फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमनागपूरात की-बोर्ड कलाकाराला बेदम मारहाण:हिंदी भाषिक गुंडांची चंदन नगरात दहशत

नागपूरात की-बोर्ड कलाकाराला बेदम मारहाण:हिंदी भाषिक गुंडांची चंदन नगरात दहशत

Advertisements

कारला खरचटल्याचे निमित्त: लाकडी दांडा,लाेखंडी पाईपने तोडले दोन्ही हात

१३ जूनच्या घटनेनंतर घाबरुन प्रशांत खडसे यांनी पोलिसात तक्रार नोंदविण्याचे साहस दाखवले नाही

शहरातील कलावंतांचा न्यायासाठी पुढाकार-गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे

इमामवाडा पोलिस ठाण्याकडून आता दोन्ही बाजूची तक्रार नोंदवण्याचा इशारा

उद्या सकाळी दहा वाजता पुन्हा पोलिस ठाण्यात येण्याच्या खडसे यांना सूचना

नागपूर(Nagpur),ता. १६ जून २०२२: महाराष्ट्राच्या उपराजधानीत झोपडपट्टीतील गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर पोलिसांचा किती धाक आहे याची प्रचिती दररोज नागपूरात घडणा-या शेकडो गुन्ह्यातून मिळतच असते मात्र आता या गुंडांचा हैदोस एखाद्या गरीब कलाकाराचे हात तोडण्यापर्यंत पोहाेचले असून उपराजधानीत आता सामान्य माणसांना जीव मुठीत घेऊन जगणे भाग पडत आहे.

ज्येष्ठ की-बोर्ड वादक प्रशांत खडसे हे अत्यंत हलाकीच्या परिस्थितीतून आपल्या कुटुंबियांचे उदरभरण करीत असतात.त्यांना तीन अपत्ये असून,वृद्ध आई व पत्नी आहे.एक मुलगी मतिमंद असून दुसरी मुलगी शिक्षण घेत आहे तर एकुलत्या एक मुलाचाही हात अपघातात कायमचा पंगू झाला आहे.

खडसे हे पूर्वी गाेधनी गावाजवळील बोकारो येथे राहत असत मात्र मतिमंद मुलींची शाळा ही जानकी टॉकिज जवळ असल्याने एवढ्या लांबून आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी त्यांना नागपूरात येणे-जाणे परवडत नव्हते.यामुळे त्यांनी रेशिमबाग भागात ९ हजार रुपये महिना घरभाडे देऊन भाड्याने घर घेतले.त्यांची सासुरवाडी चंदननगर येथील असून सासूच्या मृत्यू पश्‍चात त्यांचे राहते घर पडीक असल्याने त्यांनी पत्नी,आई व मुलांसह चंदननगर येथील सासूच्या घरी राहण्याचा निर्णय घेतला.

या घराला राहण्यायोग्य बनवून गेल्या अनेक वर्षांपासून ते या भागात राहत आहे.सासूच्या घरी राहत असल्याने वस्तीतील लोकं खडसे यांना ‘जवाई’म्हणूनच हाक मारत असतात.खडसे यांना कोणतेही व्यसन नाही,संगीत हेच त्यांचे पॅशन असून विविध ऑकेस्ट्रा शोजमध्ये की-बोर्ड वाजवून ते आपली उपजिविका चालवित असतात.

त्यांच्या घरा शेजारी ग्वालबंशी यांचे घर असून त्यांच्याकडे लाल रंगाची चारचाकी आहे तर खडसे यांच्याकडे पांढ-या रंगाची कार आहे.आपल्या कष्टाच्या पैश्‍याने घेतलेल्या पांढ-या रंगाच्या स्वीफ्ट गाडीला ग्वालबंशीचा मुलगा आकाश उर्फ टप्पी याने हेतुुुुपुरस्सर रगडून नेले,यामुळे खडसे यांच्या पांढ-या रंगाच्या कारला लाल रंगाच्या स्वीफ्ट कारचा रंग लागला.

