

जिल्हाधिकारी यांचे आवाहन
३० लाख नागरिकांची १३ ते ३० सप्टेंबरपर्यंत तपासणी
नागपूर दि.२५ ऑगस्ट २०२२ : नागपूर महानगर व जिल्ह्यामधील गावागावांमध्ये पुढील १३ ते ३० सप्टेंबर या कालावधीत संयुक्त सक्रिय कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. महिलांसाठी आशा स्वयंसेविका व पुरुषांसाठी पुरुष स्वयंसेवक यांच्याद्वारे हे सर्वेक्षण सुरू होणार आहे. या सर्वेक्षणासाठी घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज येथे केले.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची महत्त्वपूर्ण बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे पार पडली. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत कुष्ठरोग शोध मोहीम व सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम १३ ते ३० सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी थोरात जिल्हा आरोग्य अधिकारी डि. एस. सेलोकार व अन्य वरिष्ठ उपस्थीत होते.
शहर व ग्रामीण या दोन्ही भागांमध्ये ही तपासणी मोहीम होणार आहे. ग्रामीण भागातील शंभर टक्के तर शहरी भागातील ३० टक्के नागरिकांच्या घरोघरी जाऊन हा सर्वे करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात एकूण १७३२ पथक तयार केले असून आशा स्वयंसेविका व पुरुष स्वयंसेवक यांच्या चमुद्वारे सर्वेक्षणाचे काम सुरू होत आहे. या अभियानाच्या पर्यवेक्षणासाठी ३४६ आरोग्य कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये ३० लाख ३१हजार २९१ नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे.
कुष्ठरोगाची लक्षणे : अंगावर चट्टे, हाता पायाला मुंग्या येणे, स्नायूमध्ये अशक्तपणा येणे, बधीरता येणे, भुवयाचे केस विरळ होणे, चेहरा तेलकट होणे, तळहात तळपायात बधीरता जाणवणे, अशी लक्षणे असणाऱ्यांची पुन्हा एकदा शास्त्रोक्त तपासणी करावी. त्यांच्यावर मोफत औषधोपचार केले जाणार आहेत.
क्षय रोगाची लक्षणे : दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला ताप असणे, वजनात घट होणे, थुंकीवाटे रक्त जाणे, मानेवर गाठ असणे, अशी लक्षणे आढळून आल्यास संशयित म्हणून नोंद घेऊन पुढे थुंकी नमुन्याची तपासणी, एक्स-रे व सीबीनॅट तपासणी मोफत केली जाणार आहे.
***

आमचे चॅनल subscribe करा