Homeनागपूर न्यूजभारत विकास परिषदेचे पश्चिम क्षेत्र संमेलन उद्या २९ सप्‍टेंबर रोजी

भारत विकास परिषदेचे पश्चिम क्षेत्र संमेलन उद्या २९ सप्‍टेंबर रोजी

Advertisements

 

पश्चिम क्षेत्र संमेलन व चिंतन शिबिराचे उद् घाटन राज्‍यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांच्‍या हस्‍ते

प्रबुद्ध जन संमेलन व चिंतन बैठकीला डॉ. मोहन भागवत यांचे मार्गदर्शन

देशभरातून ६०० हून अधिक गणमान्‍य व्‍यक्‍तींची उपस्थिती

नागपूर, २६ सप्‍टेंबर २०२२: भारत विकास परिषदेचे पश्चिम क्षेत्र संमेलन ‘उत्‍कर्ष’ तसेच, प्रबुद्ध जन संमेलन व चिंतन बैठक गुरुवार, २९ सप्‍टेंबर रोजी नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशिमबाग येथे आयोजित करण्‍यात आली आहे. पश्चिम क्षेत्र संमेलन ‘उत्‍कर्ष’ चे उद् घाटन सकाळी १० वाजता राज्याचे राज्‍यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्‍या हस्‍ते होणार आहे. तर सायंकाळी ५.३० वाजता होणा-या प्रबुद्ध जन संमेलन व चिंतन बैठकीला राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे उद् बोधन लाभणार आहे.

भारत विकास परिषद ही राष्‍ट्रव्‍यापी संस्‍था १९६३ सालापासून अविरत समाजसेवेसाठी कार्यरत आहे. समाजातील प्रबुद्ध आणि सुबुद्ध नागरिकांचा समावेश असलेल्‍या या संस्‍थेचे देशातील १० क्षेत्र आणि ७९ प्रांतात कार्य सुरू आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आता सामाजिक संस्थांचे दायित्व देशासाठी आणि समाजासाठी अजूनच वाढले आहे. त्या दृष्टीने संस्था विस्तार करून त्या माध्यमातून युवाशक्तीचे मनोबल उंचावणे आणि राष्ट्रभक्ती व राष्‍ट्रचेतना जागृत करणे, हा या संमेलनाचा उद्देश असून देशभरातील विविध महानुभाव व्यक्तींचे उद् बोधन येथे ठेवण्यात आले आहे.

गोवा, गुजरात व महाराष्‍ट्र या पश्चिम क्षेत्रातील राज्‍यांचे हे संमेलन विदर्भ प्रांतात होत असल्‍यामुळे त्‍याला अधिक महत्‍व प्राप्‍त झाले आहे.

पश्चिम क्षेत्र संमेलन ‘उत्‍कर्ष’च्‍या उद् घाटन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी भारत विकास परिषदेचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष गजेंद्रसिंह संधू राहतील तर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी हे प्रमुख अतिथी म्‍हणून तर सीए ब्रिजकिशोर अग्रवाल हे प्रमुख पाहूणे म्‍हणून उपस्‍थ‍ित राहणार आहेत.

गडकरी यांच्‍या हस्‍ते सकाळी ११.३० वाजता स्‍मरणिकेचे प्रकाशन होणार असून दुपारी १२.३० वाजता विवेकानंद केंद्र कन्‍याकुमारीच्‍या उपाध्‍यक्षा निवेदिता भिडे यांचे व त्‍यानंतर प्रकाश पाठक, धुळे यांचे उद् बोधन होईल.

सायंकाळी ५.३० वाजता होणा-या प्रबुद्ध जन संमेलन व चिंतन बैठकीला सोलर इंडस्‍ट्रीज इंडिया लि‍म‍िटेडचे मुख्‍य प्रवर्तक सत्‍यनारायण नुवाल व ओस्‍तवाल ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्‍यक्ष उमरावसिंह ओस्‍तवाल यांची विशेष अतिथी म्‍हणून उपस्थिती राहणार आहे.

भारत विकास परिषदेचे राष्‍ट्रीय, क्षेत्रीय, प्रांत व शाखा पदाधिकारी, सदस्‍य व समाजातील गणमान्‍य व्‍यक्‍ती या चिंतन बैठकीला उपस्थित राहतील.

हे दोन्‍ही कार्यक्रम नि:शुल्‍क असले तरी कार्यक्रमाला उपस्थित राहण्‍यासाठी प्रवेशिकांची व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली आहे. या नि:शुल्क प्रवेशिका प्राप्‍त करण्‍यासाठी 9822691623, 9822226103, 9422113232, 7972018565, 9860982999, 9373625727, 7028529250 व 9371486285 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन भारत विकास परिषद विदर्भ प्रांत अध्‍यक्ष चंद्रशेखर घुशे, महासचिव पद्माकर धानोरकर, समन्‍वयक संजय गुळकरी, संयोजिका सीमा मुनशी व संपर्क प्रमुख सारिका पेंडसे यांनी केले आहे.

Latest बातम्या