पहाटे उठल्यावर आपल्या गाडीला जाणून रगडून मारलेल्या धक्क्यामुळे खडसे हे चांगलेच संतापले व त्यांनी रागाच्या भरात शेजा-यांना सुनावले.याचा राग मनात धरुन सोना यादव,मोना यादव व जितू यादव या तिन्ही भावांनी आपले मामा ग्वालबंशी यांच्या आकाश ग्वालबंशी या मुलासह अमरावतीवरुन पाहूणा म्हणून आलेल्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या भैय्यू यादवसह ३ जून रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास खडसे यांना घरासमोर बोलताना लाकडी दांडा व लोखंडी पाईपने बेदम मारहाण करण्यास सुरवात केली.यात खडसे यांच्या दोन्ही हातांना जबर मार लागला असून पाठीवरही अगणिक जखमा आहेत.हे पाचही आरोपी त्यावेळी दारुच्या नशेत होती.

खडसे यांच्या पत्नीने त्यांना मेडीकलमध्ये नेले असता संगीत क्षेत्रात रमणा-या एका सर्वसामान्य कलाकाराला या घटनेचा जबर मानसिक धक्का बसला असल्याने त्यांनी मेडीकलमधील डॉक्टरांना या मारहाणीविषयी काहीही न सांगता,गाडीवरुन पडलो असे कारण सांगितले.

यावेळी खडसे यांच्या दोन्ही हाताची हाडे तुटली असून ती अवस्था बधता मेडीकलमधील कर्तव्यावर असणा-या डॉक्टरांनी खडसे यांना खरे बोलण्यास सांगितले मात्र खडसे यांनी खरे कारण न सांगितल्याने त्यांच्या उपचारावरील कागदपत्रांवर शेवटी डॉक्टरांनी,गाडीवरुन पडल्याचे कारण विशद केले.

१३ जूनला घडलेल्या या घटनेची माहिती कलाकार जगताला कळताच कला जगतमध्ये संतापाची लाट उसळली.त्यांनी तडक खडसे यांचे घर गाठले व इमामवाडा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास समजावले.हिंमत करुन खडसे हे आज दुपारी इमामवाडा पोलिस (Police)ठाण्यात पोहोचले असता,पीआय राजकमल वाघमारे हे सायंकाळीच भेटतील असा निरोप त्यांना देण्यात आला.

सायंकाळी ६ वा.नंतर पुन्हा खडसे हे काही कलावंतांसोबत पीआय वाघमारे यांना भेटले असता,त्यांनी मेडीकलमधील कागदपत्रांवर नेमके बोट ठेवले.घटना घडून इतके दिवस उलटल्यावर आता तक्रार नोंदवण्याचे औचित्य त्यांनी उपस्थित केले.एकीकडे देशाचे सर्वोच्च न्यायालय हे ’बलात्काराची’घटना घडल्यावर दहा वर्षांनी देखील पिडीता तक्रार नोंदवू शकते असा निर्वाळा देऊन सामान्यांच्या न्याय हक्काचे रक्षण करते,दूसरीकडे याच देशातील अनेक पोलिस ठाण्यात सामान्य माणूस तक्रार नोंदविण्यास गेल्यास,इतक्या दिवसांआधी,तितक्या दिवसांआधी घटना घडली,अश्‍या सबबी पुढे करण्यात धन्यता मानताना पोलिस यंत्रणा दिसून पडते.

खडसेसह आलेल्या कलावंतांनी शहरातील निष्णात वकील यांच्याशी संपर्क साधला असता,इमामवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल न केल्यास पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार नोंदविण्याचा सल्ला त्यांनी दिला.त्या तक्रारीची रिसिव्हड कॉपी मेडीकलमध्ये दाखवल्यास तेथील डॉक्टर पुन्हा दूसरा अहवाल देऊ शकतात,डॉक्टरचा पहीला अहवाल हा ‘अंतिम’नसतो,अशी माहिती दिली.

