Homeनागपूर न्यूजप्रा.डॉ.अंबादास मोहिते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

प्रा.डॉ.अंबादास मोहिते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

Advertisements

नागपूर दि. १३: नागपूरातयुवक बिरादरीची’ स्थापना करणाऱ्या प्रा. डाॅ अंबादास ये. मोहिते यांनी
शैक्षणिक-सामाजिक-साहित्यिक क्षेत्रात आजवर केलेले उल्लेखनीय कार्य आणि युवक बिरादरीच्या वाटचालीत दिलेले योगदान याबद्दल त्यांचा बिरादरीतर्फे एबीपी माझा चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते गौरव पदक, न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या हस्ते जीवनगौरव पत्र आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांच्या हस्ते शाल देऊन सन्मान करण्यात आला.

१९७५ पासून रचनात्मक कार्यात  योगदान  देणाऱ्या युवक बिरादरी (भारत ) या संस्थेतर्फे  पु.ल. देशपांडे सभागृह, रवींद्र नाट्यमंदिर,  मुंबई येथे नुकत्याच आयोजित करण्यात  आलेल्या बिरादरी ऋणानुबंध समारंभात प्रा.डॉ.अंबादास  मोहिते यांना सन्मानित करण्यात आले.  याप्रसंगी खासदार तथा ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री कुमार केतकर, युवक बिरादरीचे संस्थापक पद्मश्री क्रांती शहा, आशुतोष शिर्के, सुनील वालावलकर व इतर मान्यवर विचार पिठावर उपस्थित होते.

संकल्प नृत्यगान,अतिथींचे मनोगत, खुली चर्चा व अभिनंदन सोहळा असे या समारंभाचे स्वरूप होते. कुमार केतकर, राजीव खांडेकर, न्या. सत्यरंजन धर्माधिकारी,  डॉ. राजन वेळुकर यांनी मनोगतातून  देशासमोरील वर्तमान आव्हाने, लोकशाहीची मूल्ये, संविधान व मूलभूत  कर्तव्ये, स्वयंरोजगार, युवकांची भूमिका, बिरादरीचे सातत्यपूर्ण  कार्य आदि बाबत भूमिका मांडत उपस्थितांसोबत संवाद साधला.

क्रांती शहा यांनी आपल्या मनोगतातून युवक बिरादरीला गेल्या ४८ वर्षाच्या वाटचालीत सहकार्य केलेल्या महानुभावांच्या प्रती सदभावना व्यक्त करुन “जोडो भारत” अभियान, एक सूर एक ताल कार्यक्रम, वसुंधरा बचाव आंदोलन,  युवा संसद, युवा भूषण आदि  उपक्रमांच्या माध्यमातून देशातील विद्यार्थी-युवकांना विधायक आणि रचनात्मक कार्याकरिता युवक बिरादरी सातत्याने प्रेरित करीत असल्याचे सांगीतले.

आपल्या प्रास्ताविकातून स्वर क्रांती यांनी युवक बिरादरीचे ध्येय, उद्देश, आणि कार्य याचा उहापोह केला. बिरादरीच्या समुहाने सादर केलेल्या संकल्प नृत्यगानास उपस्थितांनी भरभरून दाद दिली.

प्रमिला दातार यांनी याप्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित “सबके लिए खुला है…मंदिर ये हमारा” हे भजन सादर केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील वालावलकर तर गौरव पत्राचे वाचन मेधा दिवेकर,आभारप्रदर्शन आशुतोष शिर्के यांनी केले. राष्ट्रगीता नंतर समारंभाची सांगता झाली.

Latest बातम्या