

रामटेकमधून सात उमेदवारांचे अर्ज मागे
नागपुरातून एकही अर्ज मागे नाही
नागपूर, दि. ३० मार्च २०२४ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी अर्ज मागे घेण्याच्या आज अखेरच्या दिवशी रामटेक लोकसभा मतदारसंघातून सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. तर नागपूर लोकसभा मतदारसंघातून एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही.
नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची संख्या एकाही उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्यामुळे २६ अशी कायम आहे. तर रामटेक लोकसभा मतदारसंघातील ७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे ही संख्या ३५ वरून २८ अशी झाली आहे.
रामटेक लोकसभा मतदारसंघातून गौरव गायगवळी, दर्शनी धवड, नरेश बर्वे, प्रकाश कटारे, डॅा. विनोद रंगारी, सुरेश साखरे आणि संदीप गायकवाड यांनी अर्ज मागे घेतले आहेत. नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
नागपूर विभागातील पाच लोकसभा मतदारसंघासाठी ९७ उमेदवार निवडणूक रिंगणात-
भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात २२ उमेदवारांपैकी आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता १८ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.
गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात १२ उमेदवारांपैकी नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी मिलींद नरोटे व हरिदास बारेकर या दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे आता १० उमेदवारांमध्ये निवडणुकीची लढत होणार आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १५ उमेदवारांपैकी एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही.
………………………………………………




आमचे चॅनल subscribe करा
