Homeनागपूर न्यूजपोलिस आयुक्त कार्यालय बनले राजकारणाचा आखाडा!

पोलिस आयुक्त कार्यालय बनले राजकारणाचा आखाडा!

Advertisements

आयुक्त कार्यालयाच्या सभागृहातच भाजपची पत्र परिषद!

त्याच सभागृहात घेणार उद्या पत्र परिषद:ज्वाला धोटेंचे आव्हान

पोलिस आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष

नागपूर,ता.१७ जून २०२२: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष राहूल गांधी यांची गेल्या चार दिवसांपासून सक्त वसूली संचलनालय(ईडी)तर्फे चौकशी सुरु आहे.या विरोधात देशभर काँग्रेसचे आंदोलन सुरु आहे.नागपूरात देखील साेमवारी, सेमिनरी हिल्स येथील ईडी कार्यालयासमोर काँग्रेसचे पदाधिकारी यांच्या नेतृत्वात आक्रमक आंदोलन करण्यात आले.यावेळी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आपत्तीजनक शब्दांचा उपयोग केला होता.
या विरोधात भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेत शेख हुसेनच्या विरोधात गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली यानंतर सायंकाळी अंबाझरी पोलिस ठाण्यात शेख हुसेनच्या विरोधात गुन्हा देखील नोंदविण्यात आला.

हुसेन यांना अटक झाल्यावर लगेच जामिन देखील मिळाला.शेख यांना पोलिस ठाण्यातून मिळालेल्या जामिना विरोधात प्रदेशचे महामंत्री व भाजपचे आमदार चंद्रशेखर बावणकुळे यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना आज दुपारी ३ वाजता पोलिस आयुक्त कार्यालयात निवेदन सोपवले.यावेळी आमदार कृष्णा खाेपडे, भाजपा अल्पसंख्यक आघाड़ीचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी, माजी आमदार सुधाकर देशमुख,प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंड़े,माजी महापौर दयाशंकर तिवारी,शहर महामंत्री संजय बंगाले,राम अंबुलकर,बाल्या बोरकर,प्रदेश युवा मोर्चा महामंत्री शिवानी दाणी वखरे,संगठन महामंत्री सुनील मित्रा,शहरर उपाध्यक्ष भोजराज डुंबे,प्रदेश प्रवक्ता पैनलिस्ट चंदन गोस्वामी, गुड्डू शेख आदी उपस्थित होते.

आयुक्तांना निवेदन सोपवल्यावर आयुक्त हे कक्षा बाहेर निघून गेले,यावेळी बावणकुळे यांनी पोलिस आयुक्तांची खूर्ची बाजूला सरकवली व त्याच ठिकाणी पत्र परिषद घेण्यास सुरवात केली.हुसैन यांच्यावर येत्या ३ दिवसात कठोर कलमा लावून अटक न केल्यास न्यायालयाचे दार ठोठावल्या जाईल,असा इशारा त्यांनी दिला.

पोलिस हे राजकीय दबावात काम करीत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.माजी मुख्यमंत्री व विद्यमान केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात सुधाकर देशमुख यांनी ‘झापड’मारण्याचे वक्तव्य करताच त्यांच्या विरोधात १३ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्या होत्या. शेख हुसेन यांनी तर पंतप्रधनांची तुलना ‘श्‍वाना‘सोबत करुन त्यांच्या मृत्यूची कामना केली.

पोलिसांनी हेतुपुरस्सर शेख हुसेनच्या विरोधात साध्या कलमा लाऊन एफआयआर दाखल केला व त्यात त्यांना जामिनही मिळाला.आयुक्तांना आम्ही हुसेनवर कठोर कलमा लावण्याची विनंती केली असल्याचे त्यांनी सांगितले. आयुक्तांनी भाजप शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारल्यानंतर ,कायदेतज्ज्ञांशी बोलून हुसेनवर इतर कलमा लावण्यात येतील असे आश्‍वासन दिले असल्याचे बावणकुळे यांनी सांगितले.

मात्र आयुक्तांना निवेदन सोपवल्यानंतर त्याच ठिकाणी पत्र परिषद घेण्यात आली,यावर आयुक्तांच्या कक्षाला राजकीय अखाडा बनविण्याच्या विरोधात एका पत्रकाराने प्रश्‍न उपस्थित केला.शहरात पत्रकार भवन तसेच प्रेस क्लब उपलब्ध असताना चक्क पोलिस आयुक्तालयाच्या सभागृहालाच, पत्रकार कक्षात केलेल्या रुपांतरणामुळे नव्या वादाला तोंड फूटले.

अन्याय निवारण समितीच्या अध्यक्षा ज्वाला धोटे यांनी आता उद्या १८ जून रोजी दुपारी १ वाजता महत्वाच्या विषयावर पोलिस आयुक्तल्याच्या सभागृहात पत्र परिषद घेणार असल्याची घोषणा केली.पोलिस आयुक्तांनी आज दिनांक १७ जून रोजी पत्रकार परिषदांबाबत जो नवा पायंडा पाडला त्याचेच अनुसरण करीत उद्या एका महत्वाच्या विषयावर पत्र परिषद घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्या गंगा-जमुना वस्तीतील निर्दोष वारांगणांना जो नाहक त्रास गेल्या १० महिन्यांपासून पोलिस आयुक्तांनी दिला,त्या विरोधात त्या वारांगणा माता-भगिनींना घेऊन पत्रकार परिषद पोलिस आयुक्तालयाच्या सभागृहात घेण्यात येणार असल्याचे त्यांनी विशद केले.

विशेष म्हणजे बावणकुळे यांनी पोलिस आयुक्तालयाच्या शासकीय सभागृहात राजकीय पत्र परिषद घेऊन जो चुकीचा पायंडा पाडला तो त्यांच्याच अंगलगट येण्याची शक्यता आता बळावली आहे.बावणकुळे यांच्या खूर्चीच्या मागे संवैधानिक ध्वज,पोलिसांचा ध्वज व संवैधानिक बोधचिन्ह होते.या संवैधानिक चिन्हांसमोर राजकीय पत्र परिषद घेणे हे कोणत्याही ‘नीती-मुल्यात’ न बसणारेच असल्याने याचे माध्यम वर्तुळात चांगलेच पडसाद उमटले.

उद्या दुपारी १ वाजता ज्वाला धोटे यांना पोलिस आयुक्तालयाच्या शासकीय सभागृहात पत्र परिषद घेण्याची ‘संधी’ मिळते किंवा त्यांना पोलिस बळाचा वापर करुन रोखल्या जाईल,याकडे आता नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.

Latest बातम्या