मात्र पीआय वाघमारे यांनी खडसे व कलावंतांची तक्रार नोंदविण्या ऐवजी मारहाण करणा-या आरोपींना पोलिस ठाण्यात आणण्यास कर्मचारी पाठवले.चार आरोपींसोबत बारा माणसे पोलिस ठाण्यात पोहाेचली.त्यांनी खडसे यांच्यावर दारु पिऊन शिविगाळ केल्याचा खोटा आरोप केला.वाघमारे यांनी खडसे यांना तुमच्या तक्रारीसोबतच मारहाण करणा-यांची तक्रार देखील नोंदवणार व दोन्ही पक्षावर गुन्हा दाखल करणार असल्याचे बजावले.

जो कलावंत एवढी जबर मारहाण सहन करुन पोलिस ठाण्याची पायरी चढला नाही,त्याच्याच विरुद्ध आता तक्रार नोंदवली जाणार असल्याचे ऐकून खडसे हे मनाने हतबल झाले.उद्या सकाळी दहा वाजता मेडीकलमधील अहवालासाठी पुन्हा खडसे यांना इमामवाडा पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले आहे.

जे चार आरोपी आज इमामवाडा पोलिस ठाण्यात आले त्यात पाचवा आरोपी ज्याने हाफ मर्डर केला आहे,पवन नावाच्या तरुणाला चाकूने भोसकले होते तो पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचलाच नाही,तो पोलिसांना गवसला नाही असे सांगितले जात आहे.अमरावतीमधील त्याची गुन्हेगारी गतिवधी बघूनच त्याला नागपूरात चंदन नगर येथे मामाच्या घरी पाठविण्यात आले होते मात्र त्याने येथे ही इतर चौघांसोबत एका कलावंतांलाच शुल्लक कारणावरुन जबर मारहाण केल्याची घटना घडवून आणली.

खडसे यांची वयोवृद्ध ७५ वर्षाची आई या कायमच्या अंथरुणावर खिळल्या आहेत.कमरेचे हाड मोडल्याने त्या अंथरुणावरच असतात.मुलाचा हात कायमचा पंगू झाला आहे तर मुलगी ही मतिमंद आहे.करोनाच्या संकट समयी देशातील सगळ्याच भागातील कलावंतांसमोर उपजिविकेचा गंभीर प्रश्‍न उभा ठाकला होता.आपल्या कष्टाच्या कमाईतून पै-पै जोडून खडसे यांनी आपला की-बोर्ड, शो मध्ये आणण्या-नेण्यासाठी कार घेतली होती.स्वाभाविक आहे आपल्या गाडी विषयी कोणत्याही संवेदनशील माणसाला ‘ममत्व’असतंच,अश्‍यावेळी शेजारी राहणा-या गुंड प्रवृत्तीच्या काही लोकांमुळे एखादा कलावंतांच्या जीवावर ही गुुंडशाही उठणार असेल,याबाबत तक्रार नोंदविली जाणार नसेल,गुन्हेगारांना जरब बसेल अशी शिक्षा त्यांना होणार नसेल आणि सामांन्यांनी गुंडांचा अत्याचार सहन करुन पोलिस ठाण्याची पायरीच चढू नये,अशीच यंत्रणा राबत असेल तर शहरातील सर्व पोलिस ठाण्यातील दर्शनी भागातील सामान्यांचे स्वागतपर लागलेले फलक काढून ठेवणेच इष्ट ठरेल.

नागपूरच्या कलाकार जगतात या घटनेविषयी संताप उसळला असून, उद्या कलांवंतांच्या संघटनेतर्फे पोलिस आयुक्तांना निवेदन दिले जाणार आहे. या दूर्देवी घटनेत खडसे यांचे काही बरे-वाईट झाले असते तर त्यांचे कुटुंबिय उघड्यावर पडले असते,खडसे यांचे दोन्ही हात मोडल्याने आता त्यांच्यासमोर उपजिविकेचाही गंभीर प्रश्‍न उभा राहीला असून,अश्‍या हैदोस घालणा-या,कायदा-सुव्यवस्थेची खिल्ली उडवणा-या,पोलिस यंत्रणेला आपल्या खिश्‍यातील वस्तू समजणा-या  वस्ती- वस्तीतील गुंडांना, पोलिस आयुक्तांनी योग्य समज देणे व कायदेशीर शिक्षा करने हे आपले कर्तव्य पार पाडण्याची मागणी केली जाणार आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या