

ज्वाला धोटे यांची उच्च न्यायालयात याचिका
नागपूर,ता. ३ जुलै २०२२ : पोलिसांच्या लेखी जो गवसलाच नाही किंबहूना जो ‘फरार’होता असा मकोकाचा आरोपी व कुख्यात गुन्हेगार अभिषेक सिंग याला आश्रय देणा-या व फरार राहण्यास मदत करणा-या महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत व भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नीरज कुंदन(दिल्ली)यांच्या विरुद्ध भादंविच्या कलम १२०-ब व २१२ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात यावी,या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या व ‘अन्याय निवारण समिती’च्या अध्यक्षा ज्वाला धोटे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.या याचिकेवर येत्या शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
अभिषेक सिंग हा कुख्यात रोशन शेख गँगचा सदस्य आहे.संबंधित पोलिसांनी ८ मे २०२० रोजी गौरव दाणी यांच्या तक्रारीवरुन रोशन शेख व अभिषेक सिंग यांच्यासह एकूण ६ आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३६३,३६४-ए,३८३,३८६,३८७,३९७,५०४,५०६,भारतीय शस्त्र कायद्यातील कलम ४,२५ आणि मकोकाच्या कलम ३ अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे.त्यानंतर चार आरापींना अटक करण्यात आली.मात्र सिंग व अंकित पाली हे दोन आरोपी फरार झाले होते.
दरम्यान,राजकीय वरदहस्त लाभलेला सिंग देशामध्ये मुक्तपणे फिरत होता.राजकीय व सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत होता.तो १९ एप्रिल २०२२ रोजी कुंदन यांच्या विवाहामध्येही उपस्थित होता.त्यानंतरही पोलिसांनी त्याला अटक केली नाही.दबाव वाढवल्यानंतर त्याला गेल्या २१ जून रोजी अटक करण्यात आली.
परंतु,तत्पूर्वी पोलीस आयुक्त व संबंधित पोलीस निरीक्षकांनी ,धोटे यांनी या संदर्भात २१ फेब्रुवारी व १० मार्च २०२२ रोजी दिलेल्या तक्रारींची दखलच घेतली नव्हती.
अभिषेक सिंगविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात तब्बल ७ गुन्हे दाखल आहेत.असे असताना कुणाल राऊत व नीरज कुंदन यांनी त्याला फरारी राहण्यास मदत केली,असा आरोप ज्वाला धोटे यांनी याचिकेत केला आहे.
न्यायालयात धोटे यांच्या वतीने ॲड.श्रीरंग भांडारकर कामकाज पाहतील.
काय आहे आरोप?
आरोपींनी गौरव दाणी यांचे अपहरण करुन २० लाख रुपयांची खंडणी मागितली,तसेच त्यांना ठार मारण्याची धमकी दिली.दरम्यान,आरोपींनी दाणी यांच्या जवळची रक्कमही हिसकावली,अशी तक्रार आहे.आरोपींविरुद्ध ६ नोव्हेंबर २०२० रोजी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल आहेत.
सीबीआय किवा सीआयडीकडे तपास सोपवा-
अभिषेक सिंगवरील आरोपांचा तपास करण्याची जबाबदारी सीआयडी किवा सीबीआय यांच्याकडे सोपविण्यात यावी आणि या प्रकरणात पोलीस आयुक्त व सदर पोलीस निरीक्षक यांनी कायद्याचे पालन केले नाही,हे घोषित करण्यात यावे,अशी विनंती देखील धोटे यांनी न्यायालयाला केली आहे.




आमचे चॅनल subscribe करा
