमान चॅनल असून मग कोणाला एक हजार,तीन हजार,पाच हजारांची रक्कम का वाटण्यात आली?याचे कोणतेही उत्तर त्यांच्याकडे नव्हते.आज प्रेस क्लबमध्येही ताजाबादमध्ये वाटण्यात आलेल्या पैशांचीच चर्चा,पैसे घेणा-यांमध्ये होती!
नागपूरात पत्रकारिता हा आता एक ‘कलंक’ झाला आहे,पूर्वी ती अभिमानाची बाब होती.खंडणीबाज,गुन्हेगार,हनी ट्रॅपवाले,सगळ्या प्रकारचे लोक या क्षेत्रात घूसले असून नागपूरात पत्रकारितेचा जीव गुदमरुन राहीला आहे.यातून प्रामाणिक पत्रकारांसाठी सूटकेचा एकच मार्ग उरला असून तो म्हणजे पत्रकारितेलाच ‘गुड बाय’ करण्याचा…..!